निवडणूक विजयासाठी नव्हे तर प्रतिष्ठेसाठी ! 

file photo
file photo

नागपूर :  मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. जिल्ह्यातील मातब्बर नेते यात लक्ष घालून असल्याने काही सर्कलमधील लढतींकडे भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीतून पाहिले जात आहे. ही निवडणूक पुढच्या राजकारणाची दिशी ठरविणारी असल्याने प्रचारातही नेत्यांनी झोकून दिले होते. 

अनुसूचित जाती महिलासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राखीव झाल्यानंतर बेलोना, सोनेगाव निपानी, बेसा, टेकाडी व नांद सर्कलमध्ये उमेदवारीसाठी राजकीय चढाओढ दिसून आली. बेलोना सर्कलमध्ये भाजपच्या बबिता गजबे, शिवसेनेच्या अर्चना सोनोले, राकॉंच्या दीक्षा मुलताईकर यांच्यात तिरंगी लढत आहे. तर रेखा गजभिये व मीनाक्षी मडके या अपक्ष आहे. सोनेगाव निपानी सर्कलमध्ये कॉंग्रेसच्या भारती पाटील, भाजपच्या डॉ. पूजा उके यांच्यात थेट लढत आहे. येथून शिवसेनेच्या हर्षा मसराम निवडणूक रिंगणात आहे. बेसा सर्कलमध्ये कॉंग्रेसच्या मेघा मानकर, भाजपच्या कीर्ती बडोले यांच्यास लढत असून शिवसेनेच्या मनीषा इंगळे याही मैदानात आहेत. टेकाडी सर्कलमध्ये निवडणुकीपूर्वी चांगलेच घमासान रंगले होते. आता येथे चौरंगी लढत आहे. कॉंग्रेसच्या रश्‍मी बर्वे, भाजपच्या शालिनी बर्वे, शिवसेनेच्या वैशाली देविया तर प्रहारच्या विद्या पानतावने रिंगणात असून त्याच्यासमोर अपक्ष सुनीता मेश्राम यांचे आव्हान आहे. नांद सर्कल कॉंग्रेस बंडाळीचे भिवापूर तालुक्‍यातील केंद्र ठरले होते. येथून कॉंग्रेसच्या नेमावली माटे, भाजपच्या प्रतिभा मांडवकर, शिवसेनेच्या प्रीया मेश्राम, विकास आघाडीच्या रविता वर्मा यांच्यात लढत रंगणार आहे. 


हायप्रोफाईल उमेदवारांत टशन 
तालुक्‍यात केळवद सर्कलमध्ये कॉंग्रेसचे मनोहर कुंभारे, भाजपचे गिरीश मोवाडे, रासपचे विवेक मोवाडे यांच्यात लढत रंगली आहे. गोंडेगावमध्येही भाजपचे व्यंकट कारेमोरे, राष्ट्रवादीचे देविदास जामदार, शिवसेनेचे योगेश वाडीभस्मे, प्रहारचे किशोर बेलसर व अपक्ष शरद डोणेकर लढत आहेत. कामठी तालुक्‍यात कोराडीमधून कॉंग्रेसचे ज्ञानेश्‍वर (नाना) कंभाले, भाजपचे संजय मैंद, शिवसेनेचे वासू भोयर यांच्यात सामना आहे. मौदा तालुक्‍यात चाचेर मतदारसंघातून शिवसनेचे देवेंद्र गोडबोले, कॉंग्रेचे लक्ष्मण उमाळे, भाजपचे कैलास बरबटे यांच्यात चुरस आहे. धानला-चिरव्हा सर्कलमध्ये कॉंग्रेसचे तापेश्‍वर वैद्य, भाजपचे चांगो तिजारे यांच्यात थेट सामना आहे. खडकीमध्ये राष्ट्रवादीच्या उज्जवला बोढारे व माजी सभापती भाजपच्या वंदना पाल यांच्यात अटीतटीची लढत आहे. 


