शिरूर तालुक्‍यातील संगणकांवर साचली धूळ; विजेअभावी डिजिटल शाळा अंधारात

युनूस तांबोळी
गुरुवार, 20 जुलै 2017

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): शिरूर तालुक्‍यातील 363 जिल्हा परिषद शाळा डिजिटल आहेत. मात्र, वीजबिल भरण्यासाठी निधीची तरतूद नसल्याने बिल भरण्याअभावी तालुक्‍यातील काही शाळांसमोर वीजपुरवठा खंडित होण्याचे संकट उभे ठाकले आहे. काही शाळांमध्ये विद्युतपुरवठा सुरळीत असूनही तेथील संगणक फक्त दिखाव्यासाठी दिसून येत आहेत. वीजबिल भरण्यासाठी लोक पुढे येत नसल्याने या शाळा चालवायच्या कशा, असा प्रश्‍न मुख्याध्यापक व शिक्षकांना पडला आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना शहरी भागातील मुलांसारखे शैक्षणिक ज्ञानाबरोबर संगणकीय ज्ञान अवगत व्हावे, यासाठी शिक्षण विभागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना संगणक संच पुरविण्यात आले. डिजिटल शाळेसाठी काही शाळांनी लोकसहभागातून, तर काही शाळांनी देखभाल दुरुस्तीतून एलईडी घेतले. जिल्हा परिषद शाळा शंभर टक्के डिजिटल करण्याचा सरकारचा मानस आहे. संगणक पुरविणाऱ्या यंत्रणेकडून संगणकाचे संच हलक्‍या दर्जाचे पुरविण्यात आल्याने अल्पावधीत बहुतांश शाळांतील संगणक बंद पडले आहेत. शिवाय, अनेक शाळांतील वीजपुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान देण्यात अडचण येत आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात संपूर्ण केंद्रशाळा व वाड्या-वस्त्यांवरील शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. मात्र, शाळेच्या वेळेतच वीज राहत नसल्याने सरकारचा मुख्य उद्देश काही सफल होत नाही. त्यामुळे सरकारने जिल्हा परिषद शाळेसाठी कायमस्वरूपी सिंगल फेज वीज द्यावी, अन्यथा शाळेवर सौरऊर्जा कार्यान्वित करून विजेची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

डिजिटल शाळा कागदोपत्री उरणार का?
शिरूर तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या 25 केंद्रशाळा डिजिटल आहेत. 80 शाळा इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करत आहेत. विद्यार्थ्यांना कविता, गोष्टी, इंग्रजीचे शब्द, स्पेलिंग, उच्चार, इंग्रजी कविता पाठांतर करणे, पाठाचे संदर्भ यासाठी डिजिटल शिकवणी महत्त्वाची आहे. त्यामुळे विजेची अत्यंत आवश्‍यकता आहे. परंतु, विजेचे बिल नियमितपणे भरण्यासाठी निधीची तरतूद नसल्याने भविष्यात डिजिटल शाळा केवळ कागदोपत्री राहण्याची शक्‍यता आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: