तवेरा उलटली..ते झाले फरार पण... 

जगन्नाथ पाटील
सोमवार, 2 डिसेंबर 2019

गायींची चोरी करून नेली जात आहे. हे प्रकार कापडणे परिसरात तर होतच आहेत. पण जळगाव शहरात देखील असे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. याबाबत तक्रार देवून देखील गाय चोरणाऱ्यांचे रॅकेट पोलिसांच्या हाती लागलेले नाही. 

कापडणे (धुळे) : मुंबई आग्रा महामार्गापासून अर्धा किमी अंतरावरील सरवड (ता.धुळे) जवळ आज सकाळी आठच्या सुमारास भरधाव जाणारी तवेरा (एमएच 14 बीए 3452) उलटली. ग्रामस्थ मदतीसाठी धावलेत. चालकासह तिघांना बाहेर काढले असता, ते फरार झाले. तर मागे चार गायी कोंडलेल्या आढळल्यात. यातील एक गायीचा मृत्यू झाला. 
लहान गाडी आणून गाडीतील सिट काढून होणाऱ्या छोट्याशा जागेत गायी कोंबून नेण्याचे प्रकार परिसरात घडत आहेत. कोणालाही संशय येणार नाही; अशा पद्धतीने गायींची चोरी करून नेली जात आहे. हे प्रकार कापडणे परिसरात तर होतच आहेत. पण जळगाव शहरात देखील असे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. याबाबत तक्रार देवून देखील गाय चोरणाऱ्यांचे रॅकेट पोलिसांच्या हाती लागलेले नाही. 

नक्‍की वाचा > शेतकरी बाप...कर्जाचा डोंगर...अन्‌ तिने संपविले जिवन 

चार गायी निघृणपणे कोंडलेल्या..! 
लामकानीकडून येणारी भरधाव तवेरा सरवड गावाच्या प्रवेशद्वाराजवळ वळण घेतांना अचानक उलटली. गाडी उलटल्याने ग्रामस्थ मदतीसाठी धावले. गाडीला सरळ करून तिघांना बाहेर काढले. बाहेर काढताच त्यांनी गर्दीचा फायदा घेत पळ काढला. तवेराच्या मागे चार गायी निघृणपणे कोंडलेल्या होत्या. त्या जिवाच्या आकांताने ओरडत होत्या. त्यांना ग्रामस्थांनी बाहेर काढले. एक जागीच ठार झालेली आहे.

हेही पहा > बाजरीची भाकरी होणार महाग? कारण असं  

...तर गायी चोरांचे रॅकेट हाती लागेल 
परीसरात गायी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. आठ दिवसांपूर्वी कापडणे येथे दोन गायी तर वावडे (ता. अमळनेर) येथे एकाच रात्री सहा गायी चोरीस गेल्या आहेत. आजच्या घटनेच्या चौकशीतून गायी चोरांचे रॅकेट हाती लागू शकते. याकडे पोलिसांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. तात्काळ चौकशीला वेग देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule kapdne cow death tavera accident