शिवनी (भोंडकी)ः उभ्या पिकात नांगर चालविताना शेतकरी.
शिवनी (भोंडकी)ः उभ्या पिकात नांगर चालविताना शेतकरी.

पिकांवर नव्हे, शेतक-यांच्या काळजावर फिरतोय नांगर !

नागपूर (जि.नागपूर)  : कोरोना महामारी, सरकारचे धोरण, मातीमोल भाव, बाजारातील एकंदर स्थिती यामुळे जेरीस आलेल्या शेतक-यांनी निराशेपोटी शेतातील पिक जनावरांपुढे टाकण्यास व पिकांवरून नांगर फिरविण्यास सुरूवात केली आहे. लॉकडाउन काळात बाजारात भाज्या, फळांचे भाव आसमाला भिडत असून
शेतक-यांकडून खरेदी करण्यात येत  असलेल्या भावाला मोल नसल्यामुळे ही स्थिती उद्‌भवली आहे.

लाखमोलाच्या पिकाला कवडीमोल भाव
शिवनी (भोंडकी) : अनेक भाजीपाला बागायतदार भाजीपाला शेतातच फेकून देत आहेत, तर काही शेतात जनावरांना पीक चारत असल्याचे दृश्‍य दिसत आहेत. रामटेक तालुक्‍यातील कृषी उत्पन्न समितीचा भाजीपाला बाजार सुरू असला तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. भरउन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई असतानाही शेतात पिकविलेला भाजीपाला शेतकऱ्यांना कवडीमोल भावात विकावा लागत आहे. शेतकऱ्याच्या शेतता भाजीपाला पिकते; पण विकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजीपाला खपत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी तो बाजार समितीतच फेकून खाली हाताने घरी परतावे लागत आहे. रामटेक बाजार समितीत भेंडी, चवळी, वांगी, कोहळे, गवार, ढेमस 20, 30, 40 रुपये किलोच्या भावाने विकले जायचे. आता तीन-चार रुपये भावही नाही,

टरबूज रस्त्यावर फेकण्याशिवाय पर्याय नाही
बुटीबोरी : सातगाव बुटीबोरीवरून 15 किलोमीटर अंतरावर असलेले कन्हाळगाव पठार या ठिकाणी असलेल्या स्वराज नागपुरे हे दहा एकर शेतीमधून पाच एकर शेतीमध्ये टरबूज तर पाच एकरांत केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत असतात. या वर्षीसुद्धा शेतीत टरबूज व केळीचे पीक लावले. दररोज शेतीमधून 7 ते 8 टन टरबूज तोडले जाते. टरबूज तोडण्याकरिता दहा-बारा मजूर दररोज शेतात येतात. त्याकरिता लागणारा खर्च, गाडीभाडे इतर खर्च व या लॉकडाउन परिस्थितीमध्ये हा माल न्यायचा तरी कुठे? 5 ते 6 रुपये प्रतिकिलोने या टरबुजाची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. या परिस्थितीते काय करायचे, तोडणी करायची की नाही, हा प्रश्न स्वराज नागपुरे या शेतकऱ्यांसमोर उद्भवला आहे. दरउन्हाळ्यात टरबुजाला बाजारात मोठ्या प्रमाणात भाव मिळत असतो. परंतु, या हंगामात पाहिजे तितका भाव मिळत नसल्याने शेतकरी राजा डोक्‍यावर हात ठेवून बसून राहण्याची वेळ आली आहे. या हंगामात जरी उत्पादन भरपूर असले, तरी या मालाला बाजारापर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यायी साधन उपलब्ध नसल्यामुळे प्रत्येक शेतकरी त्रस्त आहेत.

पीक बहरले; मात्र मागणी झिरो!
सावनेर: यंदा हंगामात विक्री करता आली नसल्याने यंदाच्या हंगामात फुलांचे उत्पादन चांगले होऊनही एक कवडीसुद्धा न मिळविता ती लाखमोलाची फुले शेताच्या बांधावर फेकून देण्याची वेळ फुलउत्पादक शेतकऱ्यांवर आल्याने फुलशेतीचे जबर नुकसान झाल्याचे तालुक्‍यातील शेतकरी सांगतात. तालुक्‍यातील उमरी शिवारात शिवतीर्थावर बाळू जोशी यांचे 11 एकर शेतीवर विविध रंगांच्या गुलाबांचे पॉलीहाउस आहे. दरवर्षी त्यांना फूल उत्पादनातून चांगली कमाई होते. मात्र, यंदा फुलमार्केट बंद असल्याने जबर आर्थिक फटका बसला आहे. सावनेर येथील शेतकरी प्रभाकर नारेकर सांगतात, तीन एकर शेतामध्ये झेंडू फुलाची लागवड केली. उत्पादनही चांगले झाले. मात्र, कोरोनामुळे राज्यात लॉकडाउन करण्यात आल्याने जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रमासह विवाह समारंभ व मंदिरे बंद करण्यात आल्याने फुलांना बाजारपेठ मिळाली नाही. मार्च ते मे याच 3 महिन्यांच्या कालावधित फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, यंदाचा हंगाम ठप्प पडल्याने फूलउत्पादकांना दमडीही मिळाली नाही. हीच स्थिती तालुक्‍यातील सर्वच पॉलिहाउसधारक शेतकरी व छोटे फूलउत्पादकांची झाली आहे.

काही कळेनासे झाले
लॉकडाउनमुळे बाजारपेठा बंद झाल्या. मला विकत घेण्याकरिता ग्राहक रस्त्यावर दिसेनासा झाला आहे. शेतात पिकाकरिता लावलेले पैसेसुद्धा निघत नसल्याने टरबुजासारख्या पिकाच्या तोडणीकरिता लागणारा खर्च लक्ष्यात घेता काय करावे, कळेनासे झाले आहे?
-स्वराज नागपुरे
शेतकरी, कन्हाळगाव पठार

मोठे आर्थिक नुकसान
आजची परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, बाहेरील व्यापारी येत नाहीत. बाजार समितीतून परराज्यांत माल जात नसून शेतकऱ्यांबरोबर आमचे पण भरपूर प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
-महादेव गजभिये
आडतिया दलाल, बाजार समिती रामटेक.

खर्च खिशातून द्यावा लागतो
माल पिकला तर विकत नाही, अशी परिस्थिती आहे. तोडणीचा खर्च, वाहतूक करण्यासाठी लागणारा खर्च निघत नाही. स्वतःच्या खिशातून मजुराचा खर्च द्यावा लागतो. त्यामुळे भाजीपाला न पिकवलेला बरा.
-संदीप बांते
शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com