राहुरी : गरीब शेतकरी कुटुंबातील एक अल्पवयीन मुलगी. वडिलांच्या आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी झटत आहे. त्यांना आठवड्यातून दोनदा रक्तशुद्धीकरण (डायलेसिस) करावे लागते. त्यासाठी नगरला जावे लागते.
कोरोनामुळे एसटी, रेल्वे बंद झाल्या. तिने वडिलांना तीन महिने दुचाकीवर नगरला नेले. हे कमी होते म्हणून की काय नियतीने आणखी परीक्षा घेतली. या धबाडग्यात तिचे वडील कोरोनाग्रस्त आढळले. आता त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या घरातील परिस्थिती बिकट आहे. तरीही तिने हार मानली नाही. संकटांसोबत ती दोन हात करीत आहे!
रेणुका राहुल डोंगरे (रा. केंदळ बु., ता. राहुरी) असे संघर्ष कन्येचे नाव आहे. ती दहावीला आहे. घरात आहे वृद्ध आजी- आजोबा, आई. भाऊ आहे परंतु तो मतीमंद. तो शिर्डी येथे मूकबधिर विद्यालयात नववीत आहे. दुसरा भाऊ तिच्याच शाळेत पाचवीत शिकतोय. अवघी दोन एकर शेती. त्यावरच उदरनिर्वाह चालतो. दोन गाया. त्यांच्या दुधाचा पगार वडिलांच्या दवाखान्यावर खर्च होतो.
तिचे वडील राहुल त्रिंबक डोंगरे (वय 40) यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यात. अकरा वर्षांपासून त्यांना आठवड्यातून दोनदा रक्तशुद्धीकरण (डायलेसिस) करावे लागते. त्यांच्या दोन भावांना असाच आजार होता. आजी-आजोबांनी त्यांना आपल्या एकेक किडन्या दिल्या. परंतु, शस्त्रक्रियेनंतर दोन्ही चुलत्यांचे निधन झाले. त्यामुळे रेणुकाच्या वडिलांची किडनी प्रत्यारोपण करण्याची तयारी नाही.
वडिलांना रक्तशुद्धीकरणासाठी नगर येथे आनंदऋषीजी रुग्णालयात न्यावे लागते. दहा वर्ष आजोबा त्यांना दुचाकीवरून राहुरीला व तेथून एसटीने नगरला न्यायचे. आजोबांना प्रवास सहन होईना. त्यांची जबाबदारी रेणुकाने घेतली. परंतु संकटं जणू काही तिच्यामागे हात धुवून लागलीत.
दुर्दैवाने एक वर्षापूर्वी तिची दुचाकीची चोरी गेली. महिन्याला दहा-बारा हजार रुपये दवाखाना खर्च. त्यात दुचाकी चोरी. बिकट परिस्थितीत भर पडली. रेणुकाने पैसे वाचविण्यासाठी वडिलांचा रेल्वेने प्रवास सुरु केला. दरम्यान, कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाले. रेल्वे, एसटी बंद झाली. तिचा संघर्ष वाढला. पैसे जमवून जुनी दुचाकी खरेदी केली. त्यावर तीन महिने वडिलांना नगरला नेले.
सात दिवसांपूर्वी शुक्रवारी (ता. 28) तिचे वडिल कोरोनाग्रस्त आढळले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती संघर्ष करताना दमलीय असं नाही. परंतु कोणी आर्थिक मदत दिली तर तिचा वेळ वाचले. आणि ती दहावीच्या अभ्यासात लक्ष घालील. कमलाकर कोते (शिर्डी) यांनी दहा हजारांची मदत केली. दानशूर व्यक्तींनी रेणुकाच्या मदतीसाठी संपर्क साधायला हवा. किंवा ई सकाळशी संपर्क करा.
दोन चुलत्यांचे किडन्या निकामी झाल्याने निधन झाले. त्यांना आजी व आजोबा यांच्या एकेक किडन्या दिल्या होत्या. त्यामुळे तेही आधू झालेत. वडिलांच्या दोन्ही किडन्या निकामी आहेत. अकरा वर्षांपासून त्यांना रक्तशुद्धीकरण सुरू आहे. घरातील आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यात वडील कोरोनाग्रस्त झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संकटांना घाबरत नाही. परंतु, आर्थिक मदतीची गरज आहे.
- रेणुका डोंगरे, रा. केंदळ बुद्रुक, ता. राहुरी, अहमदनगर
संपादन - अशोक निंबाळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.