नागपूरकर युवकाच्या फोटोला जागतिक बहुमान, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिला

Global honor to the photo of Nagpurs young boy
Global honor to the photo of Nagpurs young boy

नागपूर : एक सुंदर फोटो किंवा चित्र हजार शब्दांपेक्षाही अधिक प्रभावी व परिणामकारक असते, असे नेहमीच म्हटले जाते. याचा प्रत्यय नुकताच नागपूरच्या एका तरुणाला आंतरराष्ट्रीय छायाचित्रण स्पर्धेदरम्यान आला. त्याने काढलेल्या फोटोने थेट आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावून उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

रोहन पराडकर असे जागतिक पुरस्कार जिंकणाऱ्या या युवकाचे नाव. वर्ल्डवाईड फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ) ने अलीकडेच जगभरातील हौशी व व्यावसायिक फोटोग्राफर्सकरिता खुली छायाचित्रण स्पर्धा सोशल मीडियावर आयोजित केली होती. फोटोग्राफीसाठी " माय सिटी इन मोशन" हा तर, शहरांसाठी "वन प्लॅनेट सिटी चॅलेंज" हा विषय होता.

शाश्वत शहर वाहतूक (सस्टेनेबल सिटी ट्रान्सपोर्ट) अशी थीम असलेल्या या स्पर्धेत फोटोग्राफर्सना फेसबुक, ट्विटर किंवा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सहभागी व्हायचे होते. या स्पर्धेबद्दल महानगरपालिकेच्या माध्यमातून कळल्यानंतर रोहनने नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला. फोटोग्राफीचा शौकिन असलेल्या २० वर्षीय रोहनने लॉकडाउनदरम्यान अंबाझरी परिसरात काढलेले दोन-तीन फोटो डब्ल्यूडब्ल्यूएफचा हॅशटॅग देऊन इन्स्टाग्रामवर अपलोड केले.

त्यापैकी एका फोटोने स्पर्धेच्या ज्यूरींचे मन जिंकले. रोहनच्या या फोटोची वैयक्तिक गटात प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. शहर गटामध्ये फिलिपाईन्सच्या बटंगसने बाजी मारल्याचे रोहनने सांगितले. प्रत्येक देशातून तीन फायनलिस्ट निवडण्यात आले होते. ज्युरींनी फोटोचे मूल्यांकन करून अंतिम विजेत्यांची निवड केली.

विजेत्या रोहनला पुरस्काराबद्दल आयोजकांकडून कॅनन कंपनीचा महागडा कॅमेरा मिळणार आहे. दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धेसाठी जगभरातील निवडक शहरांची निवड केली जाते. यंदा भारतातून शाश्वत शहर वाहतूकीवर भर देणाऱ्या नागपूर, राजकोट आणि कोची या तीन शहरांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेनेही जास्तीतजास्त फोटोग्राफर्सना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

स्पर्धेत २६ देशांतील ५४ शहरातील साडेपाचशेच्या वर फोटोग्राफर्स सहभागी झाले होते. रोहन सेंट व्हिन्सेंट पलोटी कॉलेजचा विद्यार्थी असून, बी. ई. तृतीय वर्षात शिकतो. फोटोग्राफी माझी आवड असली तरी, भविष्यात मला मेकॅनिकल इंजिनिअर व्हायचे असल्याचे त्याने यावेळी सांगितले.

संपादन : अतुल मांगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com