Nashik News : चणकापूर धरणातून शेती व पिण्यासाठी आवर्तन; रब्बीसह उन्हाळी कांद्याला दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chankapur dam

Nashik News : चणकापूर धरणातून शेती व पिण्यासाठी आवर्तन; रब्बीसह उन्हाळी कांद्याला दिलासा

मालेगाव (जि. नाशिक) : चणकापूर धरणातून शेती व पिण्यासाठीचे संयुक्त आवर्तन सोडण्यात आले. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस (Rain) झाला. (combined cycle for agriculture and drinking was released from Chankapur Dam nashik news)

त्यामुळे या वर्षी धरणातून पहिले आवर्तन फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्याअखेर सोडण्यात आले. आवर्तनामुळे कसमादेतील लहान मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजनांना फायदा होणार आहे. शिवाय लाभ क्षेत्रातील रब्बी हंगाम व उन्हाळी कांद्याला फायदा होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

जिल्ह्यातील चणकापूरसह सर्व लहान-मोठी धरणे गेल्या वर्षी ओव्हरफ्लो झाली. पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला. परतीच्या पावसामुळे तलाव, पाझर तलाव, नद्या, नाले, शेततळे व विहिरी तुडूंब भरल्या. विविध गावांच्या जलसाठ्यांमध्ये मुबलक पाणी होते. ठेंगोडा उंचावणीच्या बंधाऱ्यातील पुरपाणी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सोडण्यात आले.

उपलब्ध पाण्यामुळे यावर्षी देखील चणकापूरचे पहिले आवर्तन सोडण्यास फेब्रुवारीचा दुसरा आठवडा उजाडला. शेततळे व विहिरींना चांगले पाणी असल्याने तालुक्यासह कसमादेत रब्बी हंगाम फुलला आहे. उपलब्ध पाण्यामुळे यावर्षी देखील उन्हाळी कांद्याची धूम आहे. कसमादेत विक्रमी कांदा लागवड करण्यात आली आहे.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

चणकापूर धरणातून शेती व पिण्यासाठीचे संयुक्त आवर्तन आहे. आवर्तनामुळे लाभ क्षेत्रातील शेतीला फायदा होईल. रब्बी पिकांबरोबरच टरबूज, खरबूज, डाळींब व उन्हाळी कांद्याला पाणी मिळत आहे.

मालेगावसह विविध पाणीपुरवठा योजनांचे जलसाठे भरून घेतले जात आहेत. १४ फेब्रुवारीला आवर्तन सोडण्यात आले. आणखी दोन ते तीन दिवस आवर्तन सुरु राहण्याची शक्यता आहे. धरणातील उपलब्ध जलसाठा पाहता सिंचनासाठी आणखी एक आवर्तन मिळू शकेल.

सिंचन व पिण्यासाठीचे संयुक्त आवर्तन एप्रिलच्या सुरवातीला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चणकापूरमधून गेल्या वर्षाप्रमाणे शेतीसाठी दोन आवर्तने देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

तळवाडे तलाव होणार ओव्हरफ्लो

मालेगाव महापालिकेच्या तळवाडे साठवण तलावातील जलसाठा २९ दशलक्ष घनफूटावरुन ४१ दशलक्ष घनफूटावर पोचला आहे. पुढील दोन दिवसात तलाव पूर्णपणे भरून घेतला जाणार आहे. तळवाडे तलावाची साठवण क्षमता ८७ दशलक्ष घनफूट आहे.

तलाव ओव्हरफ्लो झाल्यास आगामी दोन महिने मालेगावला मुबलक पाणी उपलब्ध होईल. दाभाडीसह बारागाव पाणीपुरवठा योजनेचा तलावही भरून घेतला जात आहे. कसमादेतील विविध पाणीपुरवठा योजनांचे जलसाठे भरले जात असून आगामी दीड ते दोन महिने हे पाणी सहज पुरू शकेल