अभिमानास्पद! परिस्थिती कोणतीही असो, काम करता येते हे शेतकऱ्यांनी सिद्ध केले; कोणी केली स्तुती, वाचा

Inspired farmers to fight in adverse conditions
Inspired farmers to fight in adverse conditions

वर्धा : कोरोनाच्या संकटकाळात अनेकांचा कामाचा वेग मंदावला होता. मात्र, शेतकऱ्यांनी शेतीची कामे करून देशाच्या जनतेची भूक भागविण्याचे मोलाचे कार्य या काळात केले. शेतकरी, शेतमजूर या संक्रमणाच्या काळातही शेतात राबत होते. विपरित परिस्थितीतही लढण्याची प्रेरणा शेतकऱ्यांच्या कामातून मिळते. कोरोनाची काळजी घेऊन आपले काम करता येते हे शेतकऱ्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याचा ७३ व्या वर्धापनदिनाचे मुख्य शासकिय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. शेतकऱ्यांनी कोरोनाच्या संकटकाळातही ७० टक्के पेरणी पूर्ण केली आहे. कोणत्याही संकटाची तमा न बाळगता कामाप्रती प्रामाणिक असलेल्या शेतकऱ्यांचे आभार माणून पालकमंत्र्यांनी त्यांच्या कार्याला सलाम केला.

कोरोनाच्या काळात गरीब, शेतमजूर, कामगार उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली. अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत शिधा पत्रिका वितरित करण्याचा उपक्रम या काळात घेतला. महसूल आणि जिल्हा परिषदेच्या क्षेत्रिय स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी १५ दिवसांत ९ हजार शिधापत्रिका नव्याने तयार करीन वितरित केल्यात. यामुळे अनेकांच्या घरी चूल पेटली. यासाठी काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

वर्धा जिल्ह्याने केले सहकार्य

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले. लॉकडाऊनमुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरात पडून असलेला कापूस आणि त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कापूस खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेतला. राज्यात कापूस खरेदी सर्वप्रथम संपविणारा वर्धा हा पहिला जिल्हा ठरला आहे. वर्धा जिल्ह्याने इतर जिल्ह्याचाही कापूस खरेदी करून शेतकऱ्यांना आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य केल्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

२५ हजार शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा

लॉकडाऊनच्या काळात राज्यात आर्थिक मंदी असताना आणि पिकविमा योजना यावर्षी ऐच्छिक असतानासुध्दा जिल्ह्यातील २५ हजार शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा उतरविण्याचे काम कृषी विभागाने केले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना बसणारा आर्थिक फटका यामुळे टाळता येईल अशी आशा पालकमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केली. संचालन रेणुका रोटकर यांनी केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच पुरस्कार

प्रगतीचा मार्ग गतिमान करण्याची संधी महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीनिमित्त जिल्ह्याला उपलब्ध करून दिली आहे. या संधीचे सोनं करण्याचे आवाहन त्यांनी प्रशासन आणि जिल्ह्यातील नागरिकांना केले. यावेळी जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच पुरस्कार प्राप्त झाल्याबाबत जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी व पोलिस अधिक्षक यांचा सत्कार पालकमंत्र्यांनी केला.

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com