अनलॉकमध्ये मजुरांची ‘मनरेगा’कडे पाठ!

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 6 November 2020

मजुरांना १०० दिवस काम उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी राेजगार हमी याेजनेकडे (मनरेगा) जिल्ह्यातील मजुरांनी पाठ फिरवली आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या संपूर्ण टाळेबंदीच्या काळात योजनेअंतर्गत ४ हजार ४०० पर्यंत मजूर काम करत होते.

अकोला  ः मजुरांना १०० दिवस काम उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी राेजगार हमी याेजनेकडे (मनरेगा) जिल्ह्यातील मजुरांनी पाठ फिरवली आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या संपूर्ण टाळेबंदीच्या काळात योजनेअंतर्गत ४ हजार ४०० पर्यंत मजूर काम करत होते.

परंतु आता मिशन बिगीन अगेन सुरू झाले असून अनलॉकमध्ये मात्र मजुरांच्या उपस्थित घट झाली आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत मनरेगा अंतर्गत केवळ १ हजार ९४४ मजूर काम करत आहेत.

ग्रामीण क्षेत्रातील मजुरांचे शहरी भागात स्थलांतरण थांबावे व ग्रामीण भागात विविध शासकीय कामे हाेत राहावी यासाठी केंद्र शासनाच्या वतीने देशात ‘महात्मा गांधी राेजगार हमी याेजना’ राबविण्यात येते. योजनेअंतर्गत ग्रामीण भागात विविध प्रकारची कामे राबवून मजुरांच्या हातांना हक्काचे काम देण्यात येते.

त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनरेगाच्या कामांकडे कल अधिक असतो. दरम्यान यावेळी कोरोना विषाणूच्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी मार्च महिन्यात संपूर्ण टाळेबंदीला लागू करण्यात आल्यामुळे उद्योग, व्यापारांसह इतर कामे २४ मार्च पासून बंद होती. त्यामुळे या काळात मजुरांना मनरेगाने भक्कम आधार दिला.

परंतु आता टाळेबंदी शिथिल होताच मजुरांनी मनरेगाकडे पाठ फिरवली आहे. १८ मे २०२० रोजी ४ हजार ४०० मजूर योजनेच्या कामांवर काम करत होते. त्यानंतर जून महिन्याच्या सुरूवातीला मजुरांची उपस्थिती २ हजार ६२२ वर आली होती. परंतु आता मात्र प्रत्यक्षात १ हजार ९४४ मजूर काम करत आहेत. त्यामुळे मजुरांनीच योजनेकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

कामांची संख्या सुद्धा घटली
संपूर्ण टाळेबंदीच्या काळात १८ मे रोजी जिल्ह्यातील ५४९ ग्रामपंचायतींमध्ये ९९७ कामे सुरु होती. त्यानंतर ५ जून रोजी कामांच्या संख्येत कमी झाली. जूनमध्ये केवळ १३३ काम सुरू होते. परंतु आता काम ५२४ काम सुरू असल्यानंतर सुद्धा मजुरांची उपस्थिती घटली आहे.

योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे
विभाग कामांची संख्या
ग्रामपंचायत २६८
वन विभाग ०४
सामाजिक वनिकरण ८७
रेशीम विभाग २८
कृषी विभाग १३७
एकूण ५२४

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Workers refuse MGNREGA work in Unlock