जळगाव जिल्ह्यात सी.सी.आय.ची कापूस खरेदी रखडलेलीच- शेतकऱ्यांमध्ये चिंता 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मे 2020

जिल्हाधिकारी लक्ष देणार ? 
पावसाळा तोंडावर उभा असताना जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचा कापूस पडून आहे. शेतकऱ्यांना खरिपाच्या तयारीसाठी पैसा कोठून उभा करावा याची चिंता आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सीसीआय'च्या अधिकाऱ्यांना तंबी देवून बंद असलेली कापूस खरेदी केंद्र सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. 

 

जळगाव ः जिल्ह्यात भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) कापूस 
खरेदी रखडत सुरू झाली आहे. कमी मजूर, अधिकाऱ्यांची कमतरता आदी कारणांमुळे काही केंद्र सुरू तर काही बंद, अशी स्थिती आहे. कापूस घरात पडून असून तो विकण्यासाठी पुरेशी केंद्रे नसल्याचे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

नक्की वाचा ः दारुड्यांचा गर्दीवर आता अर्जांचा उतारा 

सीसीआयचे जळगाव जिल्ह्यात पाचोरा, पहूर, शेंदूर्णी (ता.जामनेर), जामनेर, बोदवड, भुसावळ, चोपडा, जळगाव येथे खरेदी केंद्र मंजूर आहेत. यातील जळगाव येथील केंद्र वगळता इतर केंद्र सुरू झाले आहेत. 

इतर केंद्रांमध्ये कमी मजूर व अधिकाऱ्यांची रजा आदी कारणांमुळे खरेदी रखडत सुरू आहे. मागील दोन दिवसात खरेदी सुरू झाली आहे. 29 फेब्रुवारीनंतर खानदेशातील बहुसंख्य कापूस खरेदी केंद्र बंद झाले होते. कोरोना, कापूस उताऱ्याच्या अडचणी यामुळे केंद्रधारक (जॉब वर्कर्स) कारखानदार खरेदी केंद्र सुरू करायला तयार नव्हते. लोकप्रतिनिधी, केंद्रीय मंत्री यांनी या अडचणींबाबत काही मुद्दे मार्गी लावले. यानंतर ही खरेदी सुरू झाली आहे. तीदेखील रखडत सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

हेही वाचा ःभुसावळ मध्ये पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह 

जळगाव जिल्ह्यात पणन महासंघाची कापूस खरेदी मागील आठवड्यातच सुरू झाली असून, सुमारे 10 हजार क्विंटलपेक्षा अधिक कापूस खरेदी महासंघाने केली आहे. जिल्ह्यात कासोदा (ता.एरंडोल), पारोळा, दळवेल (ता.पारोळा), धरणगाव येथे कापूस खरेदी सुरू आहे. 

रोज 20 वाहनांमधील कापसाचीच खरेदी 
केंद्रात जेवढी वाहने येतील, त्यातील कापसाची खरेदी करण्याचे शासनाने म्हटले आहे. परंतु जिल्ह्यात सीसीआय व महासंघाच्या केंद्रात रोज फक्त 20 वाहनांमधील कापसाची खरेदी केली जात आहे. कोरोनामुळे गर्दी वाढू नये, सोशल डिस्टन्सींगचे पालन व्हावे यासाठी कापूस खरेदीबाबत मर्यादा असल्याचे सांगण्यात आले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon cotton purchesing stop cci