अमळनेरकरांनो सावध व्हा...लक्षणे दिसताच तपासणी करा- पालकमंत्री पाटील 

amalner visit minister  patil
amalner visit minister patil

जळगाव ः कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हाच उत्तम पर्याय असल्याने नागरिकांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करावे. मात्र इतर आजारी रुग्णांना लॉकडाऊनचा त्रास होणार नाही याचीही दक्षता घ्याव्यात. तसेच कोरोनाची लक्षणे दिसताच तपासणी करावी  अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज अमळनेर येथे दिल्या. 

अमळनेरमध्ये कोरानाचे रुग्ण वाढत आहे. ही बाब लक्षात घेता पालकमंत्री पाटील यांनी आज अमळनेर शहरास भेट दिली. तेथील परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. आमदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील, नगराध्यक्षा सौ. पुष्पलता पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र ससाणे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलिस निरीक्षक अंबादास मोरे, माजी आमदार साहेबराव पाटील आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री म्हणाले, की जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवीत आहेत. प्रशासनाच्या उपाययोजनांना नागरिकांच्या सहकार्याची जोड आवश्‍यक आहे. यासाठी नागरिकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत घरात राहून सुरक्षित राहावे. जेणेकरून आपण कोरोनाचा प्रादुर्भाव निश्‍चितपणे रोखू शकू. 

सीमेवरील तपासणी कडक करा 
पालकमंत्री म्हणाले की, अमळनेर तालुका हा धुळे व नंदूरबार जिल्ह्याच्या सीमेवरील तालुका आहे. या दोन्ही जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यातच मालेगाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरल्याने तालुकावासियांना अधिक काळजी घ्यावी लागणार. या भागातून तालुक्‍यात कोणीही येणार नाही याची दक्षता घ्या. पोलिस विभागाने तालुक्‍याच्या सीमेवरील तपासणी कडेकोट करावी. आमदार अनिल पाटील म्हणाले, की अमळनेर येथून डायलिसिससाठी अनेक रुग्ण धुळ्याला जातात, परंतु लॉकडाऊनमुळे जिल्हाबंदी असल्याने त्यांना उपचार घेण्यास अडचण येत आहे. तालुक्‍यातील नागरिकांना आगामी खरीप हंगामासाठी बियाणांची अडचण येवू नये. संबंधितांना सूचना यापूर्वीच देण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. "पांझरे'चे आरक्षित पाणी सोडण्याचा प्रश्न आमदार स्मिता वाघ यांनी मांडला. 

मुख्यमंत्री निधीचा धनादेश सुपूर्द 
जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्थेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 51 हजार रुपयांची मदत करण्यात आली. या मदतीचा धनादेश संचालक मंडळाने पालकमंत्री यांच्याकडे सुपूर्द केला. अमळनेर शहरातील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांना घरपोच जीवनावश्‍यक वस्तू देण्याबाबत पालिकेने केलेल्या नियोजनाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले. पालिका क्षेत्रात सीसीटीव्ही बसविणे, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेला आर्थिक मदत देण्याबाबतही संबंधितांना सूचना देण्यात येतील. पालकमंत्र्यांनी बाजार समिती जवळील शिवभोजन केंद्रास भेट दिली. फोर्टस येथील भाजीपाला विक्री केंद्राला भेट दिली. येथे सोशल डिस्टन्सिंगचे चांगल्याप्रकारे पालन होत असल्याने केंद्रचालकाचे कौतुक केले. गरजू व गरिबांना भानूबेन बाबूलाल शहा गोशाळेतर्फे दररोज भोजन वाटप होते. येथे पालकमंत्र्यांनी भेट देऊन त्यांचा मुलगा- जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळेला एक दिवसाच्या जेवणाचा खर्च 1 लाख 10 हजार रुपयांची मदत केली. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com