झाडीबोली पूर्व विदर्भाने महाराष्ट्राला दिलेली देणगी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

पूर्व विदर्भाच्या मातीतील शब्दसमृद्ध झाडीबोली ही पूर्व विदर्भाने महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे. या बोलीचे शब्दवैभव सर्वांना दीपवणारे आहे. म्हणून आपली ही बोली जोपासली पाहिजे, संवर्धित केली पाहिजे, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रंचित सावकार पोरेड्डीवार यांनी केले. 

गडचिरोली (मेघनाथ साहित्यनगरी) : गडचिरोली तालुक्‍यातील मौशीखांब येथे 28 व 29 असे दोन दिवस चाललेल्या 27 व्या झाडीबोली साहित्य संमेलनाची रविवारी (ता. 29) सांगता झाली. यावेळी आपले विचार व्यक्त करताना प्रंचित पोरेड्डीवार बोलत होते.

समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रंचित सावकार पोरेड्डीवार, सत्यसाई संघटनेचे जिल्हाध्यक्ष दुधराम समर्थ, झाडीबोली चळवळीचे प्रवर्तक डॉ. हरिश्‍चंद्र बोरकर, पत्रकार मिलिंद उमरे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत लेनगुरे, स्वागताध्यक्ष योगाजी बनपूरकर, कार्याध्यक्ष पांडुरंग समर्थ, जगदीश ठाकरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जीवन धुळसे, चेतन समर्थ, पोलिस पाटील लालाजी धोटे, डॉ. प्रवीण किलनाके, प्रा. विनायक धानोरकर आदींची उपस्थिती होती. 

जाणून घ्या : ओल्या पार्ट्या अन्‌ रात्र...

बोलीभाषेचे लोकजीवनातील महत्त्व

पोरेड्डीवार म्हणाले, साहित्य मानवी जीवनासाठी आवश्‍यक असून झाडीबोलीत निर्माण झालेल्या कविता, कथा, नाटक, कादंबरी, गीत आदी साहित्य घराघरांत पोहोचायला हवे. दुधराम समर्थ आणि पत्रकार उमरे यांनी बोलीभाषेचे झाडीपट्टीच्या लोकजीवनातील महत्त्व अधोरेखित केले.

"झाडीबोली मराठीची आजी' यावर चर्चासत्र

या प्रसंगी कार्यआढावा पांडुरंग समर्थ यांनी घेतला. बंडोपंत बोढेकर यांनी संपूर्ण संमेलनाचा आढावा घेतला. डॉ. बोरकर यांनी संमेलनाच्या एकंदरीत झालेल्या सकारात्मक चर्चेचा उपयोग चळवळवाढीसाठी होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. संचालन कवी संजीव बोरकर यांनी केले. आभार जगदीश ठाकरे यांनी मानले. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात "झाडीबोली मराठीची आजी' या विषयावर झालेल्या चर्चासत्राच्या अध्यक्षपदी डॉ. हरिश्‍चंद्र बोरकर होते. "आमची दंडार आमची नाटकं' या विषयावरील या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी हिरामण लांजे होते. 

क्‍लिक करा : बलात्कार... तिने घेतले उंदीर मारायचे औषध

चार ठराव संमत 

1. वडसा ते सिंरोचा मार्गे गडचिरोली रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली. ते काम या पाच वर्षांत पूर्ण करण्यात यावे. 
2. गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाने एम. ए. च्या अभ्यासक्रमात विशेष ग्रंथकार म्हणून झाडीबोलीचे प्रवर्तक डॉ. हरिश्‍चंद्र बोरकर यांच्या नावाचा अंतर्भाव करावा. 
3. भारतात ज्या ज्या ठिकाणी विद्यापीठात मराठी विषय आहे, त्यांनी आपल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात भाषाशास्त्र विषयात झाडीबोलीचा अंतर्भाव करावा. 
4. आदिवासीच्या समस्या आणि उपेक्षा या संदर्भात शासनाने झाडीबोली साहित्यिकांची समिती स्थापन करून त्यांच्याकडून वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून घ्यावा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Giving a zadiboli gift to Maharashtra by the East Vidarbha : poreddiwar