esakal | कोरोनाच्या ‘रिकव्हरी रेट’मध्ये धुळे जिल्हा अव्वल 
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या ‘रिकव्हरी रेट’मध्ये धुळे जिल्हा अव्वल 

धुळे जिल्ह्याने रिकव्हरी व डबलिंग रेटमध्ये अव्वलस्थान कायम ठेवले आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट गेल्या आठवड्यापेक्षा सुधारल्याचेही अहवालावरून दिसते.

कोरोनाच्या ‘रिकव्हरी रेट’मध्ये धुळे जिल्हा अव्वल 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः राज्य शासनाच्या पुणेस्थित आरोग्यसेवा संचालनालयाच्या अहवालाप्रमाणे धुळे जिल्ह्याने कोविड रुग्णांचा रिकव्हरी आणि डबलिंग रेटमध्ये आपले अव्वलस्थान कायम ठेवले आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सध्या ८८.८७ टक्के आहे. मृत्युदर मात्र राज्याच्या तुलनेत किंचित जास्त वाढला असला तरी स्थिती नियंत्रणात असल्याचे दिसते.

वाचा-  सातपुड्याच्या कुशीत फुलली सेंद्रिय आवळ्याची शेती 
 

जिल्हाधिकारी संजय यादव, हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, आयुक्त अजीज शेख, सीईओ वान्मती सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, कोविड विभागप्रमुख डॉ. निर्मलकुमार रवंदळे व सहकारी, कोविड नोडल अधिकारी डॉ. राजकुमार सूर्यवंशी, डॉ. विशाल पाटील व सहकारी, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे आदींच्या प्रयत्नांनी जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात येत आहे. 

रिकव्हरी रेट 
कोविड रुग्णांच्या रिकव्हरी, डबलिंग व डेथरेटच्या अनुषंगाने आरोग्यसेवा संचालनालय दर आठवड्याला राज्यातील सर्व जिल्ह्यांचा अहवाल तयार करून त्या अनुषंगाने त्या-त्या जिल्ह्यांची स्थिती व करावयाच्या उपाययोजना याबाबत जिल्ह्यांना निर्देश देत असते. २८ सप्टेंबरच्या अहवालानुसार राज्याचा रिकव्हरी रेट ७६.९१, देशाचा ८२.४६ टक्के आहे. धुळे, मुंबई, रायगड, जळगाव, ठाणे, नगर, पालघर, हिंगोली, वाशीम, नंदुरबार, अमरावती, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांचा रिकव्हरी रेट जास्त आहे. पालघर, गडचिरोली, औरंगाबाद, वर्धा या जिल्ह्यांचा कमी आहे. धुळे जिल्ह्याने रिकव्हरी व डबलिंग रेटमध्ये अव्वलस्थान कायम ठेवले आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट गेल्या आठवड्यापेक्षा सुधारल्याचेही अहवालावरून दिसते. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट १३ सप्टेंबरला ७८.७०, २० सप्टेंबरला ८४.२२ होता, २७ सप्टेंबरला तो ८८.८७ झाला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांचा रिकव्हरी रेट असा ः मुंबई-८१.९४, रायगड- ८१.३९, जळगाव- ८१.१०, नंदुरबार- ७८.१४. 

आवश्य वाचा- नंदुरबार जिल्ह्यात २७३ कोटींचे पीककर्जवाटप

डबलिंग रेट ९४.४६ 
कोविड रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याचा कालावधी समजण्यासाठी उपयोग होणाऱ्या डबलिंग रेटमध्येही धुळे जिल्हा अव्वलस्थानी आहे. राज्याचा डबलिंग रेट ४७.२९ दिवस आहे. राज्याच्या या रेटपेक्षा धुळ्यासह राज्यातील इतर काही जिल्ह्यांचा रेट जास्त आहे. यात धुळे (९४.४६), पालघर (७२.६३), ठाणे (७२.०४), मुंबई (६४.५१), रायगड (६१.८१), औरंगाबाद (६०.६७), जळगाव (५७.९३), रत्नागिरी (५६.८०), पुणे (५४.३२), नंदुरबार (५१.०३) अशी स्थिती आहे. 

मृत्युदर असा 
कोरोना रुग्णांचा राज्याच्या मृत्युदर सध्या २.६६ टक्के आहे. राज्याच्या मृत्युदरापेक्षा किंचित जास्त अर्थात २.६९ एवढा मृत्युदर धुळे जिल्ह्याचा आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्याच्या मृत्युदराची स्थिती अशी ः धुळे- २.५८ (१३ सप्टेंबर), २.६६ (२० सप्टेंबर), २.६९ (२७ सप्टेंबर), जळगाव- २.७६, २.६३, २.६४, नंदुरबार- २.४८, २.३८, २.३०. मृत्युदर एक टक्क्यापेक्षा कमी करण्याच्या केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना आहेत. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे