अहमदनगर ः अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही राज्यात अव्वल आहे. प्रत्येक गोष्टीत अग्रेसर असलेल्या या बँकेच्या हितासाठी शेतकऱ्यांसोबत पुढाऱ्यांचाही मोठा वाटा आहे. योग्य नेतृत्व नसेल तर बँक डबघाईला येते. एडीसीसीबाबत अभिमानाने सांगता येईल.
या बँकेवर नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या वर्षीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ती आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रारंभी विखे पाटील आणि नंतर शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. परंतु सर्व नेते एकत्र आल्याने सतरा जागा बिनविरोध झाल्या. अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचे उदय शेळके तर काँग्रेसच्या माधवराव कानवडे यांना उपाध्यक्षपदावर कामाची संधी मिळाली.
शेळके हे जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांना प्रशासन हाकण्याचा मोठा अनुभव आहे. संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अध्यक्षपदाची धुरा हातात येताच त्यांनी मोठे फेरबदल केले आहेत. ते शेतकरी, बँक आणि सोसायट्यांसाठी लाभदायी आहेत. ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित राहाव्यात यासाठीही प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. यावेळी संचालक प्रशांत गायकवाड, मुख्यकार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यावेळी उपस्थित होते.
बँक शाखेतच मिळेल सात-बारा, आठ-अ
ई सकाळसोबत बोलताना अध्यक्ष शेळके म्हणाले की, सभासदाला पीक कर्ज घ्यावे लागते, त्यासाठी तलाठ्याच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. ही अडचण ओळखून संगणकीय सात-बारा, आठ-अ बॅंकेच्या सर्वच्या सर्व २८७ शाखांत उपलब्ध करून दिले जातील. संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत तसा निर्णय झाला.
३२०० कोटींचे पीक कर्ज
बँकेने वर्षभरात यंदा ४ लाख ८० हजार सभासद शेतकऱ्यांना ३२०० कोटी रुपये पीककर्जाचे वाटप केले. आता एप्रिलपासून पुन्हा नव्या वर्षातील कर्जाचे वाटप होईल. नाबार्डच्या मदतीने शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योगासाठी दीड लाखांचे खेळते भांडवल उपलब्ध दिले जाते. या वर्षाअखेर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढे या योजनेचा नियमित लाभ दिला जाईल. आतापर्यंत या योजनेतून ३८१ कोटींचे कर्ज वाटप केले आहे.
यंदाचे वसुली वर्ष
‘वसुली वर्ष’ उपक्रम राबवण्याचाही निर्णय बॅंकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. शेतकऱ्यांना सुविधा देण्यात बँकेचा नेहमीच प्रयत्न असतो. परंतु ठेवीदारांचे हित जोपासले तरच ठेवी वाढतील. त्यासाठी कर्जाची वसुली होणेही महत्त्वाचे आहे. एका हाताने कर्ज देताना देताना दुसऱ्याने हाताने ते माघारी केले पाहिजे. त्यासाठी या वर्षी वसुली वर्ष उपक्रम राबविला जाईल.
शून्य टक्क्याने कर्ज
शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने मिळणार आहे. जिल्हा बँकेने नेहमीच ही योजना राबविताना पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही शेळके यांनी केले.
एटीएम आणि मायक्रो एटीएम सुविधा
तंत्रज्ञान हे कोणत्याही बँकेचा आत्मा असतो. बँकेतील पूर्वसूरींनी मोठे काम केले आहे. त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली जाईल. तरूणांना बँकेकडे वळण्यासाठी सुविधा दिल्या जातील. ६५ एटीएमची संख्या पुरेशी नाही. ती वाढवली जाईल. ३०० मायक्रो एटीएम पुरवले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांना जागेवरच पैसे मिळतील. मोबाईल आणि नेटबँकिंग सुविधा फास्ट करण्यावर भर असेल, असेही शेळके म्हणाले.
सचिवाच्या बगलेतून दप्तर काढून सोसायटी अॉनलाईन
जिल्ह्यात १४ सेवा सोसायट्या आहेत. बँकेचा त्या आत्मा आहेत. पूर्वी सोसायट्या सचिवाच्या बगलेत असतात, असं मानलं जायचं. काही ठिकाणी गडबडीही व्हायच्या. आता सोसायट्यांचा सर्व कारभार पारदर्शक व्हायला पाहिजे, यासाठी बँकेच्या खर्चातून संगणकीकरण केले जाईल. एकाच सॉफ्टवेअरमध्ये बँकेचा आणि सोसायट्यांचा कारभार चालेल. त्यांनी काहीही नोंदी केल्यास ते हेड अॉफिसला दिसेल. त्यामुळे कारभारात पारदर्शकता येईल.
तो आरोप चुकीचा
बँक ही शेतकऱ्यांचीच आहे. परंतु कारखान्यांना कर्ज पुरवठा केला तर ती संस्था टिकते. परिणामी त्या संस्थेमुळे शेतकऱ्यांचाही फायदा होतो. ज्या तालुक्यातील कारखाना डुबला असेल तेथे ऊसउत्पादकांची काय अवस्था आहे, ते आपण पाहतोच आहोत. एक कारखाना वगळता कोणाकडेही थकबाकी नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.