मुसळधार पावसातही 'ऑपरेशन गर्डर" यशस्वी 

मयुरी चव्हाण काकडे
रविवार, 20 ऑगस्ट 2017

पर्यटकांचा हिरमोड
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने विशेषतः रविवारी मुंबईकरांना कर्जत ,नेरळ, वांगणी, भिवपुरी येथील धबधबे खुणावू लागतात.  मात्र, रविवारी  दुपारपर्यंत मेगाब्लॉक असल्यामुळे  पर्यटकांचा हिरमोड झाला होता. मेगाब्लॉकची पूर्वकल्पना असल्यामुळे   नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे पावसाळ्यात कर्जतच्या दिशेने रविवारी  पर्यटकांच्या  गर्दीने हाऊसफुल झालेल्या लोकलचे दर्शन या रविवारी  झाले नाही. दुपारनंतर मात्र  लोकलमध्ये प्रवाशांची तुरळक गर्दी नजरेस पडत होती. 

कल्याण : रेल्वे क्रॉसिंगचे फाटक कायमस्वरूपी बंद करण्यासाठी मध्य  रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकानजीक रविवारी  9:15 ते 12:45 या कालावधीत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक  घोषित करण्यात  आला होता.  मात्र, सकाळपासून पावसाचा जोर अधिक असल्यामुळे  रेल्वे कर्मचा-यांनी मोठ्या कसरतीने  दुपारी 2:15  वाजेपर्यँत  हे काम पूर्ण केले. दुूपारी 12:55 वाजण्याच्या सुमारास कल्याणहून मुंबईच्या दिशेने पहिली लोकल रवाना झाली. मात्र, सकाळी 9 वाजल्यापासून  कल्याण ते डोंबिवली दरम्यान एकही लोकल धावली नाही. 

ठाकुर्ली स्थानकानजीक रविवारी उड्डाणपुलाचे    गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यावेळी अप, डाऊन धीम्या व जलद तसेच पाचव्या व सहाव्या  मार्गावरील सर्व वाहतुक बंद करण्यात आली होती. या विशेष ब्लॉकची पूर्वकल्पना प्रवाशांना असल्यामुळे दुपारच्या नंतरच प्रवासी  कामानिमित्त बाहेर पडले. ब्लॉकमुळे मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला होता. पावसाचा  जोर अधिक असल्यामुळे गर्डर  टाकण्याच्या कामात बाधा निर्माण होत होती. मात्र, रेल्वे प्रशासनाने मोठ्या  शिताफीने  पावसाची तमा न बाळगता   तांत्रिक कौशल्य पणाला लावून सव्वा दोन  पर्यंत काम पूर्ण केले.उर्वरित किरकोळ कामासाठी येणाऱ्या काळात  विशेष ब्लॉकची गरज पडणार नाही अशी  माहिती रेल्वेच्या सुत्रांनी दिली. 

या कामासाठी रेल्वेचे 100 कर्मचारी , 8 अधिकारी  तैनात झाले होते तर काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी  विशेष पथक स्थापन करण्यात आली होती. रेल्वेने दोन्ही गर्डर टाकण्याचे काम पूर्ण केले  असून  त्यावर ब्लॉकचे स्लॅब  टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येईल असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :