esakal | घरापासून दूर जाऊन काम करण्याचा नवा ट्रेण्ड; नाव आहे ‘वर्क फ्रॉम माउंटेन’
sakal

बोलून बातमी शोधा

‘वर्क फ्रॉम माउंटेन’ : घरापासून दूर जाऊन काम करण्याचा ट्रेण्ड

‘वर्क फ्रॉम माउंटेन’ : घरापासून दूर जाऊन काम करण्याचा ट्रेण्ड

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : कोरोनामुळे दीड ते पावणे दोन वर्षापासून अनेक आयटी कंपन्यांनी इंजिनिअर्सना ‘वर्क फ्रॉम होम’ दिले आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी डिसेंबरपर्यंत घरूनच काम करण्यास सांगितले आहे. सुरुवातीला हे चांगले वाटत असले तरी याचे दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. कर्मचारी घरी बसून तासन्तास काम करीत असल्यामुळे शारीरिक व्याधींबरोबर मानसिक विकृती घर करू लागली आहे. कंपन्यांकडून नियमित पगार देण्यात येत असला तरी वर्कलोड वाढविण्यात आला आहे. घरात कुरबुर, चिडचिड, वाद होत असल्यामुळे आता इंजिनिअर्सनी घरापासून दूर जाऊन काम करण्याचा नवा ट्रेण्ड आणला आहे. (Coronavirus-Work-from-home-IT-Company-Various-ailments-nad86)

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ दिले आहे. कार्यालयाऐवजी घरी बसून काम करण्याचे आणि स्वतःबरोबर इतरांना सुरक्षित ठेवणे हा त्यामागचा उद्देश आहे. यामुळे अनेकांनी घरातच स्वतंत्र खोली निवडून स्पेशल नेट सेटअप करून घेतले. घरातील मुलांच्या कोलाहलामुळे कामात, मीटिंगमध्ये अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःला कोंडून घेतले आहे. परंतु, आता त्याचे गंभीर परिणाम समोर येऊ लागले आहेत. तासन्तास काम करताना कोणी बोलत नाही. त्यामुळे त्यांचा स्वभाव एकलकोंडा झाला आहे. कामामुळे स्वभाव चिडचिडा झाला असून रागाने घर केले आहे.

हेही वाचा: ...अन् बघता बघता गर्दीचाच झाला सिनेमा! उसळली बघ्यांची गर्दी

क्षुल्लक कारणावरून घरातील सदस्यांवर ओरडत आहेत. यामुळे अनेक घरांमध्ये ऑफिस वर्क सुरू झाले की, नीरव शांतता पसरलेली असते. टीव्ही लावायचा नाही, जोराने बोलायचे नाही, असे निबंध लावले आहेत. एकंदरीत घरातील वातावरण घरासारखे राहिलेले नाही. त्यामुळे पती-पत्नी, मुलांमधील दरी वाढू लागली आहे.

आयटी इंजिनिअर्सना अनेक शारीरिक व्याधींनी जखडले आहे. बेडवर बसून काम करण्याच्या पद्धतीमुळे पाठीचा त्रास सुरू झाला आहे. वजन वाढू लागल्याने टाचा दुखणे, पाय दुखणे सुरू झाले आहे. अनेकांना सततच्या कामामुळे डोकेदुखीचा त्रास सुरू झाला आहे. शेवटी हे ऑफिस वर्क असल्याचे ते बोलून दाखवत आहे. कोरोनामुळे कंपन्यांनी सध्या त्यांना ऑफिसमध्ये बोलावण्याचे टाळले आहे.

हेही वाचा: हवामान तज्ज्ञांनी पावसाबाबत दिले संकेत; चिंता वाढणार की कमी होणार?

आता घरातल्या घरात काम करून कंटाळा आला आहे. दीड वर्षापासून हेच सुरू आहे. आता ऑफीस कधी सुरू होते याची वाट पाहत होतो. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आमच्या कंपनीने डिसेंबरपर्यंत घरूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे आणखी काही दिवस घरूनच काम करावे लागणार आहे.
- आशीष आसरे
कोरोनामुळे पगार कमी होईल, अशी भीती मनात होती. मात्र, पगार काही कमी झाला नाही. उलट काम वाढले आहे. ऑफिसपेक्षा घरून जास्त काम काढून घेतली जात आहे. ही बाब खटकते. यामुळे कधीकधी ऑफिस सुरू होते, याची वाट पाहत आहे.
- हितेश शास्त्रकार

वर्क फ्रॉम माउंटेन

घरात काम करून काहींना कंटाळा आला आहे. यामुळे काही इंजिनिअर्स मित्रांनी ‘वर्क फ्रॉम माउंटेन’ म्हणजे थंड, रमणीत ठिकाणी जाऊन काम करण्याचा ट्रेण्ड सुरू केला आहे. एकाच खोलीत स्वतःला कोंडून काम करण्याऐवजी मोकळ्या वातावरणात काम करण्याची युक्ती इंजिनिअर्सनी शोधून काढली आहे. मात्र, नेटवर्कच्या समस्येमुळे त्यांना त्रास होत आहे.

हेही वाचा: भाजपसाठी धोक्याची घंटा? कोअर कमिटीची तातडीची बैठक

निसर्गाचा मनमुराद आनंद व मानसिक फ्रेशनेस

काही बॅचलर आयटी इंजिनिअर्सनी इतर मित्रांच्या मदतीने शेअरिंग पद्धतीने घरापासून दूर एखाद्या हिलस्टेशनवर जाऊन काम करण्याची युक्ती शोधून काढली आहे. आठ ते पंधरा दिवसांसाठी एखाद्या ठिकाणी जाऊन काम करायचे आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटायचा, असा यामागचा उद्देश आहे. मानसिक फ्रेशनेस मिळाल्यामुळे कार्यक्षमता वाढेल आणि बदलही मिळेल, असे म्हणून अनेक इंजिनिअर्स घराबाहेर पडले आहेत.

(Coronavirus-Work-from-home-IT-Company-Various-ailments-nad86)

loading image