अकोटच्या नगरप्रशासनामुळे ‘खेला होबे’, वाचा ‘ग्राउंड’ नसलेल्या शहराचा ‘ग्राउंड रिपोर्ट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोटच्या नगरप्रशासनामुळे ‘खेला होबे’, वाचा ‘ग्राउंड’ नसलेल्या शहराचा ‘ग्राउंड रिपोर्ट’

अकोटच्या नगरप्रशासनामुळे ‘खेला होबे’, वाचा ‘ग्राउंड’ नसलेल्या शहराचा ‘ग्राउंड रिपोर्ट’

खेळासाठी ‘अंगण’ ही प्रत्येक चिमुकल्याच्या मेंदूची गरज असते. आधी दुडुदुडू धावणे आणि नंतर अंगणभर फेर धरणे. पुढे त्याला अंगणही अपुरे पडू लागते. मग त्याच्या मेंदूची मागणी ‘मैदान’ असते. त्याच्या जन्मदत्त ऊर्जेला मैदानच योग्य दिशेने प्रवाहित करू शकते. या ऊर्जेचे दमन झाले तर त्याचे भयंकर मानसिक आणि शारीरिक परिणाम भोगावे लागतात. मग पालक म्हणून पश्चाताप करण्याचीही वेळ येते. मैदानांचे जीवनातील असे अनन्यसाधारण महत्त्व असते. परंतु, अकोट शहरात या ऊर्जेचे दमन केले जाते.

हेही वाचा: International Nurses Day : रुग्णांची अविरत सेवा करूनही तुटपुंजा पगार; परिचारिकांची व्यथा

लाखावर लोकसंख्या, शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्थेसह तब्बल १३७ शैक्षणिक दालने आणि सुमारे ‘वीस हज्जार’ विद्यार्थी असलेल्या या शहरात धड एक मैदान नाही. ‘बालहक्क आयोगाकडे कुणी तक्रार केली तर अकोट नगर प्रशासनाविरुद्ध बालकांच्या नैसर्गिक ऊर्जेच्या दमनाचा मोठा खटलाही दाखल होऊ शकतो आणि देशभर ‘छी थू’ होऊ शकते.’ ऑलिम्पिकच्या मैदानावर भारत मागे राहतो, तो अशाच ‘अकोटी’ मानसिकतेतून. खेळण्यासोबतच पोलिस, लष्करसेवा आणि अन्य क्षेत्रात जाणाऱ्या युवक-युवतींची प्रचंड कोंडी होते. केवळ औपचारिकता आणि दिखावा म्हणून शहरपासून लांबवर एक स्टेडियम बांधले आहे. परंतु, त्याचा कवडीचाही उपयोग नाही. जिल्हा परिषद विद्यालयाच्या साठ हजार चौरस फूट जागेवरील अतिक्रमण काढले, बसस्थानकासमोरील नेहरू पार्कला मैदान केले आणि भकास व अडगळीत पडलेल्या जागांचा मैदान म्हणून विकास केला तरच हे चित्र बदलू शकते. आपल्या पाल्यांना भयंकराकडे जात असल्याचे बघतानाही पालक का चूप बसले आहेत? वाचाच ‘ग्राउंड’ नसलेल्या शहराचा हा ‘ग्राउंड रिपोर्ट’.

तेल्हारा तालुक्यातील हिवरखेडचा दौरा आटोपून हिवरखेड-अकोट या अडगाव मार्गाने २० किलोमीटरचा प्रवास करीत अकोटला पोहोचलो. शहरात प्रवेश केल्यानंतर कलदार चौकात ‘सकाळ’चे अकोट तालुका बातमीदार मुकुंद कोरडे यांनी स्वागत केले. जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. त्यामुळे आम्ही थेट अकोटचे आराध्य दैवत नरसिंह महाराजांच्या दर्शनाला गेलो. कोरोनामुळे मंदिर बंद असले तरी बाहेरूनच दर्शन घेतले. पुढे कबुतरी मैदानाजवळील दुर्गा मातेसमोर नतमस्तक होऊन वारकऱ्यांचे श्रद्धास्थान श्रद्धासागरला भेट दिली. सुंदर परिसर बघून अकोट शहराचा अंदाज बांधला. पण हा अंदाज किती खोटा आहे, हे शहरातील नगरपालिका, पंचायत समिती व शहराबाहेर असलेल्या तालुका क्रीडांगण आयटीआय परिसराला भेट दिल्यावर कळले.

हेही वाचा: कोरोनाची लस घेतल्यानंतर शारीरिक संबंध ठेवणं योग्य आहे का? जाणून घ्या डॉक्टरांचं मत

सरकार संरक्षणानंतर शिक्षणावर सर्वाधिक खर्च करते. शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची त्यातून शैक्षणिक प्रगती व्हावी हा उद्देश असतो. मात्र, तालुक्यातील व शहरातील बहुतांश शाळांना क्रीडा स्पर्धांसाठी, दैनंदिन सरावासाठी मैदानच उरले नसल्याची शोकांतिका आहे. याकडे आजतागायत कुठल्याच लोकप्रतिनिधीने गांभीर्याने लक्ष दिले नाही, हे अकोट शहर तथा तालुक्याचे दुर्दैव म्हणावे लागेल.

अकोट शहर आर्थिक, भौगोलिक, शैक्षणिक, राजकीयदृष्ट्या प्रगत आहे. जिल्ह्यात अकोट ‘ब’ दर्जाची नगरपालिका आहे. शहराची लोकसंख्या दीड लाखाच्या आसपास पोहोचली आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या अकोटच्या सौंदर्यात उत्तरेकडे सातपुड्याच्या निसर्गरम्य वातावरणात ऐतिहासिक नरनाळा किल्ला भर घालतो. लगत वारी हनुमान संस्थान विदर्भाचे आराध्य दैवत आहे. बुलडाणा, अकोला जिल्ह्याची तृष्णातृप्ती करणाऱ्या वाण धरणाला जलपरीची जोड आहे.

शैक्षणिक बाबतीत अग्रेसर

अकोला जिल्ह्यात शैक्षणिक बाबतीत अकोट शहर अग्रगण्य आहे. शहरात ११ माध्यमिक शाळा, सात कनिष्ठ महाविद्यालय, २० प्राथमिक शाळा, तीन प्रशिक्षण संस्था व ग्रामीण भागात जिल्हा परिषद तथा खासगी संस्थांचा मोठा परीघ आहे. एकूण १३७ शैक्षणिक दालने आहेत. प्रशिक्षण संस्थांमध्ये २० हजारांच्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, या संस्थांकडे विद्यार्थ्यांसाठी पुरेसे पटांगण नाही. बहुतांश संस्था शहराच्या मध्यभागी असल्याने मैदानांची वानवा आहे. अनेक संस्थांमध्ये चक्क प्रार्थनेसाठी मैदान नाही. हजारो मुले क्रीडांगणाअभावी खेळण्याच्या हक्कापासून वंचित आहेत.

हेही वाचा: रेमडेसिव्हिरचा काळाबाजार थांबता थांबेना! अमरावतीत दोन डॉक्‍टरांसह सात जणांना अटक

शहरापासून लांब स्टेडियमचा फायदा कुणाला?

शासनाच्या धोरणानुसार तालुका क्रीडांगण मंजूर झाले; मात्र शहरापासून लांब औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उभारण्यात आलेले स्टेडियम अकोट शहरातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही उपयोगाचे नाही. तालुका व शहराची विद्यार्थिसंख्या लक्षात घेता मध्यवर्ती ठिकाणी स्टेडियम उभारले गेले तर विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो.

मैदानाची जागा मोकळी होईल का?

