चौपदरीकरणात वगळलेल्या टप्प्यासाठी नव्याने "डीपीआर' 

jalgaon higway imege
jalgaon higway imege

जळगाव  : महामार्गाच्या चौपदरीकरणात वगळलेल्या पाळधी ते खोटेनगर व कालिंका माता चौक ते तरसोद फाट्यापर्यंतच्या टप्प्याच्या रुंदीकरणासाठी महामार्ग प्राधिकरण विभागाला नव्याने "डीपीआर' (विस्तृत प्रकल्प अहवाल) बनविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. हे दोन्ही टप्पे सार्वजनिक बांधकाम विभाग विकसित करणार असला तरी त्यासाठी केंद्राकडून निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, शहरात सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम कासवगतीने होत असल्यामुळे वाढत्या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर त्याला गती देण्याची गरज असल्याच्या भावना संतप्त नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. 
शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे खोटेनगर ते कालिंकामाता चौक अशा सात किलोमीटरच्या टप्प्यात रुंदीकरण होत आहे. तर याच महामार्गावर फागणे- तरसोद या टप्प्यातील चौपदरीकरणात पाळधीपासून बायपास मार्ग निघून तो तरसोद फाट्याजवळ येऊन मिळतो. त्यामुळे पाळधी- खोटेनगर व कालिंकामाता चौक ते तरसोद फाट्यापर्यंतच्या टप्प्यातील चौपदरीकरण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत "सकाळ'ने वस्तुस्थिती मांडत त्यावर प्रकाशझोत टाकला. 

बांधकाम विभागाकडे 
चौपदरीकरणात बायपास महामार्ग गेल्याने या दोन्ही टप्प्यातील कामांबाबत महामार्ग प्राधिकरणाने सार्वजनिक बांधकाम विभागाला नाहरकत पत्र दिले आहे. आता हे दोन्ही टप्पे बांधकाम विभागाने विकसित करायचे असून, त्यासाठी तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15 कोटींचा निधी दिला आहे. त्यातील पाळधी- खोटेनगर टप्प्यातील मार्गाच्या साईडपट्ट्या व दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रियाही सुरू आहे. मात्र, बांधकाम विभागाकडून दोन्ही टप्प्यांचे चौपदरीकरण शक्‍य नसल्याने त्यासाठी केंद्राकडून शहरातील महामार्ग रुंदीकरणाच्या धर्तीवर विशेष बाब म्हणून निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. 

"डीपीआर'चे आदेश 
या दोन्ही टप्प्यातील रुंदीकरणासाठी नव्याने "डीपीआर' बनविण्याच्या सूचना महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आल्या आहेत. अर्थात, तत्पूर्वी बांधकाम विभागाने मंजूर केलेल्या 15 कोटींच्या निधीतून या टप्प्यांमधील जलवाहिनी, वीजतारा, पोल आदी घटकांचे स्थलांतर व तात्पुरती साईडपट्ट्या दुरुस्ती करुन घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले. 

काम अगदीच संथगतीने 
गेल्या काही महिन्यांत महामार्गावरील अपघात वाढले आहेत. शहरातून जाणाऱ्या मार्गावरील अपघातांमध्ये दररोज बळी जात असल्याची स्थिती असून दुसरीकडे चौपदरीकरणाचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे या कामाला गती देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. याच कामाच्या टप्प्यात नुकतेच अजिंठा चौकाजवळील ट्रान्स्पोर्टनगरसमोर दोनशे ते तीनशे मीटरपर्यंतच्या टप्प्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. 

पाळधी- खोटेनगर व कालिंकामाता चौक ते तरसोद फाट्यादरम्यानचा टप्पा चौपदरीकरणातून वगळला जातोय. मात्र, त्यासाठी केंद्राकडून विशेष मंजुरी व निधी प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्यासंबंधी डीपीआर तयार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. 
 उन्मेष पाटील 
खासदार, जळगाव 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com