Dhule Leopard News : बिबट्याच्या हल्ल्यातील तिसऱ्या बालकाची मृत्यूशी झुंज; शोधासाठी ट्रॅप कॅमेरे, ड्रोनचा वापर

leopard attack
leopard attackesakal
Updated on

Dhule Leopard News : नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात धुळे तालुक्यातील नंदाळे बुद्रुक शिवारात रविवारी (ता. २२) चारवर्षीय दीदी शिवराम पावरा हिचा बळी, नंतर मंगळवारी (ता. २४) होरपाडे शिवारात सहावर्षीय स्वामी दीपक रोकडे याचा बळी आणि गुरुवारी (ता. २६) मोघण शिवारात तेरावर्षीय रमेश रामसिंग पावरा या बालकावर पहाटे सहाला हल्ला झाल्याने तो मृत्यूशी झुंज देत आहे.

या तीन गंभीर घटनांनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याने वन विभागाने बिबट्याच्या शोधासाठी दिवसरात्र ५० कर्मचाऱ्यांचे पथक नेमत पिंजरे, ट्रप कॅमेरे, ड्रोनची मदत घेतली आहे.

मानवी रक्ताची चटक लागलेल्या बिबट्याने धुळे तालुक्यातील बोरी परिसरात धुमाकूळ घातल्याने त्याची दहशत निर्माण झाली आहे. या घटनांमुळे भयभीत शिरपूरहून शेती कामासाठी आलेले असंख्य पावरा कुटुंबीय पुन्हा मूळ गावाकडे परतली आहेत. त्यामुळे कापूस वेचणीच्या कामावर विपरीत परिणाम झाला आहे. (leopard attack increasing in dhule news)

भयाची परिसीमा ओलांडली

बिबट्याने मोघण शिवारात गुरुवारी पुन्हा बालकाच्या नरडीचा घोट घेतल्याने ग्रामस्थांमधील भयाने परिसीमा ओलांडली आहे. रक्तबंबाळ बालकाकडे पाहतानाही अंगावर शहारे येतील इतक्या क्रूरतेने त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला आहे. त्याचे वडील रामसिंग पावरा शेतात राखणदारी करतात.

त्यांचा मुलगा रमेश याच्या चेहऱ्यासह गळा आणि शरीराचा विविध भाग बिबट्याने अक्षरशः ओरबाडून काढला आहे. त्याच्या व जवळ असलेल्या ग्रामस्थांच्या आरडाओरडीनंतर बिबट्या पळाला. जखमी रमेशला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

आक्रोशानंतर शोध सुरू

बिबट्याच्या हल्ल्यात स्वामी रोकडे या बालकाचा मृत्यू झाल्यावर शिरूड चौफुलीवर संतप्त ग्रामस्थांकडून मंगळवारी रास्ता रोको आंदोलन झाले. त्यात वन विभागावर तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकाऱ्यांनी बिबट्याचा शोध घेण्यात झालेल्या दिरंगाईमुळे जबाबदार अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली.

मोघण शिवारात पुन्हा हल्ल्याची घटना घडल्यावर वन विभागाकडून उपाययोजनांना सुरवात झाली. उपवनरंक्षक नितीनकुमार सिंग यांनी सांगितले, की बिबट्याचा शोध लागताच गनने त्याला बेशुद्ध केले जाईल. त्यासाठी डॉक्टरांचे पथकही मदतीला आहे. बोरी पट्ट्यासह धुळे तालुक्यातील विविध गावांत ग्रामस्थांना दक्षता घेण्याबाबत आवाहन केले जात आहे. हल्ला करणारा एकच बिबट्या असावा, असा अंदाज आहे.

leopard attack
Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात ७ महिन्यांच्या चिमुकल्याला आईने दिले जीवदान!

दहा लाखांची तत्काळ मदत ः सिंग

शासन निर्णयाप्रमाणे वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एखाद्याचा मृत्यू झाल्यास वारसांना एकूण २५ लाख रुपयांचे सहाय्य दिले जाते. त्यात प्रथम दहा लाखांचा निधी तत्काळ दिला जातो. त्यानुसार बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी दीदी पावरा आणि स्वामी रोकडे या बालकाच्या पीडित कुटुंबाला प्रत्येकी दहा लाखांचा निधी शुक्रवारी (ता. २७) दिला जाईल.

त्यांना आरटीजीएसद्वारे सहाय्य केले जाईल. त्यासाठी त्यांच्याकडील बँक खात्याची माहिती मागविण्यात आली आहे. ती प्राप्त होताच प्रत्येकी दहा लाखांचा निधी बँकेत वर्ग केला जाईल. यानंतर दोघा पीडित कुटुबांना उर्वरित प्रत्येकी १५ लाखांचा निधी दिला जाणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग यांनी दिली. बिबट्याचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

वन विभागाविरोधात तीव्र आक्रोश ः माळी

निष्पापांचे बळी रोखण्यासाठी नरभक्षक बिबट्याचा युद्धपातळीवर बंदोबस्त करावा. मृत बालकांच्या पीडित कुटुंबाला नियमाप्रमाणे तत्काळ आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख हिलाल माळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यांनी सांगितले, की बोरकुंड परिसरातून बिबट्याच्या हल्ल्यानंतर ग्रामस्थांनी संपर्क साधूनही वन विभागाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोचू शकले नाहीत.

त्यांनी घटनेचे गांभीर्य न घेतल्यामुळे ग्रामस्थांना आंदोलन करावे लागले. या प्रकरणी चौकशीसह दोषींना निलंबित करावे. मोघण शिवारातील बिबट्याच्या हल्ल्यानंतर वन विभागाच्या पथकासह पोलिसांचा फौजफाटा तेथे गेल्यावर ग्रामस्थांचा तीव्र आक्रोश होता. समजुतीनंतर ग्रामस्थांनी आंदोलन केले नाही, असे श्री. माळी यांनी सांगितले.

leopard attack
Dhule Leopard News : बिबट्याकडून बैल फस्त; वन्यपशूंची भक्ष्यासह पाण्यासाठी भटकंती

जेरबंद करा वा ठार मारा ः मुनगंटीवार

धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्याची माहिती आमदार कुणाल पाटील यांनी गुरुवारी मुंबईत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिली. तसेच आमदारांनी विविध मागण्या मंत्र्यांकडे केल्या.

त्यावर मृत बालकांच्या वारसांना तत्काळ प्रत्येकी २५ लाखांचे सहाय्य द्यावे, नरभक्षक बिबट्याला तत्काळ जेरबंद अथवा बेशुद्ध करावे आणि शक्य न झाल्यास ठार करावे, असा आदेश वनमंत्री मुनगंटीवार यांनी मुख्य वन्यजीवरक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक महिपत गुप्ता यांना दिल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे येथील रेस्क्यू टीम तैनात झाल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले. त्यांनी मंत्र्यांच्या दालनातून नागपूरस्थित प्रधान मुख्य वनसंरक्षक गुप्ता यांच्याशीही चर्चा केली.

leopard attack
Dhule Leopard News : बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार; ग्रामस्थांचा बालकाच्या पार्थिवासह रास्ता रोको

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com