पुन्हा एकदा ‘सरस्वती’चा शोध

पुन्हा एकदा ‘सरस्वती’चा शोध

अनेक दशकांपासून संशोधकांच्या अभ्यासाचा विषय बनलेल्या सरस्वती नदीचा पुन्हा शोध घेतला जाणार आहे. यासाठी केंद्रीय भूजल मंडळ राजस्थानच्या थर वाळवंटामध्ये १२२ ठिकाणी खोदकाम करणार असून, यासाठी पूर्वीच्या संशोधनाचाही आधार घेण्यात येईल. याआधी झालेल्या संशोधनामध्येही सरस्वती नदीच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे असंख्य पुरावे संशोधकांच्या हाती लागले होते. ‘अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वती अपरास्तस्य इव स्मासि प्रशस्तिम्‌ अम्ब नास्कृतिम!’ असे जिचे वर्णन केले जाते, त्या सरस्वती नदीचा प्रवाह शोधण्यासाठी संशोधकांनी कंबर कसली आहे.

नव्याने खोदकाम
जैसलमेरमध्ये खोदण्यात आलेल्या कूपनलिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी सापडले असून, ते हजारो वर्षे पुरातन असल्याचे सांगितले जाते. नव्या संशोधनासाठी आणखी काही ठिकाणांवर खोदकाम करण्यात येईल. ज्या भागात पाण्याचा उपसा करण्यात आला, तेथील पाण्याची पातळीही कमी होताना दिसत नाही. नदीच्या प्रवाहाचा शास्त्रशुद्ध नकाशा तयार करण्यासाठी १२२ ठिकाणी बोअरवेल घेण्यात येतील.

प्रवाह शोधण्याचा प्रयत्न
जेथे सरस्वती नदीचा प्रवाह असल्याचे मानला जाते, त्या मार्गावर अनेक ठिकाणांवर भूजलाचे भांडार सापडले आहे, हे जलस्रोत परस्परांशी जोडता आले, तर नदीचा प्रवाहही ठळकपणे अधोरेखित करता येईल. यापूर्वीही संशोधकांनी अशाच पद्धतीने सरस्वती नदीचा लुप्त झालेला प्रवाह शोधण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना अपयश आले होते.

संशोधनाचे आधार
जैसलमेरमध्ये आढळणारे भूजल साठे
वाळवंटामध्येही कूपनलिका ‘ओव्हरफ्लो’
उन्हाळ्यामध्येही वाळवंटातील विहिरींना पाणी 
येथील पाण्यात ‘ट्रिटीयम’ हा घटक आढळत नाही
रेडिओ कार्बन डेटातून येथील भूजल पुरातन असल्याचे स्पष्ट
विविध ठिकाणांवर पाण्यात आढळणारे घटक मात्र सारखेच

संघपरिवाराचा आग्रह
सरस्वती नदीच्या शोधासाठी संघ परिवार विशेष आग्रही दिसून येतो. सरस्वती नदी ही भारतातील सूवर्णयुगाचे प्रतीक असल्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही नेत्यांची धारणा आहे. मुस्लिम आणि ख्रिस्ती आक्रमणापूर्वी सरस्वती नदीच्या काठावर स्वतंत्र संस्कृती नांदत होती, असा दावाही केला जातो. त्यामुळे भाजप सरकारने पुन्हा या नदीच्या शोधाचे आदेश दिले आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही सरस्वती नदीच्या शोधासाठी आग्रही भूमिका घेतली होती. वाजपेयी यांच्या काळातच संघ परिवारातील संघटनांनी हा मुद्दा उचलून धरला होता.

वैदिक संदर्भ
वैदिक आणि वेदोत्तर ग्रंथांमध्ये सरस्वती नदीचे दाखले मिळतात. ऋग्वेदाच्या पहिल्या भागाचे उगमस्थान सरस्वती नदीच्या काठावरच असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. देवी सरस्वतीचे अभिव्यक्तीकरण याच नदीवरून झाले आणि तिला पुढे स्वतंत्र ओळख प्राप्त झाली. ऋग्वेदात सरस्वती नदीचा उल्लेख आढळतो, तिच्या पूर्वेस यमुना, तर पश्‍चिमेस सतलज नदी असल्याचे वैदिक वर्णनावरून स्पष्ट होते.

घग्गर- हाकरा कनेक्‍शन
तांड्य, जैमेनिय ब्राह्मणे आणि महाभारतामध्ये सरस्वती नदी वाळवंटात लुप्त झाल्याचा उल्लेख सापडतो. १९ व्या शतकातील काही संशोधकांच्या मते सरस्वती नदी ही घग्गर-हाकरा नदी प्रणालीचाच एक भाग असावी, तिचा प्रवाह वायव्य भारतातून पूर्व पाकिस्तानच्या दिशेने असावा. उपग्रहांनी टिपलेल्या प्रतिमांवरूनदेखील ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. काही आधुनिक संशोधकांनी मूळ नदीच्या अस्तित्वावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

सरकारी समितीचे म्हणणे
जलस्रोत मंत्रालयाने सरस्वती नदीच्या शोधासाठी सात सदस्यीय समिती स्थापन केली होती, ‘जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड सायंटिफीक रिसर्च’ या संस्थेचे प्रमुख के.एस.वालदिया यांच्याकडे या समितीची सूत्रे सोपविण्यात आली होती. या समितीमध्ये भूगर्भशास्त्रज्ञ, प्राच्य विद्यासंशोधक आणि जलसंशोधकांचा समावेश होता. या समितीनेही सरस्वती नदीचे अस्तित्व मान्य केले होते. या समितीने सहा महिने संशोधन करत सरस्वती नदीचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न केला 
होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com