esakal | सिरोंचामध्ये फक्त एकमेव टॉवर, मोबाईलला नेटवर्क मिळेना
sakal

बोलून बातमी शोधा

people not getting mobile network in sironcha of gadchiroli

सिरोंचा शहरात सध्या बीएसएनएलची एकमेव सेवा उपलब्ध आहे. मात्र, ग्राहकांना भ्रमणध्वनीद्वारे मागील अनेक महिन्यांपासून योग्य सेवा उपलब्ध होत नसल्यामुळे ही बीएसएनएलची एकमेव सेवा पूर्णपणे कुचकामी ठरत चालली आहे.

सिरोंचामध्ये फक्त एकमेव टॉवर, मोबाईलला नेटवर्क मिळेना

sakal_logo
By
खुशाल ठाकरे

सिरोंचा ( जि. गडचिरोली ) :  सिरोंचा शहरात खासगी कंपनीचा एकही टॉवर नसल्याने भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)चा मनमानी कारभार तसाच सुरू आहे. संपर्क साधताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे सिरोंचावासी त्रस्त झाले आहेत.

हेही वाचा - अधिकारी, कंत्राटदाराने पाडला सौरदिव्यांचा 'उजेड', अध्यक्षांनी कनिष्ठ...

सिरोंचा शहरात सध्या बीएसएनएलची एकमेव सेवा उपलब्ध आहे. मात्र, ग्राहकांना भ्रमणध्वनीद्वारे मागील अनेक महिन्यांपासून योग्य सेवा उपलब्ध होत नसल्यामुळे ही बीएसएनएलची एकमेव सेवा पूर्णपणे कुचकामी ठरत चालली आहे. बीएसएनएलच्या या बोगस सेवेमुळे येथील ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरत आहे. शहरात बीएसएनएलची एकमेव सेवा उपलब्ध असल्याने ती मात्र नावापुरतीच राहील, अशी ग्वाही येथील नागरिक देत आहेत. मोठा गाजावाजा करत केंद्र सरकारने याठिकाणी बसस्थानकाजवळ बीएसएनएलचे टॉवर उभारले. मात्र, सुरुवातीपासून ही सेवा शहरातील भ्रमणध्वनी धारकांसाठी डोकेदुखी ठरत आली आहे. मोबाईलने दहावेळा कॉल केल्यास तेव्हा कुठे फोन लागतो. या टॉवरची इंटरनेट सेवा तर नावापुरतीच राहील की काय, असे शहरातील व शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागातील काही परिसरातील गावांमधील नागरिकांना वाटत आहे. कितीही प्रयत्न केला तरी नेट सुरू होत नाही.

हेही वाचा - सोयाबीन, कापसापाठोपाठ तुरही धोक्यात; शेंगा पोखरणाऱ्या...

बीएसएनएलच्या मोबाईल सेवेत सुधारणा होण्याऐवजी दिवसेंदिवस ती कुचकामी ठरत असल्याने ग्राहकांचे नेटपॅक कोणत्याही उपयोगात न येता वाया जात आहे. याबाबतची नुकसानभरपाई केंद्र सरकार देणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या टॉवरची रेंज शहर व परिसरातील आसरअल्ली मार्गावरील राजीवनगरपर्यंत आल्लापली मार्गावरील रंगय्यापल्ली, तर नगरमपर्यंत आहे. वर्ष 2011 च्या जनगणनेनुसार शहरातील लोकसंख्या 15000 च्या जवळपास होती. आता त्यात वाढ झाली आहे. तसेच बदलत्या काळानुसार इंटरनेटचे युग सुरू  असल्याने नागरिकांना अत्यावश्‍यक सेवा म्हणून शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी स्मार्ट फोनकडे आपला मोर्चा वळवला आहे.

हेही वाचा - आला रे आला बिबट्या आला; तीन दिवसांपासून कार्ला शिवारात शेतमजुरांत भीतीचे वातावरण

शहरात बीएसएनएलचे एकच टॉवर असल्याने शहरात आणखी एक टॉवर उभारण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. दोन महिन्यांपूर्वी शहरात आणखी एक नवीन टॉवर उभारण्यासाठी परवानगी दिली. हे टॉवर वॉर्ड क्रमांक 5 मधे उभारण्यात येणार होता. मात्र, नगरपंचायतीने सुरुवातीला नाहरकत प्रमाणपत्रासाठी पैसे भराच, असा तगादा लावत नाहरकत प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत होते. नगरपंचायत शहरात नवीन टॉवर उभारण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची माहिती येथील माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते रवी सल्लम यांना कळताच त्यांनी तहसील कार्यालय गाठून समस्या  तहसीलदार व प्रभारी मुख्याधिकारी रमेश जसवंत यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी तहसीलदारांकडे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाचा प्रभार असल्याने स्वत: तहसीलदारांनी पुढाकार घेऊन संबंधित विभागाला टॉवर उभारण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र  मिळवून दिले. मात्र, माशी कुठे शिंकली हे माहीत नाही. पण सध्या तरी या कामासाठी सुरुवात झाली नाही.

हेही वाचा - ‘कॉम्प्रमाईज’साठी गेला अन् जीव गमावून बसला; नागपुरातील गोवा कॉलनीत थरार

शहरात वाढत्या भ्रमणध्वनीधारकांची संख्या लक्षात घेता व शहरात एकही खासगी मोबाईल टॉवर नसल्याने मंजूर असलेल्या नवीन बीएसएनएलचा नवीन मनोरा लवकरात-लवकर उभारण्यासाठी या क्षेत्राचे खासदार अशोक नेते व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य लक्ष देऊन सिरोंचा शहरात लवकरात लवकर नवीन टॉवर उभारून शहरातील मोबाईलधारकांना चांगली सुविधा मिळवून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा - महाआघाडीच नव्हे तर निवडणूक विभागाचीही ऐतिहासिक कामगिरी...

तेलंगणाचा आधार -
बीएसएनएलची मोबाईल सेवा सुरळीत करण्यासाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात येऊन या क्षेत्राचे खासदार व वरिष्ठांकडे तक्रार करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, यामध्ये अद्याप किंचितसुद्धा सुधारणा होत नसल्याने नागरिकांनी आता आपला मोर्चा शेजारच्या तेलंगणा राज्यातील जिओ, एअरटेल, आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स सेवा घेण्यासाठी वळवला आहे.