नागपूर पदवीधर निवडणूक : भाजप मतदारसंघ राखणार की काँग्रेस खाते उघडणार? आज मतदार ठरविणार उमेदवारांचे भवितव्य

राजेश चरपे
Tuesday, 1 December 2020

मतदान केंद्रावर मास्क, रबरी हातमोजे, फेसशिल्ड, १५ पीपीई किट, मेडिसिन किट यामध्ये पॅरॉसिटॅमॉल यासह आवश्यक सर्व औषधांचा समावेश राहणार आहेत. थर्मल गन, हँण्ड सॅनिटयजर, साबण, सोडिअम हायपोक्लोरॉईड, आदींसह १५ आवश्यक साहित्य प्रत्येक मतदान केंद्रावर पुरविणार आहे. 

नागपूर : नागपूर विभागीय पदवीधर संघाच्या निवडणुकीसाठी उद्या मंगळवारी (ता.१) मतदान होणार असून भाजपपुढे आपला परंपरागत मतदारसंघ कायम राखण्याचे आव्हान आहे. भाजपने महापौर संदीप जोशी या युवा नेत्याला उमेदवारी दिली असून यंदा काँग्रेसने प्रथमच अधिकृत उमेदवार म्हणून अ‌ॅड. अभिजित वंजारी यांना रिंगणात उतरवले आहे. याशिवाय एकूण १९ उमेदवार लढत देत आहेत. 

हेही वाचा - Big breaking : बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

संदीप जोशी माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आहेत. महाआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने सर्व राज्याचे या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची असल्याने भाजपने आपली सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. अंतर्गत मतभेदसुद्धा चव्हाट्यावर येऊ दिले नाही. उलट सर्व प्रमुख नेत्यांना एका व्यासपीठावर आणले. पदवीधरांचा मेळावा घेऊन 'हम साथ साथ है...'चा संदेशही दिली. स्वतः फडणवीस दोन दिवसांपासून नागपूरमध्ये ठाण मांडून बसले आहेत. 

हेही वाचा - बाबा आमटेंची नात ते महारोगी सेवा समितीच्या सीईओ, डॉ....

राज्यात महाआघाडीचे सरकार असल्याने अ‌ॅड. अभिजित वंजारी यांनाही सर्व नेत्यांची साथ मिळत आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, गृहमंत्री अनिल देशमुख, विधान सभेचे अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल पटेल आदी बडे नेत्यांनी वंजारी यांच्यासाठी प्रचार केला आहे. शिवाय स्वतः वंजारी दीड वर्षांपासून मतदारसंघात तयारी करीत होते. याचा निश्चितच फायदा त्यांना होणार आहे. विशेष म्हणजे मागासवर्गीयांची एक गठ्ठा मते घेणाऱ्या बसपाने यावेळी उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे बसपची व्होट बँक कोणाच्या पारड्यात मते टाकतात त्यावरसुद्धा उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. विदर्भाच्या अनुशेषाचे अभ्यासक नितीन रोंघे हेसुद्धा भवितव्य आजमावित आहेत. 

हेही वाचा - 'War and Peace' : आत्महत्येच्या काही...

असे आहेत उमेदवार - 
नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत १९ उमेदवार रिंगणात आहेत. अभिजित वंजारी ( भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ), संदीप जोशी (भाजप), राजेंद्रकुमार चौधरी (रिपाई , राहुल वानखेडे (वंचित बहुजन आघाडी), अ‌ॅड सुनिता पाटील (इंडियन नॅशनल मानवाधिकार पार्टी), अतुलकुमार खोब्रागडे, अमित मेश्राम, प्रशांत डेकाटे, नितीन रोघें, नितेश कराळे, डॉ. प्रकाश रामटेके, बबन ऊर्फ अजय तायवाडे, अ‌ॅड .मोहम्मद शाकीर अ.गफ्फार, सिए. राजेद्र भुतडा, प्रा.डॉ.विनोद राऊत, अ‌ॅड. वीरेंद्र कुमार जयस्वाल, शरद जीवतोडे , प्रा.संगीता बढे, संजय नासरे(सर्व अपक्ष). 

हेही वाचा - ‘ई सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत काय म्हणाल्या होत्या डॉ. शीतल आमटे, वाचा सविस्तर...

कोरोनाग्रस्तांसाठी चार वाजता मतदान -
कोरोनाबाधित असलेल्या पदवीधर मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विभागातील सर्व मतदान केंद्रावर शेवटच्या एक तासांत विशेष सुरक्षेत मतदान करता येईल. दुपारी ४ ते ५ यावेळात मतदान केंद्रावर पीपीई किट पुरविण्यात आल्या आहेत. मतदान केंद्र अधिकारी यांनी सुरक्षेच्या सर्व खबरदारी घेऊन या मतदारांना मतदान करू शकतील. 

हेही वाचा - काँग्रेस, भाजपने केली प्रतिष्ठेची निवडणूक; मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा

अशी घेणार काळजी -
मतदान केंद्रावर मास्क, रबरी हातमोजे, फेसशिल्ड, १५ पीपीई किट, मेडिसिन किट यामध्ये पॅरॉसिटॅमॉल यासह आवश्यक सर्व औषधांचा समावेश राहणार आहेत. थर्मल गन, हँण्ड सॅनिटयजर, साबण, सोडिअम हायपोक्लोरॉईड, आदींसह १५ आवश्यक साहित्य प्रत्येक मतदान केंद्रावर पुरविणार आहे. 

हेही वाचा - शेतजमिनीला मोल येताच नात्यात कटुता, एक स्वाक्षरी...

जिल्हानिहाय मतदार - 
विभागात दोन लाख ६ हजार ४५४ असून त्यापैकी १ लाख २ हजार ८०९ मतदार हे एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. नागपूर ग्रामीण २३ हजार ६८, भंडारा जिल्हा १८ हजार ४३४, गोंदिया १६ हजार ९३४, गडचिरोली १२ हजार ४४८, चंद्रपूर ३२ हजार ७६१. 

मतदान केंद्र - 
नागपूर जिल्हा १६४, भंडारा जिल्ह्यांमध्ये ३१, गोंदिया जिल्ह्यामध्ये २१, वर्धा ३५, चंद्रपूर ५०, गडचिरोली २१ असे एकूण ३२२ मतदान केंद्र आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: today is voting for nagpur graduation constituency election