पुणेः अखेर पालिकेला आली जाग, नाट्यगृह झाले स्वच्छ !

स्वप्निल जोगी
बुधवार, 19 जुलै 2017

  • 'सकाळ' बातमीचा परिणाम
  • रंगरंगोटी करून झाकली घाण; पण स्वच्छतागृहांतील नळ अजूनही गळकेच

  • 'सकाळ' बातमीचा परिणाम
  • रंगरंगोटी करून झाकली घाण; पण स्वच्छतागृहांतील नळ अजूनही गळकेच

पुणे: महापालिकेच्या जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनमधील स्वच्छतागृहांतील अस्वच्छतेचे किळसवाणे वास्तव 'सकाळ'ने मंगळवारी मांडले आणि दुसऱ्याच दिवशी याची दखल घेत तिथली स्वच्छतागृहे चकचकीत झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, घाईघाईत केलेल्या या स्वच्छतेच्या नादात स्वच्छतागृहातील नळ अनेक ठिकाणी गळकेच राहिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे, "सकाळ'च्या पाहणीनंतर पालिकेने "एक कदम (खरोखरच) स्वच्छता की ओर' टाकलेले असले तरीही इतर सुधारणा कधी होतील, असा प्रश्‍न मात्र कायम आहे.

घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनमध्ये असणाऱ्या दोन स्वच्छतागृहांतील किळसवाणे वास्तव "सकाळ'ने पाहणीतून तेथील छायाचित्रांसह मांडले होते. शिवाय, ई-सकाळ आणि "सकाळ'च्या फेसबूक पेजवरूनही हे वास्तव मांडण्यात आले. अनेक नागरिकांनी तसेच आम आदमी पक्षासारख्या काही राजकीय पक्षांनीही याची दखल घेत पालिकेच्या "स्वच्छ' धोरणाविषयी नाराजी जाहीर केली. यानंतर जागे होत पालिकेने जणू तातडीचे फर्मान काढत ही स्वच्छता करवून घेतली.

बुधवारी पाहणीसाठी "सकाळ'चे प्रतिनिधी गेले असता त्यांना या नाट्यगृहात बऱ्यापैकी स्वच्छता पाहायला मिळाली. आज सकाळी-सकाळी लवकर आपल्याला स्वच्छतेसाठी बोलावण्यात आले असल्याचे तेथील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी "सकाळ'च्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. काही कर्मचारी या वेळी प्रत्यक्षा स्वच्छता करताना पाहायलाही मिळाले.

स्वच्छतागृहांतील घाण आता नसली तरी तेथील नळ तसेच सांडपाणी वाहून नेणारे पाईप मात्र अजूनही गळके असल्याचे दिसून आले. तसेच, ज्या वॉटर कूलरच्या आसपास पान-तंबाखू थुंकून ठेवली होती, ते वॉटर कूलरच आता दुसरीकडे हलविल्याचे पाहायला मिळाले. शिवाय, नाट्यगृहाच्या संपूर्ण परिसरात जिथे-जिथे पानाच्या पिचकाऱ्या मारल्या होत्या, त्या प्रत्येक ठिकाणी पांढरा रंग मारल्याचे दिसून आले. "आता पालिकेने स्वच्छतागृहांतील अस्वस्थता कुणीतरी फेसबुकवरून किंवा ट्विट करून दाखवण्याची वाट न पाहत बसता ती नेहमीच स्वच्छ ठेवावीत,' अशी अपेक्षा या वेळी पुणेकरांनी व्यक्त केली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :