अहेरीत उडान सोलर एनर्जीचे राज्यपालांच्या हस्ते उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 December 2019

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानद्वारा उडान सोलर एनर्जी प्रा. लि. अहेरीचे उद्‌घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या हस्ते बुधवारी (ता. 18) पंचायत समिती परिसरातील मैदानात करण्यात आले.

अहेरी (जि. गडचिरोली) : उडान सोलर एनर्जी प्रा. लि. अहेरीचे उद्‌घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपालाचे प्रधान सचिव संतोष कुमार, जिल्हाधिकारी शेखरसिंग, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अहेरी प्रकल्प अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार, नगराध्यक्षा हर्षा ठाकरे, पं. स. सभापती सुरेखा आलाम तसेच आयटी मुंबईचे अधिकारी उपस्थित होते. 

उडान सोलरची उडान पहाडापर्यंत पोहोचू द्या : राज्यपाल 

अहेरीसारख्या आदिवासी व दुर्गम भागात महिलांमार्फत तयार करण्यात येत असलेल्या "सोलर प्लेट' या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर उतराखंड राज्यातील पहाडापर्यंत उडान घेतील. त्यामुळे अहेरीचा नावलौकिक संपूर्ण देशात होईल.

सोलरमार्फत तयार झालेल्या सर्व वस्तूंची विक्री भारतात होईल. आज महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. देशाची खरी शक्ती ही महिलाच आहे. देशाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान फार मोठे आहे. 

आदिवासी भागातील महिला बनतील स्वावलंबी 

अहेरीसारख्या आदिवासी भागातील महिलासुद्धा सोलर उद्योगातून स्वत: स्वावलंबी बनतील. या बचतगटातील महिलांनी केलेल्या कार्याची प्रेरणा दूरवरील इतर महिलांनासुद्धा मिळेल.

केंद्र व राज्य शासनामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. त्याची माहिती महिलांनी घेऊन त्याचा प्रत्यक्ष लाभ घ्यावा. महिलांनी देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी केले. 

 हे वाचा : काय हो! "कोच्छी' जलप्रकल्प गेला कोठे?
 

तीन महिला बचतगटांना अर्थसाहाय्य 

याप्रसंगी काही बचतगटांना अर्थसाहाय्य देण्यात आले. यात अहेरी तालुक्‍यातील धनलक्ष्मी बचतगट देवलमरी, बचतगट धानोरा, प्राची महिला स्वयंसहाय्यता बचतगट नवरगाव यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले. उडान सोलर एनर्जी अहेरी या संस्थेत आजपर्यंत 1436 सदस्यांनी नोंदणी केली आहे.

3000 पर्यंत सदस्य नोंदणी करून रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट या संस्थेने ठेवले आहे. या संस्थेतील सदस्यांनी राजस्थान येथील डोंगरगाव सोलर प्रकल्पाला भेट देऊन माहिती समजून घेतली आहे. 

हेही वाचा की : मुलीच्या अंगावर पाणी सांडल्यावरून चाकूहल्ला

अहेरी येथे भव्य इमारत 

या संस्थेला जिल्हा प्रशासनाने अहेरी येथे भव्य इमारत उपलब्ध करून दिली आहे. तसेच एक कोटी रुपयाचे अर्थसाहाय्य दिल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली. कार्यक्रमाचे संचालन नुरबानो शेख यांनी केले.

आभार मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी मानले. या कार्यक्रमाला अहेरी उपविभागातील बचतगटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration of udan Solar Energy projects Governor by hand at gadchiroli