जिल्हा परिषद विद्यालयाच्या मैदानालगत पश्चिमेला अकोट नगर परिषदेने क्रीडांगणासाठी ६० हजार चौ.फू. जागा खरेदी केल्याची माहिती आहे. त्या जागेवर सध्या अतिक्रमण झालेले दिसून येते. जिल्हा परिषद हायस्कूलचा परिसर शहराच्या मध्यवर्ती भागात असून, क्रीडांगणासाठी या जागेचा उपयोग होऊ शकतो. पर्यायी जागा म्हणून बसस्थानकासमोरील नेहरू पार्कसुद्धा मैदान म्हणून उपलब्ध करता येऊ शकते. ही जागा शासनदप्तरी नेहरू पार्कसाठी असली तरी या जागेवर पूर्णत: नगरपालिकेचा ताबा आहे. अनेक दिवसांपासून नेहरू पार्कची असलेली भकास अवस्था व अडगळीत पडलेली ही जागा विद्यार्थ्यांच्या उपयोगात येऊ शकते. याप्रकरणी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

अकोट तालुका व शहरात पोलिस, आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्यासाठी तसेच मैदानात सराव करण्यासाठी सध्या एकही हक्काचे मैदान नाही. मधल्या काळात काही सामाजिक संस्था व आम्ही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण उपक्रम राबविला. युवक व युवतींसाठी स्वतंत्र व हक्काचे मैदान असावे, याबाबत महाविकास आघाडी सरकार व मी प्रयत्नशील आहे. क्रीडामंत्री व क्रीडा राज्यमंत्री यांची भेट घेऊ. पोलिस भरती, आर्मीचा सराव करणाऱ्या तरुणाईच्या मैदानासाठी प्रयत्न करू.
-अमोल मिटकरी, आमदार, विधान परिषद

हेही वाचा: Nagpur Corona Update: जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख रुग्णांची कोरोनावर मात

विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणासोबतच खेळ व क्रीडा स्पर्धेला तेवढेच महत्त्व आहे. अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःमधील क्रीडा कौशल्याने आयुष्याला वेगळे वळण दिले. खेळ व क्रीडा स्पर्धांच्या जोरावर विद्यार्थ्यांनी मैदान गाजवून शासनाच्या संरक्षण दलात नोकऱ्या मिळविल्या. अकोट पंचायत समितीचे सभापतीपद भूषवताना याबाबत शासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला. शहरासह ग्रामीण भागातील शाळांमध्ये क्रीडांगण गरजेचे आहे.
- रमेश अकोटकर, माजी सभापती पंचायत समिती, अकोट

हेही वाचा: शटर बंद खरेदी चालूच! आलिशानच्या दुकानात आढळले तब्बल पावणे दोनशे ग्राहक

पोलिस भरतीच्या अनुषंगाने युवकांना पूर्वतयारी करण्याकरिता क्रीडांगण नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. अकोट शहरातील गांधी मैदान जर पालिकेने व्यवस्थित केले तर काही प्रमाणात युवकांना दिलासा मिळू शकेल.
- सचिन भुस्कुट, कापड व्यापारी, अकोट

हेही वाचा: नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय नाही; यशोमती ठाकूर यांचा इशारा

अकोट शहर व परिसरात मुलांना हक्काचे क्रीडांगण नसल्याने युवक आजूबाजूच्या शेतात खेळतात. गांधी मैदानावर कुणाचेही लक्ष नसल्याने मैदानाची दुरवस्था झाली आहे. काही नागरिकांनी अतिक्रमण केले. यापुढे शासनाकडे आम्ही क्रीडांगणाच्या मुद्यावर आवर्जून पाठपुरावा करू.
संजय ल. गावंडे, माजी आमदार, अकोट मतदारसंघ

(Story of a city which has no play grounds Akot)

-

Web Title: Story Of A City Which Has No Play Grounds

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Akot
go to top