esakal | कांदा निर्यातीची संधी असतानाही केंद्र सरकारचे "हातावर हात'! 
sakal

बोलून बातमी शोधा

onion price 4.jpg

नाशिक जिल्ह्यातून कांद्याची निर्यात सुरू असताना दिवसाला पाच, दहा, पंचवीस किलोच्या एक ते चार लाख पिशव्या लागतात. जिल्ह्यातून शंभर कंटेनर कांदा निर्यातीसाठी दिवसाला पाठवताना लाखभर पिशव्या वापरल्या जातात. कांद्याच्या प्रतवारीसाठी नाशिक आणि मुंबई अशा दोन्ही ठिकाणी सहा ते सात लाख मजुरांची आवश्‍यकता भासते. आता मात्र निर्यातबंद असल्याने पिशव्यांचे कारखानदार, मजूर, कंटेनरचे चालक-वाहक-मालक अशा साऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. कंटेनर मालकांना कर्जाचे हप्ते फेडणे कठीण झाले आहे. त्याचवेळी परकीय चलनावर पाणी सोडावे लागत आहे. 

कांदा निर्यातीची संधी असतानाही केंद्र सरकारचे "हातावर हात'! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक/रेडगाव खुर्द, : जगात उत्पादित होणाऱ्या कांद्यामध्ये 28.68 टक्के हिस्सा असलेला चीन कोरोनाग्रस्त झाला आहे. त्यामुळे चीनचे आयात-निर्यात व्यवहार थंडावलेले असतानाच संभाव्य कमतरतेच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानच्या मंत्रिमंडळ आर्थिक समन्वय समितीने 30 मेपर्यंत कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताला कांदा निर्यातीची संधी चालून आली आहे. मात्र, प्रत्यक्षात केंद्र सरकारची त्या दिशेने पावले पडत नसल्याने शेतकऱ्यांमधील अस्वस्थता वाढली आहे. 

चीनमध्ये कोरोना, तर पाकची निर्यातबंदी; ग्राहक वळण्याची भीती 

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय तातडीने न घेतल्यास जागतिक स्तरावरील ग्राहक हॉलंड, ऑस्ट्रेलियाकडे वळण्याची भीती निर्यातदारांमधून व्यक्त होत आहे. मुळातच कांदा उत्पादनात सव्वादोन टक्के हिस्सा असलेल्या बांगलादेशमध्ये कांद्याचे उत्पादन साडेचार लाख टन होते. बांगलादेशसाठी सहा लाख टन कांद्याची आवश्‍यकता भासते. कांद्याची ही गरज भारताप्रमाणे चीनकडून भागवली जाते. कोरोनाच्या समस्येमुळे चीनमधून आणि निर्यातबंदीमुळे भारताकडून कांदा मिळणे बंद झाल्याने बांगलादेशमध्ये कांद्याचे भाव किलोला 25 रुपयांनी वाढले आहेत. ढाका अन्‌ रावळपिंडीतही किलोभर कांद्याचा घाऊक भाव 85 रुपयांपर्यंत पोचला आहे. चीनमध्ये किलोचा घाऊक भाव 60 रुपयांपुढे गेला आहे. पाकिस्तानमध्ये कांद्याचा दुसरा हंगाम मेच्या मध्यापासून सुरू होत असल्याने, तेथील कांदा निर्यातबंदी उठवली जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्याचा विचार केंद्र सरकारने करायला हवा, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

