आधी काम, नंतर निविदा 

dhule seftic tank
dhule seftic tank

धुळे : महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारातील सेप्टिक टॅंक स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. मात्र, हे काम निविदा मागविण्यापूर्वीच झाले असल्याचे सांगितले जाते. तसे असेल तर निविदा मागविण्यात अर्थ काय यासह अनेक प्रश्‍न उपस्थित होतात. दरम्यान, असे काही घडलेले नाही हे सांगण्याचे "कसब' महापालिकेच्या यंत्रणेकडे आहे, हेही तेवढेच खरे. मात्र, प्रशासकीय प्रक्रिया न राबवता असा प्रकार होत असेल तर ही बाब गंभीर आहे. 
महापालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या एका विंगमधील शौचालयांसाठी महापालिकेच्या आवारात बांधलेली सेप्टिक टॅंक आता स्थलांतरित करण्यात येणार आहे. आवारात संत शिरोमणी जगनाडे महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. या पुतळ्याच्या कामासाठी ही टाकी स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. पुतळ्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या टाकीचे स्थलांतर करावे लागत असल्याने हे काम करण्यास कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही. या कामाची गरज लक्षात घेऊन टाकी स्थलांतरित करण्याचे काम तातडीने करण्यात आल्याचे दिसून येते. मात्र, टाकीचे स्थलांतर झाल्यानंतर या कामासाठी महापालिकेने निविदा काढल्याचे दिसून येत आहे. 

तीन लाख 38 हजारांचे काम 
महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारातील सेप्टिक टॅंक स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने निविदा मागविली. या कामासाठी अंदाजपत्रकीय रक्कम तीन लाख 38 हजार 180 रुपये निश्‍चित करून ही निविदा प्रक्रिया केली आहे. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडील नोंदणीकृत ठेकेदार, संस्था, व्यक्ती यांच्याकडून बी-1 पद्धतीने पर्सेंटेज रेटनुसार ही निविदा मागविण्यात आली आहे. 


कामानंतर निविदा कशी? 
सेप्टिक टॅंकचे स्थलांतराचे काम निविदा काढण्यापूर्वीच झाले असल्याचे दिसून येते. त्यामुळे हे काम झाले असेल तर निविदा का मागविण्यात येत आहे, असा प्रश्‍न उपस्थित होतो. त्यापुढे जाऊन आणखी काही आनुषंगिक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतात. निविदा ऑनलाइन असली तरी ज्याने सेप्टिक टॅंक स्थलांतराचे काम केले आहे, त्यालाच काम मिळणार हे निश्‍चित आहे का? मग ऑनलाइन निविदा मागविण्याला अर्थ काय, असे काही प्रश्‍न उपस्थित होतात. समजा सगळेच ठरलेले असेल तरी प्रशासनाने अशा नियमबाह्य प्रकाराला संमती कशी दिली, हाही प्रश्‍नच आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com