
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात प्रस्तावित १० केएल लिक्विड ऑक्सीजन टँकची उभारणी पूर्ण झाली आहे.
अकोला ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात प्रस्तावित १० केएल लिक्विड ऑक्सीजन टँकची उभारणी पूर्ण झाली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांना आवश्यकता भासलेला ऑक्सीजनचा तुटवडा यानंतर भासणार नाही. १० केएल क्षमतेचा सदर प्लांट सर्वोपचारच्या कोविड आयसीयू जवळ उभारण्यात आला आहे.
प्लांटसाठी ऑक्सीजन पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराची निश्चिती झाल्यानंतर त्याचे लोकार्पण करण्यात येईल. त्यामुळे कोरोनासह इतर रुग्णांची श्वास कोंडी थांबेल.
ऑक्सीजनची कमतरता हे कोरोना रुग्णामधील एक प्रमूख लक्षण आहे. यासाठी जिल्ह्यातील रुग्णांसाठी पुरेसा ऑक्सीजनचा साठा असावा म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दोन ऑक्सीजन प्लॉन्टला मंजूरी दिली होती. सदर ऑक्सीजन प्लॉन्टसाठी ४७ लक्ष ९९ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.
यानिधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालय येथे प्रत्येकी एक प्रमाणे दोन ऑक्सीजन प्लॉन्ट उभारण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वोपचार मधील प्लांटचे काम पूर्ण झाले असून लवकरच हा प्लांट कार्यान्वित होईल. रुग्णालयातील कोविड आयसीयूजवळ सदर प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. प्लांटच्या बंबामध्ये एकदा १० केएल कृत्रिम ऑक्सिजन साठवल्यानंतर किमान दीड ते दोन दिवस साठवलेल्या ऑक्सीजनचा उपयोग करता येईल. त्यासह रुग्णांना सुद्धा वेळेवर ऑक्सीजन मिळेल.
रुग्णाढीच्या काळात भासली होती कमतरता
कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करताना सर्वोपचार रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयांना ऑक्सीजनची कमतरता भासत होती. अनेक वेळा तर खासगी रुग्णालयांना ऑक्सीजनचा पुरवठा सुद्धा होत नव्हता. त्यामुळे खासगी रुग्णालयांच्या संचालकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून काही ऑक्सीजनचे सिलिंडर त्यांना उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. दरम्यान ऑक्सीजनची ही कमतरता दूर करण्यासाठी रुग्णालयात ऑक्सीजन प्लांट उभारण्यात आला आहे.
केंद्रीय राज्यमंत्र्यांनी केला होता पाठपुरावा
केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या प्रयत्नाने व सतत पाठपुराव्याने मेडिकल कॉलेज व लेडी हार्डिंगयेथे नावीन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून ऑक्सीजन सिलिंडर प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील रुग्णांसह बुलढाणा, वाशीम, हिंगोली, अमरावती येथील रुग्णांची संख्या लक्षात घेता येथे ऑक्सीजनची कमतरता निर्माण झाली होती. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी औरंगाबाद, नागपूर, ठाणे भिवंडी येथील ऑक्सीजन कंपन्यांशी चर्चा करून अकोला शहरामध्ये ऑक्सिजनची कमी पडू दिले नाही.
(संपादन - विवेक मेतकर)