तुर्की, बांगलादेशातील कांदा लागवडीचे आव्हान 
सिंगापूर, दुबई, मलेशिया, हॉंगकॉंग, आखाती देश, बांगलादेश हे भारतीय कांद्याचे ग्राहक आहेत. मात्र भारताच्या निर्यातीच्या धरसोड वृत्तीमुळे जागतिक बाजारपेठेतील हक्काच्या ग्राहकांनी इतर देशांकडून कांदा घेण्यास सुरवात केली. अशातच, तुर्कस्थानमधून कांद्याची आयात झाल्याने तिथे पुढील हंगामात कांदा लागवडीत 25 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. तसेच भारतातून कांदा निर्यात होत नसल्याने बांगलादेश सरकारने नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत कांद्याची लागवड 30 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ही सर्व परिस्थिती जागतिक बाजारपेठेत तुर्कस्थानच्या वाढणाऱ्या उत्पादनाबरोबर बांगलादेशचे कमी होणारे ग्राहक हे भारतीय कांद्यापुढे आव्हान असेल. येत्या काही दिवसांत नवीन कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येणार असल्याने जागतिक बाजारपेठेत ग्राहक आणायचे कोठून? असा गंभीर प्रश्‍न भारतीय कांद्यापुढे तयार होणार आहे. 

कांद्याची अर्थव्यवस्था कोलमडली 
नाशिक जिल्ह्यातून कांद्याची निर्यात सुरू असताना दिवसाला पाच, दहा, पंचवीस किलोच्या एक ते चार लाख पिशव्या लागतात. जिल्ह्यातून शंभर कंटेनर कांदा निर्यातीसाठी दिवसाला पाठवताना लाखभर पिशव्या वापरल्या जातात. कांद्याच्या प्रतवारीसाठी नाशिक आणि मुंबई अशा दोन्ही ठिकाणी सहा ते सात लाख मजुरांची आवश्‍यकता भासते. आता मात्र निर्यातबंद असल्याने पिशव्यांचे कारखानदार, मजूर, कंटेनरचे चालक-वाहक-मालक अशा साऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. कंटेनर मालकांना कर्जाचे हप्ते फेडणे कठीण झाले आहे. त्याचवेळी परकीय चलनावर पाणी सोडावे लागत आहे. 

आगारात भाव नियंत्रणात 
देशांतर्गत कांद्याची मागणी वाढल्याने नाशिकचा कांदा मोठ्या प्रमाणात खपत आहे. प्रत्यक्षात मात्र भाव नियंत्रणात आहेत. हीच परिस्थिती कांद्याच्या उत्पादक पट्ट्यात पाहायला मिळते. गुरुवारी (ता. 20) घाऊक बाजारात क्विंटलला मिळालेला सरासरी भाव रुपयांमध्ये बाजारपेठनिहाय असा ः देवळा- दोन हजार 50, कळवण- एक हजार 950, लासलगाव- दोन हजार, मनमाड- एक हजार 850, येवला- एक हजार 870, पिंपळगाव- एक हजार 975, मुंबई- दोन हजार 50, कोल्हापूर- एक हजार 400, पुणे- एक हजार 800, आग्रा- दोन हजार 650, चेन्नई- दोन हजार 500, देवास- दोन हजार 200, इंदूर- एक हजार 800, कोलकता- तीन हजार, लखनौ- दोन हजार 150, पाटणा- दोन हजार 250, सुरत- एक हजार 800. 
 

हेही वाचा > भयंकर! इमारतीच्या गेटवर नाव भलतेच..अन् आतमध्ये चालायचा "धक्कादायक' प्रकार..

कांद्याच्या निर्यातबंदीचा सर्वांत मोठा कालावधी झाला आहे. त्यामुळे व्यापारातील जागतिक ग्राहक तुटले आहेत. एवढेच नव्हे, तर पुन्हा पत निर्माण करण्याचे आव्हान आहे. निर्यातबंदीपासून रोजगार बुडत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने तत्काळ निर्यातबंदी उठवण्याची आवश्‍यकता आहे. - विकास सिंह, कांदा निर्यातदार 

कांद्याची निर्यातबंदी उठवण्यासह निर्यात वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे सततचा पाठपुरावा सुरू आहे. त्यासंबंधीचा सकारात्मक शब्द सरकारकडून मिळाला आहे. येत्या आठवड्यात शेतकऱ्यांना नक्कीच आनंदाची बातमी मिळेल, अशी आशा आहे. -डॉ. भारती पवार, खासदार 

हेही वाचा > धक्कादायक! 'या' तंत्रज्ञानामुळे फेकन्यूज ओळखणंही होणार अवघड..कारण..

loading image