esakal | शहादा तालुक्यात वादळी पावसामुळे कापूस, केळी, ऊसाचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

शहादा तालुक्यात वादळी पावसामुळे कापूस, केळी, ऊसाचे नुकसान

शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली होती. त्याचबरोबर महागडी खते व फवारणी केलेली असताना डोळ्यांसमोरच पीक उद्ध्वस्त झाल्याचे पाहून शेतकरी हतबल झाला आहे.

शहादा तालुक्यात वादळी पावसामुळे कापूस, केळी, ऊसाचे नुकसान

sakal_logo
By
कमलेश पटेल

शहादा : गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने रायखेड (ता. शहादा) परिसरात मोठ्या प्रमाणावर केळीचे नुकसान झाले आहे. वादळामुळे केळीचे घड कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचे हजारो केळीचे खांब जमीनदोस्त झाली. पिकासाठी केलेला लाखो रुपये खर्चही गेल्याने शासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

आवश्य वाचा ः  नदीवर पुलच नाही, म्हणून ग्रामस्थांना वाहने न्यावी लागतात उचलून 

गेल्या आठवड्यात तीन-चार दिवस वादळ वाऱ्यासह रोज पाऊस पडत असून, पिकांचे नुकसान झाले आहे. याअगोदर मूग, उडीद हातचा गेला आहे. आता कापूस व ऊस आडवा झाला आहे. त्याचबरोबर बहरात असलेले केळी पीकही उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. 

रायखेड (ता. शहादा) शिवारात केळीची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. अत्यंत महागडे व खर्चिक असलेले हे पीक क्षणार्धात उद्ध्वस्त झाले. सध्या केळीला घड लगडलेले असून, ते पक्व होण्याचा मार्गावर आहेत. अत्यंत महागडी रोपे आणून शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली होती. त्याचबरोबर महागडी खते व फवारणी केलेली असताना डोळ्यांसमोरच पीक उद्ध्वस्त झाल्याचे पाहून शेतकरी हतबल झाला आहे. आता शासनाकडून पंचनामे होऊन नुकसानभरपाईची प्रतीक्षा लागून आहे. 

आवश्य वाचा ः केळी निर्यात वाढविण्याची जबाबदारी ‘अपेडा’वर; जळगाव, कोल्‍हापूर, सोलापूरची निवड 
 

संकटात भर... 
गेल्या वर्षी रब्बी हंगामात निघालेले उत्पादन कवडीमोल भावाने विकावे लागले. यंदा खरीप चांगला येईल म्हणून शेतकऱ्यांनी उधार, उसनवारी करून, तसेच कर्ज काढून पुन्हा नव्या उमेदीने शेती कसायला सुरवात केली. मात्र, अचानक आलेल्या अस्मानी संकटाने शेतकऱ्याला पुन्हा मारले. ज्वारी काळवंडली आहे. कपाशीचे बोंडे सडली आहेत. ऊस, केळी भुईसपाट झाली आहे. शेतकरी पूर्णतः हताश झाला आहे. प्रशासनाने गांभीर्य घेत पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. 

 
यंदा शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस खराब झाला. ऊस आडवा झाला. काही ठिकाणी केळीची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी. 
-अभिजित पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघर्ष समिती 

वाचा ः धुळे जिल्ह्यात खासगी लॅबचा पॉझिटिव्हिटी रेट तुलनेने वरचढ 

माझ्या शेतात केळीच्या पाच ते सहा हजार झाडांची लागवड केली आहे. त्यावर लाखो रुपयांचा खर्चही झाला. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसाने केळीची सुमारे हजारावर झाडे जमीनदोस्त झाली आहेत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी. 
-हिरालाल पाटील, शेतकरी, रायखेड (ता. शहादा)  

संपादन- भूषण श्रीखंडे