शिर्डी ः ‘आजोबा, आईची खूप आठवण येते... घरात करमत नाही... आम्ही तुमच्या घरी आलो तर चालेल का...’ आईच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या नातवंडाचे बोल आजोबांच्या काळजाला घर पाडतात... आधी कोविडने आजोबांच्या दोन्ही बहिणी लागोपाठ हिरावून नेल्या. पाठोपाठ भाचीही गेली. नातवंडांचे मातृछत्र हरपले.
उजाड झालेल्या बहिणींच्या संसाराकडे लक्ष द्यायचे, नातवंडांच्या दुःखावर फुंकर घालायची, की अतिदक्षता विभागात जीवन-मरणाची लढाई लढणाऱ्या भाच्याकडे लक्ष द्यायचे? केलवड येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा. लक्ष्मण गोर्डे यांच्यासमोर कोविडने एकाच वेळी हे असे अनेक यक्षप्रश्न निर्माण केले आहेत. (The grief of the loss of family members due to covid)
ही व्यथा एकट्या प्रा. गोर्डे यांची नाही. नुकत्याच ओसरू लागलेल्या कोविडच्या दुसऱ्या लाटेने खेड्यापाड्यांतील अनेक कुटुंबांची अशीच पुरती वाताहत केली आहे. कुठे लहान मुलांच्या डोक्यांवरील मायेचे छत्र हरपले, कुठे घरातील कर्ता माणूस निघून गेल्याने उपजीविकेचा प्रश्न उभा ठाकला आहे. काही घरांत अंथरुणावर खिळलेल्या वयोवृद्धांचे संगोपन करायला माणूस उरला नाही. कुठे जनावरांचे संगोपन व शेती कसायची कुणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
केलवड येथील प्रा. लक्ष्मण गोर्डे यांच्या दोन्ही बहिणींचा कोविडने मृत्यू झाला. त्यांच्या कर्त्या मुलालादेखील कोविडने गाठले. तो गेल्या चाळीस दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार घेतोय. पाण्यासारखा पैसा खर्च होतोय; पण तब्येत सुधारण्याचे नाव घेत नाही. घरी पक्षाघात झालेले त्याचे वडील गेल्या काही वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत. घरात त्यांची शुश्रूषा करायला, शेतीवाडी सांभाळायला आणि जनावरांची देखभाल करायला माणूस उरला नाही.
हे कमी होते म्हणून की काय, प्रा. गोर्डे यांच्या एका भाचीचादेखील कोविडने मृत्यू झाला. तिला आठ आणि दहा वर्षे वयाची दोन चिमुरडी मुले आहेत. ध्यानीमनी नसताना आई गेल्याने ती हादरून गेलीत. त्यांना सारखी आई डोळ्यांसमोर दिसते. ते आपले आजोबा प्रा. गोर्डे यांना सारखे फोन करतात. अंथरुणाला खिळलेल्या मेहुण्यांची देखभाल कशी करायची, त्यांची शेती आणि जनावरे कोण सांभाळणार, अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या भाच्याकडे पाहायचे, की मातृछत्र हरपलेल्या नातवंडांकडे लक्ष द्यायचे? गेल्या दीड महिन्यापासून त्यांना काही सुचेनासे झालेय.
कोविडच्या उच्छादामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. आपल्याकडे भावनेचा भर ओसरला की निराधार लोकांना आधार देण्यासाठी फार कमी लोक पुढे येतात. अनाथ आणि कोविडमुळे
झालेले निराधार, यात फरक आहे. कोविडने ही नवी समस्या आपल्या समाजापुढे निर्माण केली आहे. काही दिवसांनी ती प्रकर्षाने पुढे येईल.
- गणेश दळवी, अनाथाश्रम चालक, शिर्डी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.