
नाशिक : शिवसेना महावटवृक्ष आहे. मात्र शिवसेनेच्या या वटवृक्षावर खासदार संजय राऊत नावाचे बांडगुळ बसले असून, ते बांडगुळ शिवसेनेचा वटवृक्ष संपवायला निघाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेच्या सच्चा कार्यकर्त्याला केरकचरा, पालापाचोळा म्हणणारे संजय राऊत यांचाच ‘डीएनए’ तपासण्याची गरज आहे.
संजय राऊत यापुढे आमच्यासाठी अदखलपात्र असल्याचे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सोमवारी (ता. ९) सांगितले. (CM Eknath Shinde Group statement about sanjay raut shivsena maharashtra politics nashik news)
खासदार संजय राऊत शनिवारी (ता. ७) नाशिकमध्ये आले होते. या वेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिंदे गटात प्रवेशकर्ते झालेल्या आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना पालापाचोळा व केरकचरा असे संबोधले होते.
त्या पार्श्वभूमीवर सोमवारी बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयात संयुक्त पत्रकार परिषद घेत खासदार राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला. श्री. बोरस्ते म्हणाले, की राज्यात महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात उत्तर महाराष्ट्राचे संपर्कनेते म्हणून संजय राऊत यांनी काम पाहिले.
या काळामध्ये शहराच्या विकासासाठी कुठला प्रकल्प आणला? व किती जणांना रोजगार दिले? याचा हिशेब त्यांनी द्यावा. ते केवळ पर्यटनासाठीच नाशिकमध्ये आले व येत आहेत. नाशिकला आल्यावर ते आपल्या बगलबच्चांना भेटी देतात, या बगलबच्चांना काही त्रास झाला तर ते त्यांना त्रास देतात. बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर आता आमचा घरोबा झाला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी, शहराच्या विकासासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो आहोत. आमचे काय होईल, ते जनताजनार्दन ठरवेल. मात्र साधे सरपंच म्हणूनही निवडून न येणाऱ्या राऊत यांनी आम्हाला पाडण्याची भाषा करू नये.
शिवसेनेच्या वटवृक्षावर बसलेले बांडगुळ आता स्वतःलाच वटवृक्ष समजत असून, ते स्वतःला प्रतिउद्धव ठाकरे म्हणून बोलू लागले आहेत. राऊत यांच्याकडून ठाकरे कुटुंबीयांची चेष्टा सुरू असून, शिवसेनेचा वटवृक्ष त्यांना कोसळवायचा आहे.
खासदार हेमंत गोडसे म्हणाले, की काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचे कटकारस्थान राऊत यांनीच रचले. अनैसर्गिक युतीमुळे शिवसैनिकांमध्ये खदखद निर्माण झाली. राऊत यांनी सातत्याने उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करून गैरसमज पसरविले. त्यामुळे पक्ष संपत आहे.
महानगरप्रमुख प्रवीण तिदमे म्हणाले, की खासदार राऊत फक्त शनिवारी व रविवारी वीकेंडला बडगुजर कंपनीचा हिशेब घेण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. योगेश बेलदार म्हणाले, की महापालिकेच्या सभागृहात मुशीर सय्यद यांनी ‘वंदे मातरम्’ला विरोध केला.
त्या वेळी शिवसैनिक आक्रमक झाले होते. मात्र, राऊत यांनी सय्यद यांच्या हॉटेलवर जाऊन बिर्याणीवर ताव मारला. हेच त्यांचे हिंदुत्व आहे का, असा पलटवार केला. माजी महानगरप्रमुख शिवाजी पालकर यांचे पुत्र रूपेश यांनी त्यांच्या वडिलांसोबत झालेला शिवसेना कार्यालयाचा करारनामा पत्रकार परिषदेत दाखवत आपण कार्यालयाचा ताबा घेऊ शकतो, असा दावा केला.
"शिवसेनेच्या सच्चा कार्यकर्त्यांना पालापाचोळा, कचरा म्हणणाऱ्या खासदार राऊत यांचाच डीएनए तपासण्याची आता गरज आहे. शिवसेनेचा वटवृक्ष संपवायला निघालेले खासदार राऊत हेच बांडगुळ असून, यापुढे ते आमच्यासाठी अदखलपात्र आहेत."
- अजय बोरस्ते, माजी विरोधी पक्षनेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.