काय सांगताय...! धुळ्यात तीन प्रभागांत पूर्णतः "लॉक डाऊन'चाशात पहिला प्रयोग 

निखिल सूर्यवंशी  
Wednesday, 15 April 2020

भविष्यात संपूर्ण शहर "लॉक डाऊन'ची स्थिती निर्माण झाल्यास नियंत्रणासाठी सक्षम यंत्रणा निर्माण करणे, रिकामटेकड्यांवर कठोर कारवाई करणे, वैद्यकीय सेवेचे कारण दाखवून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या नागरिकांना वठणीवर आणणे, प्रत्येक प्रभागासाठी स्वयंसेवक व कर्मचाऱ्यांचे दोन पथक निर्माण करणे आदींबाबत निर्णय झाला.

धुळे ः जळगाव, नाशिक- मालेगाव, सुरत, सेंधवा व बडवानी, अशा चौफेर भागातील कोरोना बाधित क्षेत्राने घेरलेल्या धुळे शहरात या संसर्गजन्य आजाराची बाधा होऊ नये, दक्षता आणि नागरिकांच्या जागृतीसाठी महापालिका क्षेत्रातील निवडक तीन प्रभागांमध्ये 15 व 16 एप्रिलला रंगीत तालीम म्हणून शंभर टक्के "लॉक डाऊन' केले जाणार आहे. देशातील असा हा पहिलाच पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्‍ट) असून तो यशस्वितेसाठी यंत्रणेने कंबर कसली आहे. 

नक्की वाचा :   सराफबाजार काहीअंशी सुरू करावा...अडचणीच्या काळात सोने विकून भरता येईल पोट*  
 

धुळे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ, नऊ व दहामधील दाटवस्ती व चिंचोळ्या भागातील जुने धुळे, मच्छीबाजार, मौलवी गंज परिसर, अकबर चौक, माधवपुरा, तिरंगा चौक, अमरनगर, पारोळा रोड भागात 15 एप्रिलपासून 16 पर्यंत पूर्णतः "लॉक डाऊन' असेल. कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. दुकाने दोन दिवस पूर्णतः बंद राहतील. या काळात नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूची आवश्‍यकता असल्यास मागणीनुसार अन्नधान्य, भाजीपाला, दूध, औषधे संबंधित दुकानदारांकडून बाजारभावाप्रमाणे घरपोच दिली जातील. त्यासाठी संबंधित दुकानदारांचे संपर्क क्रमांक या "लॉक डाऊन' भागात पत्रकाद्वारे वितरित झाले. तसेच याबाबत रिक्षाद्वारे जागृती झाली. 

आर्वजून पहा :  आनंदाची वार्ता...जळगावातील पहिला रुग्ण अखेर झाला "कोरोना'मुक्त

वितरण प्रणालीत काही अडचणी उद्‌भवल्यास तीन प्रभागात ठिकठिकाणी तैनात महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नागरिकांना सहकार्य करेल. अशा प्रभागात शिरकाव होणाऱ्या ठिकाणचे रस्ते अडविण्यात आले आहेत. या भागात थर्मल स्कॅनरव्दारे प्रत्येक कुटुंबाकडे मनपाच्या वैद्यकीय पथकामार्फत तपासणी होईल. संपूर्ण भागात रासायनिक फवारणी होईल. 
यासंदर्भात महापालिका, पोलिस, महसूल व आरोग्य विभागाच्या संयुक्त बैठकीत उपाययोजनांसह मालेगाव शहराकडून येणारे चोरवाटांसह सर्व रस्ते बंद करणे, मालेगावची व्यक्ती शहरात आल्यास तातडीने माहिती देण्याची सक्ती करणे, स्वयंसेवकांची मदत घेणे, भविष्यात संपूर्ण शहर "लॉक डाऊन'ची स्थिती निर्माण झाल्यास नियंत्रणासाठी सक्षम यंत्रणा निर्माण करणे, रिकामटेकड्यांवर कठोर कारवाई करणे, वैद्यकीय सेवेचे कारण दाखवून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या नागरिकांना वठणीवर आणणे, प्रत्येक प्रभागासाठी स्वयंसेवक व कर्मचाऱ्यांचे दोन पथक निर्माण करणे आदींबाबत निर्णय झाला. दरम्यान, जिल्ह्यात साक्री येथे 53 वर्षीय कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असून त्याचा मृत्यू झाला आहे. 

क्‍लिक कराः    कोरोनाग्रस्त जिल्ह्यांना नव्हे तालुक्यांना लॉकडाउन करा : प्रा. संदीप चौधरी  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule The first experiment to fully "lock down" the chamber