-सतीश वैजापूरकर
शिर्डी : दख्खनच्या पठाराच्या भुगर्भात लपलेला, मोहक आकाराचा आणि विविध रंगाची उधळण करणारा स्वर्ग जमिनीवर आणण्याचे श्रेय साईसंस्थानचे नाशिक येथील माजी विश्वस्त के. सी. पांडे यांना जाते. काही दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील साकूर येथे सापडलेली आणि त्यापूर्वी शिर्डी परिसरात सापडलेली वैशिष्ट्यपूर्ण गारगोटी त्यांच्या सिन्नर येथील गारगोटी संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. हे देशातील एकमेव आणि वैशिष्ट्यपूर्ण गारगोटी संग्रहालय आहे. पांडे यांच्या निरीक्षणानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील भुगर्भात गारगोट्यांचा सुंदर आणि मोहक खजिना आहे.
भारतात गारगोट्यांचा खजिना प्रामुख्याने दख्खनच्या पठारावर सापडतो. दख्खनच्या पठारात अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, नाशिक, संभाजीनगर, जळगाव, सांगली, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यात सर्वाधिक सुंदर, वैशिष्टपूर्ण आकारांच्या गारगोट्या ज्या भागात सापडतात, त्यात अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश आहे.
गारगोटी संग्राहक आणि देशातील सर्वाधिक मोठे गारगोटी उद्योजक के. सी. पांडे म्हणाले, गारगोट्यांची दुनिया अदभुत आहे. जगाच्या पाठीवर विविध देशात त्यांना मोठी मागणी आहे. कला आणि सौदर्य यांचा सुंदर मिलाफ, असे या दुनियेचे वर्णन करता येईल. आपल्याकडे प्रामुख्याने विहीरींची खोदाई करताना मोहक आणि सुंदर गारगोट्या सापडतात. माणिक आणि पाचू यासारखी रत्ने दुनियेचा भाग आहेत. गारगोट्यांची मोहमयी स्वर्गासारखी दुनिया जमिनीवर आणण्याचे भाग्य भारतात प्रथम मला लाभले.
गारगोट्यांच्या उद्योजक म्हणून भारताचे नाव जगाच्या नकाशावर नेण्याची संधी देखील साईबाबांनी दिली. देशातील एकमेव असलेले सिन्नर येथील गारगोटी संग्रहालय भारताच्या चरणी सुपूर्त केले. २००१ साली या संग्रहालयाचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले.
सिन्नर येथील माझ्या गारगोटी संग्रहालयात अहिल्यानगर जिल्ह्यातील अपोफिलाइट, पुण्यातील कॅव्हनसाइट, श्रीलंकेतील नीलमणी हे गारगोट्यांचे निनांत सुंदर प्रकार,कॅलिफोर्नियातील मूळ सोने, ब्राझीलमधील अॅमेथिस्ट जिओड्स, चंद्र आणि मंगळ खडक, गुजरातमधील डायनासोरचे जीवाश्म यांचा समावेश आहे.
-के.सी. पांडे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गारगोटी उद्योजक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.