"लॉकडाउन'मध्ये 35 कोटींत रुतली "एसटी'ची चाके 

राजेश सोनवणे 
Thursday, 7 May 2020

लॉकडाउनमुळे सार्वजनिक वाहतूक करणारी वाहने बंद करण्यात आली आहेत. यात विमानसेवा, रेल्वे, एसटीसह खासगी ट्रॅव्हल्स देखील बंद होत्या. यामुळे वाहतुकीचे सारे पर्याय बंद झाले होते.

जळगाव : "कोरोना व्हायरस'ने साऱ्यांना खिळवून ठेवले आहे. विमानसेवा असो की ग्रामीण भागाची जीवनवाहिनी अर्थात "लालपरी', या साऱ्या सेवा ठप्प झाल्या आहेत. "लॉकडाउन'च्या दीड महिन्यात एसटी महामंडळाच्या जळगाव विभागाला 35 कोटी 20 लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. यातही सेवा चांगली देण्यासाठी बसची दुरुस्ती सुरू असून, सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना काही त्रास होणार नसल्याचा दावा केला जात आहे. 

क्‍लिक कराः सगळ्यांचे चांगले होईल, माझा आर्शिवाद आहे  कोरोनामुक्त महिलेच्या भावना 
 

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात "लॉकडाउन' पुकारण्यात आला. 24 मार्चपासून सुरू झालेला लॉकडाउन आजदेखील सुरू आहे. या लॉकडाउनमुळे सार्वजनिक वाहतूक करणारी वाहने बंद करण्यात आली आहेत. यात विमानसेवा, रेल्वे, एसटीसह खासगी ट्रॅव्हल्स देखील बंद होत्या. यामुळे वाहतुकीचे सारे पर्याय बंद झाले होते. यामध्ये राज्य परिवहन महामंडळासाठी उत्पन्न मिळवून देणारा लग्नसराईचा हंगाम बंद झाला. परिणामी, उत्पन्न देखील बुडाले. महामंडळाला याचा मोठा फटका बसला आहे. 

44 दिवसांपासून चाके थांबलेली 
राज्य परिवहन महामंडळाची सेवा कधी नव्हे, ती प्रथमच ठप्प झाली. 22 मार्चपासून आजच्या 44 व्या दिवसापर्यंत बसची चाके थांबलेली आहेत. यामुळे मागील दीड महिन्यात एसटी महामंडळाला एक रुपयाचे देखील उत्पन्न मिळू शकले नाही. जळगाव विभागाचा विचार केल्यास विभागातील पंधरा आगारांमधून दररोज साधारणपणे 80 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असते. त्यानुसार 44 दिवसांत जळगाव विभागाला 35 कोटी 20 लाख रुपयांच्या उत्पन्नावर विभागाला फटका बसला आहे. 

नक्की वाचा : डॉक्‍टरसह दोघे कोरोना पॉझिटिव्ह...बाधित एक रूग्णही गरोदर पत्नी, मुलासह पळाला 
 

 खिळखिळ्या बस चांगल्या धावतील का? 
राज्य परिवहन महामंडळाच्या बहुतांश बस खिळखिळ्या आहेत. रस्त्यावरून धावताना कधी बंद पडतील सांगता येत नाही. यामुळे बसची दुरुस्ती सुरूच असते. यात गेल्या 44 दिवसांपासून बसचे इंजिन बंद असल्याने ते सुरू होऊन रस्त्यावरून चांगल्या पद्धतीने धावतील की नाही, याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. परंतु, धुळे आगारातून कोटा येथे गेलेल्या 90 बस सुरळीत जाऊन आल्याने बससेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना घेऊन बस चांगल्या पद्धतीने चालतील, असा दावा महामंडळाकडून केला जात आहे.

आर्वजून पहा : धक्कादायक: जिल्ह्यात आणखी 19"कोरोना' बाधित! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon "Lockdown"efect ST which cost Rs 35 crore lost