दलितांची कर्जे माफ करावीत : रामदास आठवले 

अभय जोशी
मंगळवार, 20 जून 2017

दलित समाजातील व्यक्तीला संधी दिली की दलित मतांसाठी संधी दिली अशी टिका विरोधकांकडून केली जाते. संधी दिली नाही तर दलित व्यक्तीस संधी द्यायला पाहिजे होती असेही तेच लोक बोलतात. त्यामुळे रामनाथ कोविंद यांना घटना बदलण्यासाठी राष्ट्रपती केले जात आहे.

पंढरपूर - शेतकऱ्यांचे कर्ज माफ करुन देवेंद्र फडणवीस यांनी चांगला स्ट्रोक मारलेला आहे. आता शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्यानंतर अनेक दलित कार्यकर्त्यांनी महात्मा फुले महामंडळ, आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, लिडकॉम यांच्याकडील मागासवर्गीयांची कर्जे माफ करावीत अशी मागणी दलित कार्यकर्त्यांकडून माझ्याकडे होत आहे. 400 ते 500 कोटी रुपयांची ती रक्कम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बरोबरच या गोरगरीबांची ही कर्जे माफ करावीत अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहे, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. 

राष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना संधी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. कोविंद हे उत्कृष्ट वकील आहेत. गरीब कुटुंबातून आलेले आहेत. त्यांच्या सारख्या स्वच्छ प्रतिमा असलेल्या दलित समाजातील एका योग्य व्यक्तीची निवड होत आहे. दलित मतांसाठी त्यांचे नाव पुढे आणले असल्याचा अप्रप्रचार काही मंडळी करत आहेत. हा आरोप पूर्णपणे चूकीचा आहे. त्यामध्ये काहीही अर्थ नाही. के. आर. नारायणन यांच्यानंतर पुन्हा राष्ट्रपती म्हणून दलित व्यक्तीची राष्ट्रपतीपदी निवड होत असल्याबद्दल सर्व समाजामध्ये समाधान व्यक्त होत आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले. 

रिपब्लिकन पक्षाचे नेते सुनील सर्वगोड यांच्या मुलाच्या विवाह समारंभाच्या निमित्ताने आठवले हे आज पंढरपूर दौऱ्यावर आले होते. तत्पूर्वी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

आठवले म्हणाले, "दलित समाजातील व्यक्तीला संधी दिली की दलित मतांसाठी संधी दिली अशी टिका विरोधकांकडून केली जाते. संधी दिली नाही तर दलित व्यक्तीस संधी द्यायला पाहिजे होती असेही तेच लोक बोलतात. त्यामुळे रामनाथ कोविंद यांना घटना बदलण्यासाठी राष्ट्रपती केले जात आहे. दलितांची मते मिळवण्यासाठी त्यांना संधी दिली जात आहे असे म्हणण्यात काहीही अर्थ नाही. हा आरोप खोडसाळ आहे. कोविंद हे बिहारचे राज्यपाल आहेत. सुस्वभावी व स्वच्छ प्रतिमा असलेले नेते आहेत. अशा व्यक्तीची निवड केल्याबद्दल मी मोदी व शहा यांचे अभिनंदन करतो.'' 

देशातील दलित समाजासह सर्व समाजाचे लोक भारतीय जनता पक्षात आहेत. भाजपाचा चेहरा बदलला आहे. सर्व जातीचे पक्ष या पक्षात आलेले आहेत. त्यामुळे हा पक्ष आता बहुजनांचा झाला आहे. भाजपा कधीही घटना बदलण्याची भूमिका घेणार नाही तथापी तसे झाले तर आमचा त्यास विरोध राहील असे आठवले यांनी नमूद केले. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राष्ट्रपती होण्याची इच्छा असल्यास त्यांनी त्यांच्या पक्षाला एनडीए सोबत आणावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे मित्रच आहेत. त्यांनी त्यांची भेट घ्यावी असे मी म्हणालो होतो असे आठवले यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. 

आठवले म्हणाले, जातीव्यवस्था संपवण्यासाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले पाहिजे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास पाच लाख रुपये द्यावेत तसेच जोडप्यातील एकास शासकीय नोकरी द्यावी.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
घोषणांच्या पावसात शेतकरी कोरडाच
पालखी सोहळ्यात वारकरी विरुद्ध धारकरी : नक्की प्रकार काय?
मस्ती असेल तर 'मुदतपूर्व' घ्याच : उद्धव ठाकरे
#स्पर्धापरीक्षा - GST​
दिल्लीत महिलेवर गाडीत सामूहिक बलात्कार करून फेकून दिले​
कोहलीला खरंच नकोयं कुंबळे प्रशिक्षक​
मुंबईत भोजपुरी अभिनेत्रीची आत्महत्या​
गरोदर लेकीला मारणाऱ्या नराधम बापाला अखेर फाशी