नंदुरबार जिल्ह्यात लॉकडाऊन वाढणार ?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

मंत्री जावडेकर यांनी कोरोनाची लागण कोठून व कशामुळे झाली असे विचारले असता डॉ. भोये यांनी स्पष्टपणे सांगितले की, आत्तापर्यंतच्या सर्व कोरोना पेशंटची ट्रॅव्हल हिस्ट्री काढली असता बहुतांश पेशंटचा मालेगावशी संबंध आढळून आला आहे.

तळोदा  : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अजून पंधरा त २८ दिवस लॉकडाऊनची आवश्यकता आहे. आतापर्यत नियंत्रणात असलेली स्थिती टिकवून ती नियंत्रणातत राहण्यासाठी लॉकडाऊन वाढविले पाहिजे असे स्पष्ट मत जिल्हा आरोग्य यंत्रणेनेने मांडले आहे. जिल्ह्यात कोरोनाचे बहुतांश पेशंटचा मालेगावशी संबंध आढळून आला आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

आर्वजून पहा : अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या चालकाला हेरले कोरोनाने; पंधरावर्षीय मुलीचाही समावेश 
 

कोरोनाची नंदुरबार जिल्ह्यातील स्थिती नेमकी कशी आहे, आरोग्य प्रशासनतर्फे उपाययोजना आणि जनतेचा प्रतिसाद याबाबत जाणून घेण्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांच्याशी आज सकाळी दुरध्वनीवरून संपर्क साधला. त्यावेळी श्री.भोये यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी डॉ. राजेश वसावे हेही उपस्थित होते. 

'नमस्ते, पहिले तुमची आणि घरांच्या सगळ्याची तब्येत चांगली आहे ना?' अशी आपुलकीची सुरुवात करीत मंत्री जावडेकर यांनी डॉ. भोये यांच्याशी संपर्क साधून जिल्ह्याची एकंदरीत परिस्थिती जाणून घेतली. मंत्री जावडेकर यांनी नर्सेस व डॉक्टरांची देखील आस्थेवाईकपणे चौकशी केली. जे नर्सेस, डॉक्टर सेवा देत आहेत, त्यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था नंदुरबार नर्सिंग कॉलेजला केली असल्याचे सांगत डॉ. भोये यांनी सद्य स्थितीतील जिल्ह्यातील कोरोना पेशंट किती आहेत व एकंदरीत परिस्थितीबाबत मंत्री जावडेकर यांना अवगत केले. 

डॉ. भोये म्हणाले,‘ नंदुरबारमध्ये तीन ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत, त्याठिकाणी लॉकडाऊन बऱ्यापैकी असून या ठिकाणी आरोग्यपथक कार्यरत असून याठिकाणी स्क्रिनिंग चालू असल्याचे सांगितले. संवादाच्या शेवटी मंत्री जावडेकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेहनत घेणाऱ्या जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत त्यांना धन्यवाद देण्याचे डॉ. भोये यांना सांगितले. आपल्या संवादाला पूर्णविराम दिला. या संपूर्ण संवादाचे वैशिष्ट्य म्हणजे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी क्वचितच इंग्रजी शब्द उच्चारलेत आणि संपूर्ण संवाद जवळपास मराठीतच साधला. 

नक्की वाचा :  डॉक्‍टरांनी केली टाळाटाळ... रुग्णाला घेवून संतप्त नातेवाईक थेट प्रातांकार्यालयात ! 
 

मालेगाव कनेक्शन स्पष्ट दिसते 
मंत्री जावडेकर यांनी कोरोनाची लागण कोठून व कशामुळे झाली असे विचारले असता डॉ. भोये यांनी स्पष्टपणे सांगितले की, आत्तापर्यंतच्या सर्व कोरोना पेशंटची ट्रॅव्हल हिस्ट्री काढली असता बहुतांश पेशंटचा मालेगावशी संबंध आढळून आला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाची लागण मालेगावमुळेच झाल्याचे स्पष्ट होत आहे. गुजरातकडून कोरोनाचा संसर्ग झालेला नाही असे देखील डॉ. भोये यांनी नमूद केले. 

लॉकडाऊन वाढविणे हिताचे 
मंत्री जावडेकर यांनी लॉकडाऊन उघडल्यानंतर काय परिस्थिती राहील असे विचारले असता डॉ. भोये यांनी सांगितले की, लॉकडाऊन अजून १५ ते २८ दिवस तरी राहिले पाहिजे, त्यानंतर हटविले पाहिजे. लॉकडाऊन हटविल्यानंतर कोरोनाच्या केसेस येतील, पण एका मर्यादित स्वरूपात येतील असे देखील त्यांनी सांगितले. लॉकडाऊनची सक्तीने अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी सांगितले. 

क्‍लिक कराः गुजरातमधून अठराशे मजूर जिल्ह्यात परतले 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Taloda Lockdown to increase in Nandurbar district