कचरा ठेकेदार वॉटरग्रेसवर मनपाकडून गुन्हा दाखलसाठी हालचाली ! 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 May 2020

धुळे जिल्हा रेड झोनमध्ये आहे. लॉकडाऊन सुरु आहे. अशा स्थितीत कचरा संकलनाचे काम सोडून घंटागाड्या महापालिकेसमोर आणणे, आंदोलन करणे आदी कारणे पुढे करत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची संधी महापालिका प्रशासनाने शोधल्याचे दिसत आहे.

धुळे ः शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीला महापालिकेने साडेपाच लाख रुपये दंड केला आहे. दंडाची ही रक्कम कपात करुन कंपनीला मार्चचे बिल अदा करण्यात आले. दरम्यान, आता गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींच्या अनुषंगाने ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरु आहेत. वजन वाढविण्यासाठी घंटागाडीत दगड, माती भरणे, लॉकडाऊन असतांना कामगारांनी पगारासाठी काम सोडून घंटागाड्या थेट महापालिकेत आणल्याने ही कारवाई होण्याची शक्‍यता आहे. 

आर्वजून पहा :Vidio : मै सब के लिये दुवा करूगीं...और सब ठिक होगें; नंदूरबारला चार जण कोरोनामुक्त ! 
 

कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी घंटागाडीत चक्क माती, दगड व राडारोडा भरला जात असल्याचा व्हीडीओ समोर आला. या व्हीडीओच्या आधारे "मनसे'ने आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर शिवसेनेने कचरा "ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे कचरा संकलनाचा ठेका रद्द करावा, ठेकेदाराविरुद्ध आर्थिक गुन्हा शाखेकडे फिर्याद दाखल करावी अशी मागणी केली होती. कचरा संकलनातील विविध मुद्‌द्‌यांचा संदर्भ देत शिवसेनेने महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्यावरही कठोर शब्दात निशाणा साधला होता. त्यातच दोन दिवसांपूर्वी (4 मे) पगार नसल्याच्या कारणावरुन घंटागाडीवरील कामगारांना कचरा संकलनाचे काम अर्ध्यावरच सोडून देत घंटागाड्या थेट महापालिकेसमोर आणुन लावल्या होत्या. शिवाय पगाराच्या मागणीसाठी महापालिकेसमोर निदर्शनेही केली होती. या सर्व घटना-घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाकडुन कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध (वॉटरग्रेस कंपनी) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती महापालिकेतील सुत्रांनी दिली. 

धुळे शहरात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका शहरात वाढलेला आहे. शहरात 24 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आले, त्यातील चौघांचा मृत्यू झाला. धुळे जिल्हा रेड झोनमध्ये आहे. लॉकडाऊन सुरु आहे. अशा स्थितीत कचरा संकलनाचे काम सोडून घंटागाड्या महापालिकेसमोर आणणे, आंदोलन करणे आदी कारणे पुढे करत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची संधी महापालिका प्रशासनाने शोधल्याचे दिसत आहे. 

नक्की वाचा :  दारूचे दुकाने उघडली...तरी गावठी हातभट्टीचा ऊत थांबेना ! 
 

साडेपाच लाख रुपये दंड 
दरम्यान, घंटागाड्या बंद ठेवणे, घंटागाड्यांचे नुकसान करणे, शहरातील दैनंदिन कचरा संकलनासाठी पर्यायी व्यवस्था न करणे आदी विविध कारणांमुळे महापालिकेने ठेकेदाराला साडेपाच लाख रुपये दंड केला आहे. दंडाची ही रक्कम मार्चच्या बिलातुन कपात करण्यात आली असल्याची माहिती मनपातील अधिकाऱ्याने दिली. 

पार्टनर बदलले ? 
कचरा संकलनाचे काम नाशिक येथील वॉटरग्रेस कंपनीला दिले आहे. मात्र, या कामात काही स्थानिक सब-ठेकेदार घुसले आहेत, काही नगरसेवकच पार्टनर आहेत असे आरोप यापूर्वी झाले होते, त्यावरुन मोठे वादंगही निर्माण झाले होते. महासभेत याविषयावर आरोप-प्रत्यारोपही झाले होते. दरम्यान, आता कचरा ठेक्‍यातील पार्टनर बदलल्याची व काही इतर नगरसेवक पार्टनर झाल्याची चर्चा आहे. 

क्‍लिक कराःविवाहितेचा गुजरातमध्ये संशयास्पद मृत्यू- नातेवाइकांनी व्यक्त केला खुनाचा संशय 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Municipal Corporation waste contractor Watergress against case Movements