थकीत दंडाची 'पठाणी वसुली', पोलिसांना 'बॉडी वोर्न कॅमऱ्या'चे वाटप

अनिल कांबळे
Monday, 18 January 2021

आता पोलिसांसाठी वसुलीचे काम खासगी लोक करणार असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले. वाहतूक पोलिसांसोबत वाहनचालकाचे वाद नियमित होत असतात.

नागपूर : वाहतूक पोलिसांनी ठोठावलेला दंड अनेक वाहनचालक भरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आतापर्यंत १६ कोटींचा दंड थकीत आहे. ही रक्कम वसुली करण्यासाठी आता खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात येणार आहे. थकीत रक्कम पठाणी पद्धतीने वसूल करण्यात येईल, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

हेही वाचा - काळोखात कुत्रासदृश्य प्राणी दिसल्यानं मारली काठी, समोर येताच वाचवा-वाचवा ओरडली

पोलिस जिमखाना येथे 'बॉडी वोर्न कॅमेरे' प्रदान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यामुळे आता पोलिसांसाठी वसुलीचे काम खासगी लोक करणार असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले. वाहतूक पोलिसांसोबत वाहनचालकाचे वाद नियमित होत असतात. नियम तोडल्यानंतर पोलिसांनी गाडी पकडली की, चूक मान्य करण्याऐवजी चालक विनाकारण कारवाई करीत असल्याचा कांगावा करतात. पोलिसांसोबत असेच वाद टाळण्यासाठी नागपूर पोलिसांना २०० 'बॉडी वोर्न कॅमेरे' गृहमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 

हेही वाचा - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

यावेळी देशमुख म्हणाले की, पोलिस आणि नागरिक यांच्यात समन्वय कायम राखण्यासाठी हे कॅमेरे फायदेशीर ठरतील. पोलिसांच्या वर्दीवर कॅमेरा असल्यामुळे कुणी विनाकारण वादही घालणार नाही. आता सिग्नलवर स्पीकर्स बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे कंट्रोल रूममधूनच नागरिकांना निर्देश किंवा सूचना देता येतील. त्यानंतर रिलायन्सकडून आणखी ड्रोन घेण्यात येतील. पोलिसांनी विधायक कार्य करत राहावे. मी गृहमंत्री म्हणून सदैव त्यांच्या पाठीशी आहे, असेही गृहमंत्री यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी केले, तर डीसीपी निलोत्पल यांनी ड्रोनबाबत पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केले. यावेळी सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा - Gram Panchayat Result : दोन वर्षीय चिमुकलीने काढली ईश्वरचिठ्ठी अन् दोन उमेदवारांचे...

काय आहे 'बॉडी वोर्न कॅमेरा' - 
वाहतूक पोलिसांच्या वर्दीवर लावण्यासाठी केवळ ८५ ग्रॅम वजन असलेले कॅमेरा आहे. यामध्ये जीपीएस लोकेशन घेता येत असून डस्ट आणि वॉटर प्रूफ आहेत. कॅमेऱ्यात ऑडीओ आणि एचडी कॅमेरा असल्याने व्हिडिओ स्पष्टपणे रेकॉर्ड होते. अंधारही स्पष्ट दिसू शकते. आठ तासांची रेकॉर्डींग क्षमता असून १२८ जीबी स्टोरेज आहे. थेट कंट्रोल रूममधून कॅमेरा वापरणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याशी संपर्क साधता येते तसेच तेथील व्हिडिओसुद्धा दिसू शकतो. 

हेही वाचा - अख्खं गाव हळहळले! दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार, फुटला...

चिडिमारी रोखण्यासाठी वापर व्हावा - 
धूमस्टाईल बाईक चालविणारे आणि छेडखानी करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी 'बॉडी वोर्न कॅमेरा'चा वापर व्हावा. महिला पोलिसांकडे हे यंत्र देऊन रात्रीच्या वेळी रस्त्यावरून फेरफटका मारण्याची योजना करावी. त्या महिला पोलिसाच्या काही अंतरावर पोलिस पथक ठेवावे. चिडीमार करणाऱ्यांचा सामना झाल्यानंतर तेथील संभाषण आणि व्हिडिओ रेकॉर्ड होईल. त्यानंतर पोलिस पथकाने छापा मारून कारवाई करावी, असा सल्ला यावेळी गृहमंत्री देशमुख यांनी दिला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: body worn camera distributed to police in nagpur