esakal | "अपयश झाकण्यासाठी राज्य सरकारकडून आकड्यांचा खेळ".. गिरीश महाजन यांचा घणाघात
sakal

बोलून बातमी शोधा

girish mahajan and uddhav thakre.jpg

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षीची कामगिरी, केंद्रातर्फे कोरोना अटकावासाठी सुरू असलेले प्रयत्न, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची अंमलबजावणी व केंद्राने अनेक दशकांच्या समस्या सोडविण्यासाठी घेतलेले ऐतिहासिक निर्णय यांची माहिती देण्यासाठी भाजपच्या वसंत-स्मृती कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

"अपयश झाकण्यासाठी राज्य सरकारकडून आकड्यांचा खेळ".. गिरीश महाजन यांचा घणाघात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्य सरकारला कोरोनाचा प्रचार व प्रसार रोखणे सहज शक्‍य होते. परंतु नियोजन नसल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एकीकडे सर्वांचे स्वॅब घेण्याची यंत्रणा अस्तित्वात नसल्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे, तर दुसरीकडे राज्य सरकारकडून रुग्णांच्या अधिकृत संख्येबाबत आकड्यांची लपवाछपवी सुरू आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी रविवार (ता.7) येथे केला. 

गिरीश महाजन: सर्वांचे स्वॅब घेण्याच्या यंत्रणेचाच अभाव ​
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षीची कामगिरी, केंद्रातर्फे कोरोना अटकावासाठी सुरू असलेले प्रयत्न, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची अंमलबजावणी व केंद्राने अनेक दशकांच्या समस्या सोडविण्यासाठी घेतलेले ऐतिहासिक निर्णय यांची माहिती देण्यासाठी भाजपच्या वसंत-स्मृती कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाजन यांनी परराज्यातील मजुरांची पाठवणी, मोदींनी जाहीर केलेले लॉकडाउन, पंतप्रधान आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयामुळे भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. महापौर सतीश कुलकर्णी, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार ऍड. राहुल ढिकले, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, प्रशांत जाधव, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते. 


स्वॅबच्या रिपोर्टला 15 दिवसांचा कालावधी 
नाशिकच्या पंधरा रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले, पण काही वेळातच ते निगेटिव्ह असल्याचे सिद्ध झाले हे कसे काय? या प्रश्‍नाला उत्तर देताना आकडेवारी लपवण्याचा आरोप श्री. महाजन यांनी सरकारवर केला. शेजारील जळगाव, धुळे जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी हीच परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जळगावमध्ये रोज बारा ते पंधरा लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडत आहेत. कारण स्वॅबचा रिपोर्ट येण्यास पंधरा दिवस लागत असल्याकडे श्री. महाजन यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने या साथीचा प्रभावीपणे मुकाबला केल्याचे सांगत पंतप्रधानांच्या आवाहनाला देशवासदयांनी प्रतिसाद दिल्यामुळे हे शक्‍य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्री. महाजन म्हणाले, की केंद्राच्या आरोग्य सेतू ऍपमधूनही मोठा फायदा झाला. मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात अपयश आल्यामुळे मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढले. नियोजनाचा अभाव असल्यामुळे मुंबई व राज्याच्या अनेक भागांत कोरोनारुग्ण वाढले आहेत. कोणाला काम करू देणार नाही अन्‌ स्वतःही करणार नाही, असे धोरण सध्या राज्य सरकारचे आहे. 


सोनू सूदच्या पाठीशी 
"सामना'मधून खासदार संजय राऊत यांनी "एकटा सोनू सूद खरा!', अशा आशयाचे रोखठोक लिहून फटकारले आहे. त्यासंबंधाने विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री. महाजन यांनी अभिनेते सोनू सूद याने मदत केली त्यात चुकीचे काय? वावगे काय? असे प्रश्‍न उपस्थित करत "आम्ही काय करणार नाही, हे योग्य नाही', अशा शब्दांमध्ये राज्य सरकारला फटकारले. 

हेही वाचा > धगधगते वास्तव...मुख्यमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांपर्यंत पोचली पण बॅंकांना सांगणार कोण?

गिरीश महाजन म्हणाले... 
0 अर्थव्यवस्था पुनर्स्थापित होण्यासाठी केंद्राचे एक लाख 70 हजार कोटींचे पॅकेज 
0 रेल्वेद्वारे विविध राज्यांतून 52 लाख मजुरांची त्यांच्या राज्यात पाठवणी 
0 देशातील 42 कोटी गरजूंना 53 हजार 248 कोटी रुपयांची मदत 
0 मोफत धान्य, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे 
0 गरीब कुटुंबीयांना मोफत गॅस 
0 जनधन खाते असणाऱ्यांच्या खात्यात थेट मदत 

हेही वाचा > संजय राऊत ऐकलतं का?...'सोनू सूदच्या पाठीशी गिरीश महाजन खंबीरपणे उभे आहे हं!'

loading image