Dhule Water Scarcity : साक्री शहराला करावा लागतोय टंचाईचा सामना, 3 दिवसांत मिळतेय पाणी

 Water scarcity
Water scarcityesakal

Dhule News : चहूबाजूने वाढणाऱ्या साक्री शहराच्या दिवसागणित गरजा देखील वाढत आहेत. यात प्रत्येकाची दैनंदिन गरज असणाऱ्या पाण्याची गरजदेखील मोठ्या प्रमाणात वाढत असून, मुबलक पाणीपुरवठ्यासाठी नगरपंचायत प्रयत्नशील आहे.

मात्र तरीही सध्या शहरवासीयांना दोन ते तीन दिवसांआड पाणी मिळत आहे.(Sakri city is facing water scarcity dhule news)

भविष्यात हा कालावधी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी नगरपंचायत प्रशासनाने टंचाई निवारणासाठी आत्तापासून काटेकोर नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. सद्यःस्थितीत तीस हजारांच्या घरात लोकसंख्या पोहोचलेल्या साक्री शहराला पाच जलकुंभांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. यात प्रामुख्याने कावठे आणि दातर्ती येथील पाणीपुरवठ्याच्या मुख्य दोन योजना आहेत.

या योजनांमधून थेट घरपोच पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय शहरात गेल्या वर्षभरात विधान परिषद आमदार अमरिशभाई पटेल यांच्या निधीतून सहा, तर त्यांच्या वैयक्तिक खर्चातून बारा ठिकाणी कूपनलिका करण्यात आल्या आहेत. या कूपनलिकेच्या माध्यमातून पाणी पुरविले जात असले तरी शहरवासीयांना दोन ते तीन दिवसांआड पाणी मिळते आहे.

शहरातील जुन्या रहिवासी भागात कधी यासाठी आणखीन विलंब होत असल्याने यातून टंचाईची समस्या निर्माण होते. पाणी ही प्रत्येकाची दैनंदिन गरज असल्याने ते दररोज किंवा किमान एक दिवसाआड मिळणे गरजेचे आहे. मात्र अशा परिस्थितीत आतापासूनच दोन ते तीन दिवसांनी मिळणाऱ्या पाण्यामुळे शहरवासीयांना मात्र आतापासूनच टंचाईचा सामना करावा लागतो आहे.

यंदा अत्यल्प पावसामुळे दुष्काळाचे सावट असल्याने जानेवारीपासूनच भीषण टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. अशावेळी नगरपंचायत प्रशासनाने आत्तापासूनच या दृष्टीने काटेकोर नियोजन करत शहरवासीयांना या टंचाईकाळात किमान गरजेइतके पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज आहे.

 Water scarcity
Dhule News: धुळे तालुका शिक्षण विभागात 47 पदे रिक्त; पदवीधर शिक्षकांची संख्या अधिक

''शहरातील रहिवाशांच्या गरजेइतके मुबलक पाणी सध्या उपलब्ध असतानादेखील केवळ नियोजनाअभावी शहरवासीयांना टंचाईचा सामना करावा लागतो आहे. आतापासूनच कॉलनी परिसरात तीन दिवसांनी, तर जुन्या गावात पाच दिवसांनी पाणी मिळते आहे. ही परिस्थिती पुढे आणखीन बिकट होणार असून, त्यातही आतापासूनच नियोजनाची गरज आहे.

मंजूर मालनगाव योजना पुढे नेली असती तर ती योजना आतापर्यंत पूर्णत्वास येऊन शहर टंचाईमुक्त झाले असते. मात्र राजकीय ‘इगो’मुळे चांगल्या योजनेला ब्रेक लागल्याने टंचाईचा सामना करावा लागतो आहे. पाणीसारख्या महत्त्वाच्या विषयावर सत्ताधाऱ्यांना नेहमीच सहकार्याची भूमिका राहणार आहे.''- पंकज मराठे, विरोधी पक्षनेते, नगरपंचायत, साक्री

''शहरातील वर्षानुवर्षाची टंचाई दूर करत शहर टँकरमुक्त केले आहे. आमदार अमरिशभाई पटेल यांच्या दातृत्वातून करण्यात आलेल्या कूपनलिकेमुळे टंचाई निवारण्यास मोठी मदत झाली आहे. सध्या उपलब्ध पाण्याचे स्त्रोत बळकट करून भविष्यात एक दिवसाआड पाणी देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. तसेच भविष्यात संभाव्य टंचाई लक्षात घेत काटेकोर नियोजन करण्यावर देखील भर देत आहोत.''- रेखा आबासाहेब सोनवणे, सभापती, पाणीपुरवठा समिती, नगरपंचायत साक्री

 Water scarcity
Dhule Municipality News : भाजपविरोधात ‘राष्ट्रवादी’च्या अजित पवार गटाचे महासभेत आंदोलन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com