Happywala Badde of Ahmednagar city
Happywala Badde of Ahmednagar city 
अहमदनगर

अहमदनगर शहराचा हॅप्पीवाला बड्डे...कैरो-ईजिप्तसोबत होता व्यापार

सकाळ वृत्तसेवा

नगर ः अहमदनगर म्हणजे काना,उकार, मात्रा, वेलांटी असं काहीही नसलेलं शहर आहे. इथली माणसं उसासारखी गोड आणि टिपरासारखी निबर असल्याचं म्हटलं जातं. नगरी भाषा इथलं खास वैशिष्ट्य या शहराला अलिकडच्या काळात बकाल अवस्था आली असली तरी या शहराने अर्ध्या हिंदुस्थानचे राजकारण फिरवलं. शिवशाहीची बिजं याच मातीत रोवली गेली. स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग येथेच चेतले. या शहराची हवा ज्याला लागली तो ते सोडून जाऊ शकत नाही. तिरस्कार करणाऱ्यांना ती क्षमा करीत नाही. अगदी बादशहा अौरंगजेबही त्याला अपवाद नाही. मराठेशाही बुडवण्यासाठी आलेल्या अौरंगजेबाला याच मातीने शेवटचा श्वास घ्यायला लावला. जगात फार शहरं अशी आहेत की ज्यांना स्वतःचा वाढदिवस माहिती आहे. नगर शहर त्यापैकीच एक.

पंधराव्या शतकाच्या शेवटी म्हणजे इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजाम शहाने  इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले.

सन १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्‍हाणशहा, सुलताना चाँदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे १६३६ पर्यंत टिकली. मोगल बादशहा शहाजहानने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगर काबीज केले. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला तर १८१७मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर घेतले. शहरात अहमदनगरचा किल्ला, रेणुकामाता मंदिर (केडगांव) फराह बाग, आलमगीर, बागरोजा, भिस्त बेहस्त बाग, बुऱ्हाणनगर व चाँदबीबी महल (सलाबत खान मकबरा ) अशी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. या शहराला नगर या नावाने सुद्धा ओळखतात.

मराठ्यांच्या कर्तृत्वाच्या उदयकाली विठोजी भोसले, मालोजी भोसले, लखुजीराजे  जाधव, निंबाळकर, पवार, बाजी कदमराव हे निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबरच्या बरोबर सेवेत होते. नगर शहराचे जगाच्या नकाशावरचे स्थान १९.०८° उत्तर अक्षांश, ७४.७३° पूर्व रेखांश असे आहे. शहराची समुद्रसपाटीपासून उंची ६४९ मीटर आहे.

गोदावरी नदी व कृष्णा नदीची उपनदी भीमा या दोन मुख्य नद्या अहमदनगर जिल्ह्यातून वाहतात. बाकीच्या नद्या - प्रवरा, मुळा ही गोदावरीची उपनदी आहे. प्रवरा नदीचे पाणी उंचावरून पडून रंधा धबधबा तयार झाला आहे. संत ज्ञानेश्वर यांनी अहमदनगरजवळील नेवासा येथे ज्ञानेश्वरी लिहिली. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांची सर्वात जास्त चरणांकित स्थाने नगरमध्येच आहेत. अहमदनगर जवळील शिर्डी ही संत साईबाबांची कर्मभूमी आहे. 

आचार्य आनंदऋषीजी महाराज, अवतार मेहेरबाबा, दासगणू महाराज,  सदाशिव अमरापूरकर प्रसिद्ध हिंदी-मराठी सिने अभिनेते रावसाहेब पटवर्धन, थोर स्वातंत्र्यसेनानी अच्युतराव पटवर्धन, थोर स्वातंत्र्यसेनानी बाळासाहेब भारदे, भाई सथ्था, कम्युनिस्ट नेते दादा चौधरी, संसदपटू मधू दंडवते, कवी नारायण वामन (रेव्हरंड) टिळक लक्ष्मीबाई टिळक, अण्णा हजारे (किसन बाबूराव हजारे ) हे भारतातील नावाजलेले व्यक्तीमत्व आहेत.

मुंबई - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग २२२ अहमदनगर शहरातून जातो. अहमदनगर हे पुणे, औरंगाबाद, सोलापूर, नासिक, बीड या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांशी राज्य महामार्गांनी जोडले गेले आहे. दौंड-मनमाड लोहमार्गावरील अहमदनगर हे महत्त्वाचे स्थानक आहे. येथून जाणार्‍या सर्व प्रवासी रेल्वेगाड्या अहमदनगरला थांबतात. इ.स. १९४२ मध्ये येथे जवाहरलाल नेहरू यांना इंग्रजांनी कैदेत ठेवले होते. तेथे त्यांनी "डिस्कव्हरी ऑफ इंडिया" हा ग्रंथ लिहिला .

अहमदनगर शहराच्या वैभवात भर घालणारी वास्तू म्हणजे ऐतिहासिक वस्तू संग्रहालय सर्वांसाठी खुले होत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अनिलजी कवडे, सध्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी (IAS) , कार्यकारी विश्वस्त डॉ . रवींद्र साताळकर यांच्या प्रयत्नातून या वस्तूच्या नूतनीकरणासाठी जवळपास 3 कोटी रुपये खर्च होत आहेत. या मुळे शहरातील पर्यटन ठिकाण म्हणून नावारुपाला येणार आहे.

नगर शहराचा इतिहास, प्राचीन ग्रंथसंपदा, दस्तऐवज, नाणी, हत्यारे येथे पहावयास मिळतील. येथे स्वतंत्र स्पर्धा परीक्षा अभ्यासिका तयार होत आहे . अशा या ऐतिहासिक शहराला ५30 वर्ष पूर्ण होत आहेत. या शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याचा संकल्प करायला हवा.

- प्रा. डॉ. संतोष यादव,अभिरक्षक, एेतिहासिक वस्तू संग्रहालय, अहमदनगर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT