

काना मात्रा वेलांटी नसलेलं सरळ माणसाचं सरळ शहर. आज अहमदनगरचा वाढदिवस आहे. २८ मे २०२२, शहराचा ५३२ वा स्थापना दिवस. २८ मे १४९० ला शहर स्थापन झाल. देशात ५०० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असलेली मोजकीच शहर आहेत त्यातल अहमदनगर एक.आज जिथ किल्ला आहे तिथ अहमदशहा बहिरी निजामशहा थांबलेला असताना त्याने सशाला कुत्र्याच्या अंगावर धावून जाताना पाहिलं आणि अशी चमत्कारिक जागा त्याने किल्ला आणि शहर वसवायला निवडली ते अहमदनगर. सीना नदीच्या काठावर वसलेलं शहर.
चांदबीबी च्या शौर्याची आठवण असणार अहमदनगर. मलिक अंबरच्या खापरी नळाने शहराला ५०० वर्षापूर्वी पाणीपुरवठा करण्याच्या प्रयोगाच शहर. जमिनीच्या मोजमापाची, शेतसार्याची पद्धत राबवणाऱ्या आणि साधा हबशी गुलाम स्वकर्तृत्वावर थेट राज्याचा प्रधानमंत्री बनू शकतो हे दाखवणाऱ्या मलिक अंबरची कार्यभूमी असलेल अहमदनगर. लक्ष्मी कारंजा, चौपाटी कारंजा, बारातोटी कारंजा अशी अनेक कारंजी तत्कालीन नळांनी पाणी आणून कार्यरत असलेले, देखणं शहर.
लाड-कारंजा-पैठण( प्रतिष्ठान )- अहमदनगर- जुन्नर- नाणेघाट- कल्याण ह्या मार्गाने थेट बगदादपर्यंत व्यापार उदीम करणार आणि एकेकाळी समृद्ध बाजारपेठ म्हणून नावारूपाला आलेल अहमदनगर. शहाजीराजे आणि शरीफजीराजे ह्यांच्या वडिलांनी ,मालोजीराजांनी जिथे नवस बोलला त्या शहाशरीफ दर्ग्याच शहर. शहाजीराजे ज्या भातोडी च्या लढाईने सगळ्या देशात युद्धकुशल सेनापती म्हणून प्रसिद्ध झाले ते अहमदनगर.
संभाजीराजांच्या मृत्युनंतर , दक्षिणेत एकूण २७ वर्ष लढूनही महाराष्ट्र जिंकता न आल्याने निराश झालेल्या औरंगजेबाने शेवटचा श्वास घेतला ते अहमदनगर. संभाजीपुत्र शाहूंना ज्या किल्ल्यात कैदेत ठेवलेलं होत ते अहमदनगर. शाहू महाराजांचे वडील छत्रपती चौथे शिवाजी महाराज ह्यांचा निर्घृण खून झाला ते अहमदनगर शहर.
इथलं वातावरण धातुकाम करायला योग्य आहे म्हणून इथे त्याकाळात देशातल्या सर्वोत्तम तोफांची निर्मिती झाली, त्या भागाला आजही तोफखाना नाव आहे. रुमिखान नावाच्या निष्णात तोफा बनवणाऱ्या कारागिराची कर्मभूमी. जिथ नेहेरू-पटेल-मौलाना आझाद आणि इतर अनेक नेते १९४२ च्या आंदोलनाची हाक दिल्यावर तुरुंगवासात होते ते , जिथ “ भारताचा शोध “ हा ग्रंथ नेहेरुनी लिहिला ते, जिथ गांधीजींच्या खुनाचा कट रचला गेला ते, जिथ पटवर्धन बंधूनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला ते अहमदनगर.अहमदनगर-पुणे ही राज्यातली पहिली एसटी बस स्वातंत्र्योत्तर काळात सुरू झाली ते अहमदनगर.
बरावाईट असा इतिहास असलेल अहमदनगर. भौगोलिक दृष्टीने अतिशय उत्तम हवामान असलेल शहर ब्रिटीश काळाच्या आधीपासून लष्करी छावणी म्हणून नावाजलेल आहे.इथली सलाबतखानाची कबर असलेली इमारत जी चांदबीबी महाल म्हणून ओळखली जाते तिची समुद्रसपाटीपासून उंची जवळपास माथेरानइतकी आहे.
ब्रिटीशकाळापासून नगरला लष्करी महत्व आलेल आहे.मध्यवर्ती ठिकाण, दळणवळण सोयीचे ह्यामुळे अहमदनगरला वाहन संशोधन विकास केंद्र, रणगाडा दल, चिलखती दल, बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट, यांत्रिकी पायदळ प्रशिक्षण संस्था,खारे-कर्जुने ( केके रेंज ) हे युद्धसराव आणि प्रात्यक्षिक केंद्र अश्या अनेक संस्था शहराच्या भवताली उभ्या राहिल्यात.
