शेट्टींनी आधी स्वतःच्या बुडाखालचा जाळ बघावा- सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

कर्जमाफीचा निर्णय पुणतांब्याच्या शेतकऱ्यांचा आहे. ज्यावेळी पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले त्यावेळी राजू शेट्‌टींनी संपावर जाणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही किंवा योग्य नाही अशी प्रतिक्रिया दिली होती.

इस्लामपूर (सांगली) : राजू शेट्‌टींचा घसरलेला टीआरपी वाढविण्यासाठी ते माझ्यावर टीका करीत आहेत. त्यांनी अगोदर स्वतःच्या बुडाखालचा जाळ बघावा, त्यांचे स्वीय सहायक व जवळचे बगलबच्चे काय उद्योग करतायत याकडे लक्ष द्यावे, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे पत्रकार बैठकीत दिला. तसेच रघुनाथदादा पाटील, उल्हास पाटील व माझा शेट्टींनी वापर करुन घेतल्याचा आरोपही खोत यांनी केला. 

ते म्हणाले, "काही लोकांची दुकानदारी माझे नाव घेतल्याशिवाय चालत नाही. मी गेली दोन महिने शांत होतो. मात्र आता संयम संपला. ज्यांनी आत्मक्‍लेष आंदोलनाअगोदर पुण्यात फुलेवाड्यात महात्मा फुलेंचे दर्शन घेतले. "भाजपला पाठिंबा देऊन मी चूक केली, त्याचा मला पश्‍चात्ताप होतोय त्यातूनच मी आत्मक्‍लेष यात्रा काढतोय' असे विधान केले. आत्मक्‍लेष यात्रेनंतर लगेच दिल्लीत जाऊन भाजपच्या राष्ट्रपती उमेदवाराला पाठिंबा व्यक्‍त करत मतदान केले. ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक नव्हे काय? त्यांचे वागणे नेहमीच दुटप्पी असते. कोणत्याही कार्यकर्त्याला मोठे होऊ द्यायचे नाही, स्वार्थ साधायचा, फेकून द्यायचे ही त्यांची रणनीती आहे. त्यांनी यापूर्वी रघुनाथदादा पाटील यांचा वापर करुन मोठमोठ्या नेत्यांवर आरोप केले. त्यानंतर उल्हास पाटील यांच्यामार्फत टोकाचे आरोप केले. परत मला पुढे केले. माणसाचा वापर करायचा व तो माणूस मोठा झाला की आपोआप बाजूला करण्यासाठी षडयंत्र रचायचे ही त्यांची आजवरची कूटनीती आहे.'' 

ते म्हणाले, "राजू शेट्‌टींना सरकारमधुन बाहेर पडायचे नव्हते. तर सदाभाऊला बाहेर काढायचे होते. माझ्यावर नेमलेली स्वाभीमानी संघटनेच्या चौकशी समितीतील सदस्यांची माझी चौकशी करण्याची पात्रता नसतानाही मी चौकशीला सामोरे गेलो. मला संघटनेतून बाहेर पडायचे नव्हते. प्रत्येकवेळेला ते म्हणतात, माझे हात स्वछ आहेत. देह स्वच्छ आहे. शेट्‌टींना दुसऱ्याच्या योगदानाचा विसर पडलाय. आता माझे नाव घेऊन ऊस हंगामापर्यंत स्वतःचा टीआरपी वाढवायचा, पुन्हा लोकांच्या भावनेला हात घालायचा व हात वर करुन ऊस दर दिला नाही म्हणून परत निवडणुकीला सामोरे जायचे ही त्यांची रणनीती आहे. कर्जमाफीचा निर्णय पुणतांब्याच्या शेतकऱ्यांचा आहे. ज्यावेळी पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले त्यावेळी राजू शेट्‌टींनी संपावर जाणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही किंवा योग्य नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. पण शेतकऱ्यांचा संप यशस्वी होतोय म्हटल्यावर ते त्या आंदोलनात सामील झाले. माझ्यावर आरोप करत सरकारबरोबरच्या चर्चेनंतर गुलाल उधळत मुंबईपासून शिरोळपर्यंत आले. मिरवणुका काढल्या. यात ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही ते शेतकरी आपल्याबरोबर राहणार नाहीत असे लक्षात आल्यावर परत दुकानदारी चालण्यासाठी त्यांनी संपूर्ण कर्जमाफीचा नारा दिला.'' 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :