सेमाडोह गावात आढळले मृत कावळे, नमुने तपासणीसाठी पाठविले प्रयोगशाळेत

राज इंगळे
Thursday, 14 January 2021

प्रयोग शाळेतून अहवाल आल्यानंतरच हा बर्ड फ्लू आहे की नाही, हे स्पष्ट होणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. रहाटे यांनी दिली. मात्र, खबरदारी बाळगत पशुसंवर्धन विभागामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अचलपूर (जि. अमरावती ) : सध्या सर्वत्र कोरोनाचे संकट कायम असताना देशात बर्ड फ्लूचे नवे संकट आले आहे. सुदैवाने जिल्ह्यात आतापर्यंत बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आला नसला तरी मेळघाटातील सेमाडोह येथे काही मृत कावळे आढळल्याने खळबळ उडाली आहे. या मृत कावळ्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून प्रयोग शाळेतून अहवाल आल्यानंतरच हा बर्ड फ्लू आहे की नाही, हे स्पष्ट होणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. रहाटे यांनी दिली. मात्र, खबरदारी बाळगत पशुसंवर्धन विभागामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.    

हेही वाचा - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

मागील काही दिवसांपासून अनेक राज्यांत बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या राज्यात बर्ड फ्लूची एन्ट्री झाली असली तरी जिल्ह्यात आतापर्यंत बर्ड फ्लूमुळे एकाही पक्ष्याचा मृत्यू झाला नसल्याची माहिती मिळाली आहे, तरीसुद्धा सतर्कता बाळगत प्रशासनाने जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात 14 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास मेळघाटातील सेमाडोह गावातील स्टेट बँक ऑफ इंडिया, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल निवासस्थान तसेच प्राथमिक आरोग्यकेंद्र आदी परिसरात जवळपास दहा कावळे मृत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मृत कावळ्यांपैकी दोन कावळ्यांचे नमुने घेतले असून ते पुणे येथे पाठविल्याची माहिती आहे. 

हेही वाचा -  घरात लक्ष्मी आली म्हणून बाप वाटत होता पेढे, पण एक फोन आला अन् सर्वच संपलं

बर्ड फ्लूच्या पार्श्‍वभूमीवर कुठलाही पक्षी मृतावस्थेत आढळल्यास त्याला तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविणे आवश्‍यक आहे. सेमाडोह येथे जवळपास दहा कावळे मृत पावले आहेत. त्यापैकी दोन कावळ्यांचे नमुने अमरावतीला पाठविले. तेथून ते पुण्याला पाठविण्यात येतील. तथापि, इतर मृत कावळ्यांना खड्डा करून जमिनीत पुरविण्यात आले.
-डॉ. मनीष पुंड, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, चिखलदरा. 

हेही वाचा -  यालाच म्हणतात नशीब! खात्यातून चोरीला गेले लाखो रुपये, पण तीन महिन्यानंतर मिळाले परत

सेमाडोह येथे जवळपास दहा कावळे मृत पावल्याची घटना उघडकीस आली आहे. या कावळ्यांचा पंचनामा करून दोन कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.
-डॉ. केशव चिठोरे, पशुवैद्यकीय अधिकारी सेमाडोह.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dead crows found in semadoh of achalpur amravati