दीडशे वर्षापेक्षा जून संपूर्ण दगडी बांधकाम आणि तत्कालीन सागवानी फर्निचर उत्तम असलेलं माणिक चौकातील ह्युम मेमोरियल चर्च , मुक्तीफौजेच रुग्णसेवेला समर्पित असलेलं बूथ हॉस्पिटल , ' स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे ' हे टिळकांचे भाषण झाले ती इमारत कंपनी , महाराष्ट्रातील मोजक्या जुन्या शिक्षण संस्थापैकी एक असलेली भा.पा.हिवाळे शिक्षण संस्था अहमदनगर शहरात आहे.
हा सगळा बरावाईट इतिहास आणि इतिहासाची कवन भूतकाळ आहेत.अहमदनगर शहराचा वर्तमान आणि भविष्य मात्र अवघड आहे. तीन बाजूने लष्करी केंद्र असल्याने वाढीला आणि विकासाला भौगोलिक मर्यादा प्रचंड आहेत. स्थानिक पातळीवर नेतृत्वाची अनास्था आणि दूरदृष्टीचा अभाव हा रोग तर गेली चाळीस पन्नास वर्षे पोखरतोय.
आधी नगरपालिका आणि नंतर महानगरपालिका, सत्ताधारी म्हणजे सोयरेपक्ष आणि सत्ताधारी कुणीही असले तरी ठेकेदार तेच असल चित्र. चांदबीबी घोड्यावर बसून पुन्हा आली तरीही शहरातले रस्ते चुकणार नाही हा विनोद आम्ही निर्लज्जपणे सांगतो ह्यातच सगळ आलय. नियम पाळण्याच आणि नगरकरांचा दुरान्वये संबंध नाही त्यामुळे अपघात, वाहतूक कोंडी,बेशिस्त वाहतूक आणि मरणारी माणस ह्याचीही लाज वाटत नाही.
ह्या उदासीनतेचा परिपाक म्हणून एमआयडीसी सुरुवातीपासून कुपोषित आहे.जुने उद्योग बंद पडले,नवीन येत नाहीत, आलेतरी राजकीय दबावाला कंटाळून पळून जातात, रोजगारनिर्मिती नाही पर्यायाने बाजारपेठ मर्यादेपलीकडे वाढत नाही ह्या दुष्टचक्रात शहर अडकलेल.
यथा राजा तथा प्रजा किंवा उलट वाचा, आम्ही नालायक आहोत म्हणून राज्यकर्ते तसे मिळतात कि आम्हाला पर्याय उपलब्ध होत नाही म्हणून आम्ही दगडापेक्षा वीट मऊ म्हणून वीट डोक्यात हाणून घेतोय कुणास ठाऊक.
राजकीयदृष्ट्या अतिशय सजग म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आणि सतत अनेक मंत्रिपद मिळणारा जिल्हा असूनही अहमदनगर शहराच्या वाट्याला मात्र कायमच उपेक्षा, हे मंत्री आपापली संस्थान बघणार आणि शहर तसच राहणार, " सतरा लुगडी न भागाबाई उघडी " असली गत.
आमचीच प्रवृत्ती संकुचित आहे. राज्यकर्त्यावर अंकुश ठेवण्याची, जाब विचारण्याची मानसिकता नाहीये, त्यामुळे नगरसेवक,पदाधिकारी सार्वजनिक कामापेक्षा व्यक्तिगत कामांना प्राधान्य देतात आणि निवडणुका जिंकून मोकळे होतात.
अहमदनगर शहराचं भौगोलिक स्थान महत्वाचं आहे, संपूर्ण महाराष्ट्रात नेमकं मध्यवर्ती असलेलं. पुणे - औरंगाबाद-बीड-नाशिक अवघ्या १२५-१५० किलोमीटर टप्प्यात आणि मुंबई ३००किलोमीटर.
औरंगाबाद-अहमदनगर-पुणे अशी थेट रेल्वे सुरू झाली तर पुणे शहरावर असलेला ताण कमी होईलच शिवाय अहमदनगर आणि औरंगाबाद या शहरांच्या बरोबर मराठवाडा मध्य महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर लागेल. आश्वासन भरपूर मिळतात मात्र स्थिती बदलत नाही. बाकी सामान्य नगरकर हेही दिवस जातील ह्या आशेवर जगत असतोय.
लेखक: आनंद शितोळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.