
Nashik News : त्र्यंबकेश्वरमधील तीर्थे लोप पावताहेत; पावित्र्यासोबत अतिक्रमणांची समस्या गंभीर
त्र्यंबकेश्वर : गौतम ऋषींची तपभूमी म्हणून त्र्यंबकेश्वर ओळखले जाते. भगवान शंकरांना प्रसन्न करून गोदावरीला पृथ्वीवर आणल्याने ‘गौतमी गंगा’ या नावाने ओळखली जाऊ लागली.
‘त्र्यं' म्हणजे, तीन अन् ‘अंबक' म्हणजे डोळे. अर्थात, तीन डोळे असलेला ईश्वर अशी ख्याती असलेल्या त्र्यंबकेश्वर अनेक तीर्थांमुळे तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला आले आहे. अशा तीर्थक्षेत्रातील तीर्थे लोप पावत आहेत.
पावित्र्यासोबत अतिक्रमणाची समस्या गंभीर बनली आहे. एवढेच नव्हे, तर अनधिकृत बांधकामांचा धोका बळावला आहे. (Shrines in Trimbakeshwar are disappearing problem of encroachment sanctity serious Danger of unauthorised construction Nashik News)
गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताला भगवान शंकर म्हणून भाविकांमध्ये श्रद्धास्थान आहे. पर्वतास प्रदक्षिणा घातली जाते. इथले गोदावरीवरील पवित्र तीर्थ कुशावर्त. गौतम ऋषींच्या गोहत्येचे पातक तीर्थातील स्नानाने नष्ट झाल्याची आख्यायिका आहे.
एवढेच नव्हे, तर सिंहस्थ कुंभमेळ्यातील तीनही पर्वणीवेळी साधु-संत-महंतांचे कुशावर्तात शाहीस्नान होते. पेशव्यांचे सरदार पारनेरकरांनी त्याचे बांधकाम केले. अशा कुशावर्तामधील तीर्थरूपी जलाची अवस्था बिकट झाली आहे. सरकारने तीर्थावर ‘फिल्टर प्लँट’ बसवला असला, तरीही तीर्थाची अवस्था ‘जैसे थे’ आहे.
हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...
बल्लाळ, वाराणसी, मणिकर्णिका, गंगालय, राम-लक्ष्मण, साली, इंद्र, कांचन, अहिल्या संगम, गौतम, मुकुंद अशी अनेक तीर्थे त्र्यंबकेश्वरमध्ये आहेत. वेगवेगळ्या देवतांच्या नावाने व वेगवेगळ्या पद्धतीने महत्त्व असलेल्या तीर्थांच्या पावित्र्याचा आणि अस्तित्वाचा प्रश्न बिकट बनला आहे.
गौतम व मुकुंद या तीर्थ भागात सर्वत्र अतिक्रमण झाले आहे. त्याच्या कोटाच्या भिंती पाडण्यात आल्या आहेत. त्यात पाणी टिकून राहणार नाही, अशी योजना भूमाफियांनी केली आहे. परिणामी, हळूहळू इथे बांधकामे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रहिवाशी भागातील तीर्थ तग धरून
काही तीर्थे रहिवासी वाड्यांजवळ असल्याने ती तग धरून आहेत. प्रयागतीर्थ पेगलवाडी गाव हद्दीत आहे. नरसिंह तीर्थ जुने कुशावर्त अशी अनेक तीर्थे की, ज्यांच्या पाण्यावर मनुष्य व जनावरे आपली तहान भागवू शकतील या दूरदृष्टीने त्याकाळी उभारलेली व बांधीव तीर्थे नष्ट होत आहेत.
त्यामुळे रस्ते आणि गटारी बांधकाम म्हणजे, विकास या संकल्पनेच्या पुढे जाऊन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने तीर्थांचे अस्तित्व आणि पावित्र्य राखण्याची खबरदारी घ्यावी लागेल, अशी त्र्यंबकेश्वरमधील रहिवाशांची इच्छा आहे. तीर्थांसह कुंडे जसे सूरज, हनुमान, कंचन यांच्याही संवर्धनाचा विचार शहरवासीयांना आवश्यक वाटत आहे.