अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक : पहिल्यांदाच २७ उमेदवार रिंगणात, कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी सुरू

mask and ppe kit will provide on voting center in amravati teacher constituency election
mask and ppe kit will provide on voting center in amravati teacher constituency election

अमरावती : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली. यावेळी कोविडच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक मतदानकेंद्रावर मास्क तसेच आवश्‍यक तेथे पीपीई किटसुद्धा पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

विभागातील पाच जिल्ह्यांतील 35 हजार 622 मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली आहे. एक डिसेंबरला सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरुवात होईल. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार असून त्यासाठी 77 मतदानकेंद्रे राहतील. बुलडाणा तसेच वाशिम येथील प्रत्येकी एका मतदानकेंद्रावर एकूण मतदारांची संख्या एकहजार पेक्षा जास्त असल्याने तेथे सहाय्यकारी मतदानकेंद्र राहणार आहेत. सर्व मतदानकेंद्रांवर व्हिडिओग्राफी व वेबकास्टिंग करण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. 

शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत आजवरच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार कधीच राहिले नाहीत. मात्र, यंदा तब्बल 27 उमेदवार असल्याने मतपत्रिकासुद्धा चांगलीच मोठी राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक मतदानकेंद्रात एक आरोग्याचे पथक राहणार असून येणाऱ्या मतदारांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल. एखाद्याला जास्त ताप असल्यास त्याला सायंकाळी चार ते पाच या वेळात मतदान करण्यासाठी बोलविण्यात येईल. त्यासाठी त्यांना टोकन देण्यात येईल. 

बोगस मतदारप्रकरण निकाली -
काही बोगस मतदारांची नोंदणी झाल्याच्या तक्रारी होत्या. त्या त्याचवेळी निकाली काढण्यात आल्या. 31 जणांच्या नावांबाबत आक्षेप होता. त्यातील 28 जणांनी मतदारयादीतून आपली नावे परत घेण्याचे अर्ज केले. तिघांचे अर्ज तपासणीनंतर वैध ठरविण्यात आल्याने ते मतदार राहतील, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले. 

बॅलेट पेपरवर राहणार फोटो -
यंदाच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बॅलेट पेपरला निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली आहे. यावेळी सर्व उमेदवारांच्या नावासमोर त्यांचा फोटोसुद्धा राहणार आहे. पहिला पसंतीक्रम देणे मतदारांना बंधनकारक आहे. सर्व पसंतीक्रम आकड्यातच द्यावे लागणार आहेत.  

मतमोजणीला होणार उशीर -
शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत तब्बल 27 उमेदवार असल्याने मतपत्रिका मोठी राहणार आहे. 14 टेबलांवर मतमोजणी होईल. एका टेबलवर चार अधिकारी राहणार आहेत. मतपत्रिका मोठी असल्याने तसेच प्रत्येकाचा पर्याय पाहावा लागणार असल्याने मतमोजणीला उशीर होणार आहे. वैध मतदानाच्या 50 टक्के अधिक एक, असा कोटा निश्‍चित होणार आहे. 

अशी आहे मतदारांची संख्या -

जिल्हा  पुरुष स्त्री एकूण
अमरावती 6,958 3,428 10,386
अकोला 4,305 2,175 6,480
वाशिम 3,179 634 3,813
बुलडाणा 5,969 1,515 7,484
यवतमाळ 5,649 1,810 7,459
एकूण 26,060 9,562 35,622

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com