
CM Shinde Unseasonal Rain Damage Survey : ‘महाराष्ट्रातील माझ्या शेतकरीराजाला वारंवार येणाऱ्या अवकाळी, गारपीट अशा नैसर्गिक संकटापासून वाचव, पुन्हा त्याच्यावर ही वेळ आणू नको’ अशी विनंती मी रविवारी (ता. ९) अयोध्येत प्रभू रामचंद्रांकडे करून आज (सोमवारी) इकडे बागलाणच्या शेतकऱ्यांकडे धावत आलो. (cm eknath shinde statement unseasonal rain damage Decisions taken by state government in interests of farmers nashik news)
राज्यातील युतीचे सरकार हे शेतकऱ्यांचे, तुमचे सरकार आहे. राज्यात नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे सरकार असल्यामुळे शेतकरी हिताचे निर्णय घेतोय. अवकाळी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीपुढे कोणाचेही काही चालत नाही. त्या तडाख्यातून शेतकऱ्याला स्थिर करण्यासाठी योग्य निर्णय घेत आहोत.
शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे, त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिजोटे (ता. बागलाण) येथे शेतकऱ्यांना दिले.
बागलाण तालुक्यात तीन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीच्या नुकसानग्रस्त करंजाड, निताणे, आखतवाडे, बिजोटे येथील शेतकऱ्यांची बांधावर भेट घेऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (ता.१०) दुपारी तातडीने तालुक्यात आले होते.
त्या वेळी मुरलीधर पवार, नरेंद्र पवार, शरद जाधव आदी शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त कांदा, द्राक्ष, डाळिंब, पपई, गहू, हरभरा यांसह भाजीपाला पिकांची पाहणी करून बांधावरच शेतकऱ्यांसमोर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
ते म्हणाले, की शासन या नैसर्गिक तडाख्यातून शेतकऱ्याला स्थिरस्थावर करण्यासाठी योग्य निर्णय घेत आहे. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवाला शासन जे जे देते, त्याला अजून काही जोड देता येईल का? याचा विचार आम्ही करीत आहोत.
द्राक्ष, डाळिंब या नगदी पिकांना अवकाळी व गारपिटीपासून वाचवण्यासाठी अस्तरीकरण, आच्छादनाचे कवच देण्याचा निर्णय सरकार लवकरच घेणार आहे. सध्याच्या या नैसर्गिक आपत्तीत एकूणच शासकीय यंत्रणेला अलर्ट केले आहे.
सर्व पिकांचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्यास नुकसानभरपाई देऊ. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी हमी मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली.
पालकमंत्री दादा भुसे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशवराव मांडवडे, तालुका कार्याध्यक्ष संजय पवार, नानाजी दळवी, पंचायत समितीचे माजी सभापती रामकृष्ण अहिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष मनोज सोनवणे, अरुण सोनवणे, बिंदू शर्मा,
आखतवाडेचे सरपंच अशोक खैरनार, बिजोटेचे सरपंच पोपट जाधव, गोराणेचे सरपंच दिनेश देसले, डॉ.शेखर मुळे, बळिराम जाधव, भाऊसाहेब कापडणीस, भाऊसाहेब अहिरे, युवराज पवार, नामपूर बाजार समितीचे सभापती कृष्णा भामरे, सटाणा बाजार समितीचे संचालक पंकज ठाकरे,
संजय बिरारी, वसंत पवार, शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव, मुख्यमंत्र्यांचे सचिव सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे, उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार जितेंद्र इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, कृषी अधिकारी सुधाकर पवार आदींसह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
दौऱ्याची क्षणचित्रे
• मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी ठीक अडीचला ढोलबारे येथे युद्धपातळीवर बनविण्यात आलेल्या हेलिपॅडवर आगमन. त्यांच्यासमवेत पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते.
• यानंतर शिंदे यांनी आपला ताफा तत्काळ नुकसानग्रस्त करंजाड, निताणे, आखतवाडे, बिजोटे या गावांकडे वळवला.
• शेतात साचलेल्या चिखलातून मार्ग काढीत मुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त कांदा, द्राक्ष, डाळिंब, पपई, गहू, हरभरा यांसह भाजीपाला पिकांची पाहणी.
• गारपीट व अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री बागलाण दौऱ्यावर आल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.
• दोन-तीन दिवसांत सरसकट पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश.
• नुकसानग्रस्त फळबागांसाठी दोन लाख रुपयांची तातडीने मदत देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुख्यमंत्री म्हणाले...
• राज्यातील सर्वच शेतकरी, कष्टकऱ्यांच्यामागे सरकार.
• केंद्र शासनाच्या सहा हजार रुपयांच्या पीएम किसान योजनेत वाढ करून राज्य शासनाने ती १२ हजार रुपयांची केली
• सर्व नियम बाजूला ठेवून आजपर्यंत सरसकट नुकसानभरपाई दिली.
• कांद्याला प्रतिक्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान दिले.
• नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदारास ५० टक्के अनुदान दिले.
• सतत शेतकऱ्यांच्या पाठीशी असणारे सरकार म्हणून विश्वास ठेवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.