सोलापूर: 'एमआयएम'च्या नगरसेविका शेख अडचणीत

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 26 जुलै 2017

मी दिलेली माहिती खरी आहे. चुकीचे काही लिहले नाही. या संदर्भातील सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, त्यामुळे तक्रारीत काही तथ्य नाही. 
- शहाजीदाबानो शेख, नगरसेविका

सोलापूर : निवडणुकीवेळी द्यावयाच्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याच्या तक्रारीवरून "एमआयएम'च्या नगरसेविका शहाजीदाबानो शेख यांच्या कागदपत्रांची तपासणी करून आवश्‍यक कार्यवाही करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांस दिले आहेत. त्यामुळे सौ. शेख अडचणीत आल्या आहेत. 

प्रभाग 14 अ ही जागा इतर मागासवर्गीय महिला (ओबीसी) या प्रवर्गासाठी राखीव आहे. या जागेवरून सौ. शेख निवडून आल्या. त्यांनी भाजपच्या विजयालक्ष्मी कंदलगी यांचा पराभव केला. निकालानंतर सौ. कंदलगी यांनी सौ. शेख यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा आक्षेप नोंदविला. त्या शिक्षिका म्हणून काम करीत असताना तसा उल्लेख केला नाही, तसेच निवडणूक लढविण्यासाठी संस्थेच्या परवानगीचे पत्र जोडले नाही. त्यामुळे, त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, या मागणीचे पत्र राज्य निवडणूक आयोग आणि विभागीय आयुक्तांना दिले. 

या पत्राची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी अ. गो. जाधव यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. सौ. कंदलगी यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत चौकशी करावी आणि योग्य ते कारवाई करावी, असे या आदेशात म्हटले आहे. 11 जुलै रोजी हा आदेश निघाला असून, तो तक्रारदारांना पोष्टाने मिळाला आहे. तर महापालिका आयुक्त किंवा निवडणूक कार्यालयास अद्याप मिळालेला नाही. 

मी दिलेली माहिती खरी आहे. चुकीचे काही लिहले नाही. या संदर्भातील सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, त्यामुळे तक्रारीत काही तथ्य नाही. 
- शहाजीदाबानो शेख, नगरसेविका

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :