कोरोनाग्रस्त वृध्दाच्या अंत्यसंस्काराला...दगडफेकीसह लाठीमार

निखिल सूर्यवंशी   
गुरुवार, 30 एप्रिल 2020

संतप्त जमावाने रूग्णवाहिकेसह पोलिस वाहनांवर तुरळक दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करून जमाव पांगवावा लागला.

धुळे ः येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकिय शासकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रूग्णालयासह देवपूरमधील अमरधामजवळ 23 तास अंत्यसंस्काराविना पडून असलेल्या 80 वर्षीय कोरोनाग्रस्त वृध्दावर अखेर मूळ गावी साक्री येथे आज (गुरूवार) पहाटे पाचला नदीकिनारी अंत्यसंस्कार झाले. तत्पूर्वी, धुळे शहरातील देवपूर अमरधामजवळील रहिवाशांनी वृध्दावर अंत्यसंस्कारास तीव्र विरोध केला. यातून संतप्त जमावाने रूग्णवाहिकेसह पोलिस वाहनांवर तुरळक दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करून जमाव पांगवावा लागला. अंत्यसंस्काराबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने ठोस निर्णय न घेतल्याने कोरोनाग्रस्त मृतदेहांची अक्षरशः आबाळ होत आहे. 

नक्की वाचा :   मृतदेहांची आबाळ थांबविणार कोण? 

धुळे शहरात कोरोनाग्रस्त 28 वर्षीय तरूणाच्या अंत्यसंस्काराबाबत सरकारी कर्मचारी व नातेवाईकांमध्ये वाद झाले होते. अमरधाममध्ये कुणी मृतदेह उचलावा आणि अंत्यसंस्कारासाठी ठेवावा, यावरून अडीच तास घासाघीस चालली होती. यावरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती बोध घेईल, असे वाटले होते. मात्र, हा प्रश्‍न गांभीर्याने न हाताळल्यामुळे साक्री येथील कोरोनाग्रस्त वृध्दावरील अंत्यसंस्काराबाबत पुन्हा तोच प्रत्यय आला. 

आर्वजून पहा :  कोटात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी धुळे आगारातून 70 बस रवाना 

साक्रीतील कोरोनाग्रस्त वृध्दाचा बुधवारी (ता. 29) पहाटे पाचला जिल्हा रूग्णालयात मृत्यू झाला. त्याचा मृतदेह कुणी उचलावा आणि अंत्यसंस्कार कुणी व कुठल्या जागेवर करावा यावरून रात्री आठपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नव्हता. साक्रीतील सामाजिक कार्यकर्ते पंकज मराठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क साधल्यावर उपाययोजना सुरू झाल्या. प्रथम रूग्णालय परिसरात वृध्दावर अंत्यसंस्काराचा प्रयत्न झाला. तेथेही स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्याने अंत्यसंस्काराची प्रक्रिया थांबवावी लागली. पुढे सरकारी यंत्रणेने धुळे शहरातील देवपूरमधील अमरधाममध्ये वृध्दावर अंत्यसंस्कार करण्याचे नियोजन केले. त्याप्रमाणे रूग्णवाहिका अमरधामच्या प्रवेशव्दारात थांबली. मात्र, स्थानिक रहिवाशांनी रूग्णवाहिकेवर दगडफेक केली. पूर्वीच मध्यवर्ती भागातील अमरधाममध्ये कोरोनाग्रस्तावर अंत्यसंस्कार केले जाऊ नये, अशी मागणी रहिवाशांतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास चौधरी यांनी केली होती. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे वृध्दाच्या अंत्यसंस्काराला रहिवाशांनी कडाडून विरोध केला. बुधवारी मध्यरात्रीनंतर साडेबाराला हा प्रकार घडला. संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनांवर तुरळक दगडफेक केली. त्यामुळे जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. अखेर नमती भूमिका घेत पोलीस व महापालिका प्रशासनाने कोरोनाग्रस्त वृध्दाचा मृतदेह मूळ गावी साक्री येथे नेला. तेथे गुरूवारी पहाटे पाचला म्हणजेच 24 तासांनंतर अधिकारी, मोजक्‍या नातेवाईकांच्या उपस्थितीत संबंधित वृध्दावर अंत्यसंस्कार झाले. 

क्‍लिक कराः मालेगावात बंदोबस्तावरील जळगावचे दोन पोलिस कोव्हिड पॉझेटिव्ह 
 

तत्पूर्वी, देवपूरमधील कैलास चौधरी व स्थानिक रहिवाशांनी पालिका प्रशासनासह दौऱ्यावर येऊन गेलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांना देवपूरमधील अमरधाममध्ये कोरोनाग्रस्तावर अंत्यसंस्कार होऊ नये, अशा मागणीचे निवेदन दिले होते. असे असतानाही सरकारी यंत्रणा जाणीवपूर्वक नागरिकांचे आरोग्य बिघडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप कैलास चौधरी यांनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule wold woman corona deth Funeral Confusion