esakal | १८ ते ४४ वयोगटातून पहिल्‍या दिवशी अवघ्या २७६ व्‍यक्‍तींचे लसीकरण!

बोलून बातमी शोधा

covid 19 vaccination
१८ ते ४४ वयोगटात पहिल्‍या दिवशी अवघ्या २७६ जणांचे लसीकरण!
sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : कोरोना महामारीचा मुकाबला करतांना चाचणी वाढविण्यासह आता लसीकरण मोहिमेची गती वाढविण्यावर भर दिला जातो आहे. याअनुषंगाने शनिवार (ता.१) पासून १८ ते ४४ वयोगटातील व्‍यक्‍तींसाठीही कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची संधी उपलब्‍ध करून दिली आहे. परंतु पहिल्‍या दिवशी नाशिक जिल्‍ह्‍यात या वयोगटातील अवघ्या २७६ व्‍यक्‍तींनी लस घेतली आहे.

...पण लस उपलब्ध नाही

लसीकरण मोहिमेची व्‍याप्ती वाढविली असली तरी इतक्‍या मोठ्या लोकसंख्येला लसीकरण करण्याइतका लशींचा साठा अद्याप उपलब्‍ध झालेला नाही. मर्यादित स्‍वरूपातील साठा सध्यातरी उपलब्‍ध होतो आहे. ४५ वयोगटापुढील व्‍यक्‍तींना नोंदणी करून किंवा लसीकरणाला थेट भेट देत ऑफलाईन स्‍वरूपात लसीकरणाचा पर्याय उपलब्‍ध केलेला आहे. परंतु १८ ते ४४ वयोगटातील व्‍यक्‍तींना ऑनलाइन नोंदणीशिवाय लसीकरणाचा लाभ घेता येणार नाही. त्‍याकरीता आरोग्‍य सेतू, उमंग ॲप किंवा को-विन वेबपोर्टलद्वारे नोंदणी करून लसीकरणासाठी मागणी नोंदवायची आहे. या गटातील अनेकांनी नोंदणी केली असली तरी त्‍यांना बुकींगसाठीचे पर्याय उपलब्‍ध होत नसल्‍याचे सांगितले जात आहे. लशींची उपलब्‍धता झाल्‍यास बुकींग करून त्‍या दिवशी लसीकरण करुन घेता येईल, असे सांगितले जाते आहे.

हेही वाचा: कोरोना काळात 'या' कंपनीत मात्र घसघशीत पगारवाढ!

जिल्ह्यात असे झाले लसीकरण…

१८ ते ४४ वयोगटातून नाशिक महापालिका क्षेत्रातील १८५ व्‍यक्‍तींनी लसीकरण केले. नाशिक ग्रामीणमध्ये ७७ व्‍यक्‍तींनी लसीकरण केले आहे. ग्रामीण भागात केवळ दोनच तालुक्‍यात लसीकरण झाल्‍याचे आकडेवारीतून स्‍पष्ट होते. निफाड तालुक्‍यात ४९, तर दिंडोरी तालुक्‍यात २८ व्‍यक्‍तींनी लस घेतली. मालेगाव महापालिका क्षेत्रात चौदा व्‍यक्‍तींचे लसीकरण झाले. खासगी रुग्‍णालयात जिल्‍ह्‍यात १८ ते ४४ वयोगटातील एकाही व्‍यक्‍तींचे लसीकरण करण्यात आलेले नाही.

हेही वाचा: फ्रंट लाईन वर्कर्सना मिळेना बेड! अखेर पोलिस आयुक्तांनी घेतला पुढाकार