esakal | महापालिका करणार ऑक्सिजनचे ऑडिट; ॲपच्या माध्यमातून समजणार साठा
sakal

बोलून बातमी शोधा

oxygen storage in nashik

महापालिका करणार ऑक्सिजनचे ऑडिट; ॲपच्या माध्यमातून समजणार साठा

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोना (coronavirus) दुसऱ्या लाटेमध्ये शहरातील सरकारी व खासगी वैद्यकीय व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्यानंतर महापालिकेने तिसरी लाट लक्षात घेऊन शहरातील रुग्णालयांना पुरविल्या जाणाऱ्या ऑक्सिजनचे ऑडिट (oxygen audit) करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्सिजनचे ऑडिट करतानाच महापालिकेच्यावतीने ऑक्सिजनचा साठा दर्शविणाऱ्या ॲपची (mobile app) निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Oxygen reserves will be known in Nashik through the app)

गेल्या वर्षाच्या तुलनेत तिप्पट रुग्णसंख्या

फेब्रुवारीच्या अखेरीस शहरात कोरोनाची दुसरी लाट आली. प्रारंभी रुग्ण संख्येचा वेग कमी होता, त्यानंतर मात्र झपाट्याने रुग्णांची संख्या वाढू लागली. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात साडेआठ हजार रुग्ण आढळून आले होते. यावर्षी एप्रिल महिन्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २८ हजारपर्यंत पोहचली. गेल्या वर्षाच्या तुलनेत तिप्पट रुग्णसंख्या आढळून आले. सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १८ हजाराच्या आसपास असली तरी महापालिकेच्या दृष्टीने ही संख्या फारच मोठी आहे. गेल्या अडीच ते तीन महिन्यात रुग्ण वाढीमुळे सरकारी व खासगी वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. त्यामध्ये सर्वात मोठी अडचण ठरली ती ऑक्सिजनची. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागल्याची भीती व्यक्त होत आहे. ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक रुग्णालयांना नातेवाइकांना रुग्ण हलविण्याच्या सूचना दिल्या होत्या.

हेही वाचा: कोरोना महामारीत सीटी स्कॅनचे मार्केट पाचपटीने ‘अप'

कुठे पूरक तर कुठे तुरळक पुरवठा

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा नियमित होत असला तरी खासगी रुग्णालयांमध्ये मात्र परिस्थिती बिकट राहिली. ११२ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता असताना ८५ मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा होत असल्याने रुग्णालयांची तारांबळ उडाली. काही रुग्णालयांमध्ये अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी खरोखर रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन वापरला गेला का याचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: International No Diet Day : डाएटला द्या एक दिवस सुट्टी!

ॲप देणार माहिती

संभावित तिसरी लाट व ऑक्सिजन कमतरतेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेमार्फत ऑक्सिजनची माहिती देणारे ॲप विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील रुग्णालयांमधील ऑक्‍सिजनचा साठा किती प्रमाणात आहे, याचे मोजमाप ॲपच्या माध्यमातून होईल. कुठल्या रुग्णालयात किती ऑक्सिजन साठा आहे हे हिरवा लाल व नारंगी रंगातून लक्षात येईल. पाच ते सहा दिवस पुरेल इतका ऑक्सिजन साठा असल्यास हिरवा रंग, २४ तास पुरेल इतका ऑक्‍सिजन असल्यास नारंगी रंग तर पाच ते सहा तास ऑक्सिजन पुरेल एवढा साठा असल्यास लाल रंग ॲपच्या माध्यमातून समजेल.

Oxygen reserves will be known in Nashik through the app