या लढतींवर विशेष लक्ष 
जिल्ह्यातील महत्त्वाच्या लढतीमध्ये नरखेड तालुक्‍यातील अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जलालखेडा सर्कलमध्ये कॉंग्रेसचे प्रितम कावरे, भाजपचे सुखदेव नेते, शिवसेनेचे गोपाल खंडाते यांच्यात सामना आहे. काटोल तालुक्‍यातील येनवा सर्कल राष्ट्रवादीने शेकापसाठी सोडले आहे. येथे शेकापचे समीर उमप, भाजपचे दिलीप ठाकरे, शिवसेनेचे प्रशांत मानकर यांच्यात लढत आहे. लगतच्या पारडसिंगा सर्कलमध्ये राष्ट्रवादीचे चंद्रशेखर कोल्हे, भाजपचे संदीप सरोदे यांच्यात लढत असून सेनेचे प्रमोद तिजारे यांनी सामना तिरंगी केला आहे. माहुली सर्कलमध्ये कॉंग्रेसचे राजू कुसुंबे, भाजपचे अशोक कुथे, शिवसेनेचे भगवान गद्रे यांच्यात लढत आहे. रामटेक तालुक्‍यात वंडबा सर्कलमधून कॉंग्रेसच्या शांता कुमरे, भाजपचे हेमंत जैन, सेनेचे हिरामन मरसकोल्हे यांच्यात चुरस आहे.नगरधनमध्ये सेनेचे नरेश धोपटे, भाजपचे राहुल किरपान, कॉंग्रेसचे दुधाराम सव्वालाखे यांच्या टक्कर आहे. कांद्रीमध्ये कॉंग्रेसचे मोहन यादव, भाजपचे डॉ. राजेश ठाकरे, सेनेचे संजय झाडे, प्रहारचे सुधाकर गोंगले यांच्यात लढत आहे. गुमथळा मधून भाजपचे अनिल निधानम कॉंग्रेसचे बबन ढोले व सेनेचे रवींद्र निकाळजे हे रिंगणात आहेत. भिलगावमध्ये भाजपचे मोहन माकडे, कॉंग्रेसचे प्रशांत काळे यांच्यात लढत होणार आहे. अरोलीमध्ये कॉंग्रेसचे योगेश देशमुख व भाजपचे अशोक हटवार यांच्यात लढत आहे. नागपूर ग्रामीण तालुक्‍यात खरबी मधून संदीप गायकवाड व भाजपचे राजू गुजरकर यांच्यात सामना आहे. राजोलामध्ये कॉंग्रेसचे अरुण हटवार, भाजपचे बालू ठवकर यांच्यात थेट सामना आहे. 


महिला राखीव जागांसाठीही चुरस 
कोंढाळी सर्कलमध्ये राष्ट्रवादीत बंडाळी झाल्याने राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार नीलिमा फिस्के यांना उमेदवारी दिली आहे. येथून भाजपच्या पुष्पा शेषराव चाफले व बंडखोर अमृता ढोरे यांच्यात लढत आहे. पारशिवनी तालुक्‍यात करंभाड सर्कलमध्ये भाजपच्या सरोज तांदुळकर व कॉंग्रेसच्या अर्चना भोयर यांच्यात सामना आहे. शिवसेनेच्या संजिवनी गोमकाळे, प्रहारच्या वर्षा फुटाने यांनी रंगत आणली आहे. वडोदा सर्कलमध्ये कॉंग्रेसच्या अवंतिका लेकुरवाळे, भाजपच्या अनिता चिकटे यांच्यात सामना आहे. डिगडोहमध्ये राष्ट्रवादीच्या सुचिता ठाकरे, भाजपचे रश्‍मी कोटगुले यांच्यात लढत आहे. वेलतूरमध्ये कॉंग्रेसच्या मेघा तितरमारे, भाजपच्या कविता साखरेवाडे, सेनेच्या उषा धनरे यांच्यात लढत आहे. मांढळमध्ये राष्ट्रवादीच्या मनीषा फेंडर, भाजपच्या रुपाली राऊत तर अपक्ष मंजू भुते यांच्यात समाना होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com